विभाग अकरावा : काव्य - खतें
कोंकणस्थ वैश्य, इतिहास— वैश्यसमाज हा वैदिक त्रैवर्णिकांपैकी एक आहे. या समाजाची मूळ वस्ती गोदावरीतीरी मुंगीपैठण येथे होती. दुर्गादेवीच्या दुष्काळामध्ये या समाजाची पांगापांग होऊन निरनिराळ्या घाटांनी हे लोक कोकणात उतरले आणि त्यावरून त्यांना "कोंकणस्थ वैश्य" असे म्हणतात. महाराष्ट्रात हल्ली "वैश्य" या नावाने संबोधिले जाणारे पुष्कळ समाज आहेत. त्यातील बहुतेकांचा आज आपापसात रोटीबेटीव्यवहारही नाही. कोकणात जे दोन प्रमुख व्यापारी वैश्य-समाज आहेत. त्यापैकी प्रस्तुत समाज हा एक होय. हा समाज प्रथम रत्नागिरी जिल्ह्यातील प्रभानवल्ली व संगमेश्वर या दोन ठिकाणी उतरला आणि नंतर रत्नागिरी व कुलाबा या दोन जिल्ह्यांत व करवीर संस्थानात पसरला अशी माहिती मिळते. हल्ली कुलाबा जिल्ह्यातील महाड, माणगांव, रोहे व अलिबाग या तालुक्यात; रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, खेड, चिपळूण, संगमेश्वर व राजापूर य़ा तालुक्यांत आणि करवीर संस्थानांत कोल्हापूर व मलकापूर या ठिकाणी या समाजाचा बराच भरणा आहे. सुमारे पाऊणशे वर्षांपूर्वी या समाजाचे लोक मुंबईस आले व तेथेंही १० हजारांवर त्यांची वस्ती आहे. एखंदर सर्व कोंकणस्थ वैश्यसमाजाची लोकसंख्या एकलक्षावर आहे.
आजकाल महाराष्ट्रात जे इतर पांढरपेशे समाज आहेत त्यांचा कित्येक वर्षांपासूनचा इतिहास उपलब्ध आहे. त्याप्रमाणे प्रस्तुत समाजाचा पूर्वकालीन साद्यंत इतिहास पूर्ण स्वरूपात नाही. याला अनेक कारणे आहेत. मुख्य कारण एवढेच सांगता येईल की, ब्राह्मण, सारस्वत, प्रभू इत्यादी समाजाचा ऐतिहासिक कालांत राजकारणाशी प्रत्यक्ष संबंध आला. पण हा समाज व्यापारीवर्ग असून या समजाचा व्यापाराबाहेर फारसा संबंध आला नाही आणि त्यामुळे वरील समाजांप्रमाणें या समाजाचा साद्यंत इतिहास टिकणे शक्य झाले नाही. तरीपण मुसलमानी अमदानीत, अव्वल मराठेशाहीत व पेशवाईत हा समाज जिवंत स्वरूपात व भरभराटीत होता याबद्दल कागदोपत्री आधार आहेत. विजापूरच्या दरबारातून मुसुलमानी अमदानीत मिळालेल्या सनदा, शिवाजीच्या वेळी व अव्वल पेशवाईच्या वेळी निरनिराळ्या शेट्ये घराण्यांना मिळालेल्या शेटजीच्या सनदा त्या त्या घराण्यात आज अस्तित्वात आहेत. विशालगड संस्थानापैकी वायकूळ घराण्याच्या जुन्या दप्तरांत अजूनही पुष्कळ सनदा आहेत.
कोंकणांत या समाजाचा साधारण जम बसल्यावर समाजातील कित्येक प्रमुख पुढार्यांनी मुख्य मुख्य ठिकाणी पेठ वसवून तेथें जलमार्गाने व खुष्कीच्या मार्गाने येणार्या मालावर कर बसविण्याच्या सरकारांतून सनदा मिळाल्या. या करास "शेटजी" म्हणतात. आणि हा हक्क ज्यांना मिळाला त्यांना आज शेट्ये या नावाने ओळखतात. ह्याप्रमाणे महाड, खेड, चिपळूण, रत्नागिरी, संगमेश्वर, राजापूर वगैरे ठिकाणी मोठमोठ्या पेठा वसून खुष्कीने व जलमार्गाने निरनिराळ्या प्रांतांशी दळणवळण सुरू झाले. या ठिकाणचा बराच व्यापार पुष्कळ वर्षे वैश्यांच्याच हातात होता. रेल्वे सुरू झाल्यापासून घाटावरील माल पहिल्याप्रमाणे कोकणात उतरेनासा झाला व गुजराथ मारवाड येथील व्यापारी कोकणात शिरले त्यामुळे या समाजाचा कित्येक वर्षे असलेला व्यापार आज मंदावला आहे. तथापि अद्यापही महाड, चिपळूण, रत्नागिरी, खेड, संगमेश्वर, राजापूर या ठिकाणी कित्येक प्रमुख व्यापारी वैश्यच आहेत.
