विभाग अकरावा : काव्य - खतें
केळवे माहीम— मुंबई इलाख्यांतील ठाणें जिल्ह्यामधील तालुक्याचें मुख्य ठिकाण. वी.बी.सी.आय. रेल्वेच्या फाट्यावर पालघर म्हणून स्टेशन लागतें. त्याच्या पश्चिमेस सुमारे ५।। मैलांवर हें ठिकाण आहे. येथील लोकवस्ती १९११ सालीं ५६९९ भरली. केळवें माहीम यापैकीं केळवें या बंदराजवळ एक किल्ला आहे. माहीम बंदरासमोरहि दोन किल्ले असून ते पोर्तुगीज लोकांनीं बांधलेले आहेत. केळवें माहीम या ठिकाणी मोठमोठ्या बागा असून येथे केळी, ऊंस, सुंठ, सुपारी यांचा मोठा व्यापार आहे. हें शहर दिल्ली येथील मोंगलाच्या ताब्यांत १३५० सालीं आलें. पुढें गुजराथच्या सुभेदारांनीं तें आपल्या ताब्यात घेतले. १५३२ सालीं पोर्तुगीज लोकांनीं तें हस्तगत केलें. १६१२ साली मोंगलांनी या शहराला वेढा दिला. पण पोर्तुगीज लोकांनीं मोठ्या शौर्यानें व चिकाटीनें त्याचें संरक्षण केलें. या ठिकाणीं एका पोर्तुगीज सरदाराचें थडगें सांपडले. त्याचा अवशेष ठाणें येथील कलेक्टराच्या बागेंत ठेवला आहे. १८६१ सालीं येथें म्युनिसिपालिटी स्थापन करण्यांत आली. १९०१ सालीं या शहराचा वार्षिक वसूल ८००० रुपये होता. १८९० सालीं केळवें गांव देखील माहीम म्युनिसिपिलटीच्या ताब्यांत देण्यात आलें. माहीम शहरांत एक धर्मार्थ दवाखाना असून ६ मुलांच्या व १ मुलींची शाळा आहे.