विभाग अकरावा : काव्य - खतें
कैलास— तिबेटांत मानससरोवराच्या उत्तरेस २१,८३० फूट उंचीचा हा पर्वत आहे. हिंदू याला मेरु पर्वत समजतात. (`मेरू’ पहा.)
बंधुवर्म्याच्या मंदसोर येथील लेखांत याला एक कुक्षि म्हटलें असून सुमेरुला दुसरी कुक्षि असें नांव दिलें आहे. शिवपार्वतीचें निवासस्थान म्हणून कैलासपर्वत हिंदूंना पूज्य वाटतो. वस्तुतः हा पर्वत शिखरविरहित हिंदु देवळाप्रमाणेंच किंबहुना लिंगाच्या आकाराचा दिसत असल्यानें त्याचा शिवाशी संबंध जोडून दिला असावा. कैलासावर कुबेरहि राहतो. असा पुराणांत उल्लेख आहे याला गणपर्वत व रजतगिरी अशीं नांवें आहेत.
पुराणांतून कैलासाला जाण्याचा मार्ग दिलेला आहे. प्रवासाच्या दगदगीमुळे यावर कोणी जात नसत. पण ल्हासाच्या तहान्वयें पश्चिम तिबेट आतां हिंदुस्थानवासीयांनां खुलें झाल्यानें पुष्कळ लोक आतां कैलासावर जाऊं लागले आहेत. हिंदूप्रमाणें बौद्धांनांहि हें स्थान पवित्र वाटतें. या दोन्ही धर्मांचे यात्रेकरू २५ मैलांची कैलासाची प्रदक्षिणा सुमारे ३ दिवसांत आटपतात. मार्गांत गौरीकुंड असून तें नेहमी थिजलेलें असतें. [शेरिंग- वेस्टर्न तिबेट अँड दि ब्रिटिश बॉर्डरलंड; अट्कीन्सन—हिमालयन गॅ; वाडेल—बुद्धिझम् ऑफ तिबेट].