विभाग अकरावा : काव्य - खतें  
      
कैथल, तहशील— पंजाब इलाखा. कर्नाळ जिल्ह्याची पश्चिमेकडील तहशील. उ. अ. २९ २२’ ते ३० १२’ व पू.रे. ७६ ११’ ते ७६ ४७’. क्षेत्रफळ १२७३ चौरस मैल. लो.सं. (इ.स. १९११) २,५०,९१७. या तहशिलींत कैथल व पुंड्री हीं गावें व ४१३ खेडी आहेत.

शहर— कैथल तहशिलीचें मुख्य ठिकाण. उ. अ. २९ ४८’ व पू.रे. ७६ २२’ सदर्न पंजाब रेल्वेच्या कर्नाळ फांट्यावरील हें अखेरचें स्टेशन आहे. लो.सं. (१९११) १२९१२. हा गांव एका विस्तृत तलावाभोंवतीं वसलेला आहे. या तलावास ठिकठिकाणीं पायर्‍यांचे घांट बांधले आहेत. कैथल गांव कुरुक्षेत्रांत असून युधिष्ठिरानें बसविला असें म्हणतात. याचें संस्कृत नांव कपिस्थल असें असून हनुमानाची मातोश्री अंजनी हिचें येथें देऊळ आहे. मुसुलमानी अमलाच्या आरंभीं या गांवास थोडें फार महत्त्व होतें व तेमूरनें दिल्लीवर स्वारी करण्यापूर्वी इ.स. १३९८ सालीं येथें मुक्काम केला होता. त्यावेळीं येथील लोक अग्निपूजक होते असा उल्लेख करून ठेवलेला आहे. येथें बल्खचा शेख सलाउद्दीन (इ.स. १४२६) याचें थडगें आहे. त्या थडग्याचा जीर्णोद्धार अकबर बादशहानें केला. इ.स. १७६७ सालीं भाइ देसुसिंग या शीख सरदारानें येथें आपला अंमल बसविला. इ.स. १८४३ सालीं शिखांकडून ते ब्रिटिश मुलुखांत समाविष्ट झाले. भाईचा राजवाडा अद्यापि पडक्या स्थितींत दिसतो. इ.स. १८६७ सालीं येथें म्युनिसिपालिटी स्थापन झाली. कैथल येथें सोरा शुद्ध करण्यांत येतो. शिवाय लाखेचें वार्निश केलेलें लांकूड तयार होतें.