विभाग अकरावा : काव्य - खतें
कोइंब्रा— हे पोर्तुगालच्या एका जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे. हे मान्डेगो नदीच्या काठी असून लिसबन्-ओपोर्टो रेल्वेवर आहे. येथील लोकसंख्या १९०० मध्ये १८,१४४ होती. येथे असलेल्या विश्वविद्यालयामुळे याला महत्त्व आले आहे. या विद्यालयात ईश्वरशास्त्र, कायदा, वैद्यकी, गणित व तत्त्वज्ञान ह्या पाच शाखा आहेत व त्याच्या ग्रंथशाळेत सुमारे १,५०,००० पुस्तके असून, त्याची एक मोठी प्रयोगशाळा आहे. कोइंब्रा येथे लष्करी विद्यालय, कलांचे विद्यालय, शास्त्रीय व वाङ्मयात्मक संस्था आहेत.
पुष्कळ वर्षे पावेतो हे शहर मूर लोकांच्या ताब्यात होते. परंतु १०६४ मध्ये पहिल्या (कॅस्टाईलच्या) फार्डिनांडने घेतले. १२६० पर्यंत ही त्या देशाची राजधानी होती. येथे ६ राजांचा जन्म झाला. "फ्रान्सिस्को सा डि मिरान्डा" या कवीचा येथे जन्म झाला. १७५५ त भूकंपाने या शहराचे बरेच नुकसान झाले. मार्शल मासेनाच्या आधिपत्याखाली सन १८१० मध्ये फ्रेंच लोकांनी हे शहर लुटले. १८३४ मध्ये डाग मिग्वेल याने हें शहर आपलें मुख्य ठिकाण केले. येथें १८४६ मध्यें मिग्युएल बंड झाले.