विभाग अकरावा : काव्य - खतें
कोइरी— एक शेतकरी जात. यांची वस्ती बिहार-ओरिसा, संयुक्तप्रांत, बंगाल व आसाम यांतून आहे. १९११ त यांची संख्या १७,६६,७९६ होती. कोइरी, कोरी हा शब्द संस्कृत कृषिकारी यावरून झाला असावा. कोइरी म्हणजेच सुधारलेले कोल जातीचे लोक हा नेस्फील्डचा तर्क असंभवनीय दिसतो. कुर्मी जातीशी या लोकांचे बरेच साम्य असून, डॉ. वाइजच्या मते बंगल्यांत कोइरी हे कूर्मीबरोबर रोटीव्यवहार करीत नाहीत. उलट कूर्मी हे कोइर्यांच्या लग्नास जाऊन मेजवान्याही झोडू शकतात व त्यात त्यांना जात बाटली असे वाटत नाही. कर्नल डाल्टनच्या मते कोइरी लोक हे बंगालमधील प्राचीन आर्याचे वंशज असावे. या लोकांत काही अनार्यसंबंध असणे शक्य आहे, पण या प्रश्नांसंबंधीही वाद आहेत.
या लोकांच्या अनेक पोटजाती असून निरनिराळ्या जिल्ह्यांतील त्याची नावे भिन्न प्रकारची आहेत. काही पोटजाती स्थानिक आहेत. सर्वारिया, प्रयाग, कनौजिया, इलाहाबादी, ब्रिजवासी, पुरभैया, दक्षिणी, बनारसीया, मगही, कच्छवाह, नाराइगण, तोरिकोरीय, हर्दिष, बर्डावार, भक्तिया, सक्रिया, इत्यादी पोटजाती मुख्य आहेत. एकंदर पोटाजीतींची संख्या खानेसुमारीवरून पाहता १४० च्या वर आहे व हे सर्व भेद स्थानिक स्वरूपाचे आहेत. त्याचप्रमाणे बैरागी, बैश्वर, हुराकीया, राठोड व सुरजवंशी इत्यादी नावें इतर प्रसिद्ध जातींवरून पडलेली आहेत.
पोटजातीमध्ये चटई नावाचे एक बंधुमंडळ असते व त्यामध्ये ज्ञातिविषयक सभा होतात. मिर्झापूर येथे साक्रिया पोटजातीच्या १४ चटई आहेत. प्रत्येक चटईचा चौधरी उर्फ पुढारी असतो. लग्नप्रसंगी विशिष्ट चटईच्या लोकांनांच निमंत्रण असते व त्यामुळे बराच खर्च वाचतो. चौधर्याकडे लग्नचिठ्या पाठविण्याचे काम असते व त्याप्रसंगी पंचायती ताट व पंचायती हंडा ठेवितात. नंतर पंचायतीपुढे कोणत्या चटईच्या मनुष्याचा कोणाशी विवाह व्हावयाचा हे ठरते. पंचायतीने निकाल दिल्यानंतर ब्राह्मणाकडून मुहूर्त वगैरे ठरविण्यात येतात. नंतर वधुवर पक्षाकडील लोकांसमक्ष चौधरी त्या लग्नास परवानगी देतो. यानंतर ब्राह्मणास दक्षिणा देऊन वधुवरांचे बाप तंबाखू ओढतात व या एकंदर विधीस 'रक्का उठावणी' असे म्हणतात. लग्नविधी ढोला पद्धतीनेच होतो. तिलक लावल्यानंतर वराच्या कपाळास अक्षता लावितात व वधूस नूतन वस्त्र देण्यात येते. लग्नसमारंभात स्त्रिया गाणी गातात. कन्यादान, तेलहळदी इत्यादी सर्व विधी करण्यात येतात. लग्ने चालविण्याचे काम ब्राह्मणाचे असते व त्यांना दक्षिणाही मिळते. गैरवर्तनाबद्दल स्त्रीला पंचायतीकडून चांगले शासनही करण्यात येते.
जन्मसंस्कार व मृत्यूसंस्कार हेही या जातीत आढळून येतात. षष्ठी व बारसे हे समारंभ रूढ असून मुलांची नखे काढण्याचा समारंभही करण्यात येतो. या सर्व विधीस विशेषतः स्त्रियाच महत्त्व देतात. मृतांचे दहन करून पिंडदान करण्यात येते. वर्षश्राद्ध करण्याची त्यांच्यांत रीत नाही.
साधारणपणे कोइरी लोक वैष्णव संप्रदायाचे आहेत. भक्त नावाच्या पोटजातीचे लोक आपल्या मुलांना भगत अथवा शाकाहारी बनवितात. पांचोपीर व महावीर या देवतांचे उपासक परस्परांत लग्नव्यवहार करीत नाहीत.
कोइरी लोक उत्तम शेती करणारे असून अफू, तंबाखू सर्व धान्ये व भाजीपाला यांची ते लागवड करतात. त्यांच्या सामाजिक चारित्र्यात बरीच शुद्धता आढळून येते. फक्त प्रयागा जात दारू पिते व भक्त नावाची पोटजात मांसाशन करीत नाही. ब्राह्मणांच्या हातची पक्की रसोई प्रयागा हे खातात व धोबी आणि चंभारहि ब्राह्मणांच्या हातची पक्की रसोई खातात. कोइरी जात मोठी उपयोगी व सुशील असून स्वावलंबी आहे. हे लोक सेवाधर्म फारसा स्वीकारीत नाहीत.
कोइरी व चांभार या जातींचा गोरखपूर भागात फार निकट संबंध आहे. या भागात कोरी अशी स्वतंत्र जात नाही. सर्व लोक कोइरी चांभार आहेत. तरीपण कोइरी चांभार या नावाऐवजी ते आपल्याला कोरीच म्हणवितात. त्याचप्रमाणे जेस्वर चांभार हे लोक आपल्याला फक्त जेस्वर असेच म्हणवितात. आसामांतील या जातींची लोकसंख्या १४,००० आहे. ब्राह्मणांना या जातीच्या लोकांच्या हातचे पाणी चालते. [सेन्सन रिपोर्ट. क्रूक]