मुंबईमध्ये आल्यावर प्रथम छापखाना व तंबाखू या दोन व्यापारांमध्ये या समाजातील काही लोक पडून त्यात ते चांगले नावारूपास आले. देवळेकर, हेगिष्टे, खातु, मापुस्कर यांचे छापखाने चांगल्या भरभराटीत आले होते व त्यांनी संस्कृत भाषेतील अनेक जुने ग्रंथ छापून वाङ्मयाची चिरकाल टिकणारी अशी सेवा बजावली आहे. त्यांचे एजंट काशी, प्रयाग, दिल्ली, लखनौ, कराची, अहमदाबाद, वर्हाड, नागपूर, खानदेश, गोकर्ण, महाबळेश्वर, निजाम, हैद्राबाद वगैरे ठिकाणी पसरलेले होते. दुसर्या कित्येक मंडळींच्या तंबाखूच्या वखारी उत्तम प्रकारे चालल्या होत्या. कित्येक लोक कमिशन एजंटच्या धंद्यात पडले होते. सांप्रतही या सर्व धंद्यास हे लोक चिकटून आहेत. पान, तंबाखू, टेंभुरणीची पाने, किराणा माल व कापड या धंद्यात बरेच लोक आहेत.
सारांश कृषि, गोरक्षा, वाणिज्य ही जी वैश्यवर्गाची विविध कर्तव्ये आहेत ती अद्याप या समजाची सुटली नाहीत. कोकणात या समाजातील सर्वच लोक प्रामुख्याने शेतकी, गोरक्षण आणि व्यापार करीत आहेत. जिनिंग प्रेस, तांदळाची गिरणी वगैरे धंदे ज्ञातींतील सधन गृहस्थांनी चालविले आहेत. मुंबई, अहमदाबाद, हैद्राबाद वगैरे ठिकाणी बुकसेलरचा धंदा करणारे देखील काही वैश्य आहेत. शिवाय सरकारदरबारी मोठमोठ्या हुद्द्यांवर या समाजातील कित्येक मंडळी चढली आहेत. इतर सार्वजनिक कार्यातं भाग घेणारेही या समाजात आहेत. तसेच ग्रंथकार व लेखक वगैरेही आहेत.
कोंकणस्थ वैश्य समाजात मुंबईत कोंकणस्थ वैश्यजाती फंड, वैश्यविद्यावर्धक समाज, वैश्य संघ इत्यादी संस्था आज वैश्य समाजाच्या उन्नतीकरीता झटत आहेत. बाहेर गांवीहि अशा अनेक संस्था आहेत. कोंकणस्थ वैश्यज्ञातिफंड हा सन १८८७ मध्ये स्थापन होऊन आजपर्यंत शक्त्यनुसार समाजसेवा बजावीत आहे. या फंडातून लग्नकार्यादि शुभ कार्याकरिता महाजनवाडी, और्ध्चदेहिक कार्याकरिता धर्मशाळा मुंबईत उघडल्या असून एक दत्तमंदिर बांधले आहे. फंड एक लक्षाच्या वर आहे. 'वैश्य विद्यावर्धक समाज' सन १९०४ या साली स्थापन झाला व विद्यार्थ्यास शिष्यवृत्त्या देऊन शिक्षणासारखे पवित्र काम समाज करीत आहे. 'वैश्य विद्यार्थी संघ' ही संस्था सन १९१७ साली स्थापन होऊन विद्यार्थ्यांची सर्वतोपरी उन्नती करण्याकरीता अविश्रांत काम करीत आहे. शिवाय मुंबई येथे को. वैश्य ज्ञातिफंडाचे एक 'मोफत वाचनालय', माखजण येथे वैश्य मंडळींचे 'श्रीराम वाचनालय', रत्नागिरी येथे `बकुल' नावाचे एक साप्ताहिक पत्र, मुंबई येथे 'वैश्य मासिक' व 'वैश्य-धर्मोन्नतिमाला' वगैरे सुरू आहेत, कुलाबा जिल्ह्यात सासवने येथे वैश्य विद्याश्रम नांवाचे विद्यालय ज्ञातीने चालविले आहे.
मुंबई येथे को. वैश्य समाजाची एक पंचायत सभा आहे. या सभेकडून ज्ञातिविषयक कित्येक गोष्टींचा निकाल देण्यात येतो व तो बहुश: समाजाकडून पाळण्यातही येतो. बाहेरगावी कोकणात या़च पद्धतीवर समाजविषयक काम चालत असते. गावोगाव पंचायती असून तालुक्यावारी शेट्ये, महाजन असतात व त्यांच्याकडून झालेल्या निकालास सामान्यतः सर्व समाजाकडून मान देण्यात येतो.
सर्वसाधारणतः अशा प्रकारची कोंकणस्थ वैश्य समाजाची आज स्थिती आहे. शिक्षणाच्या बाबतीत दिवसेंदिवस प्रगतीच होत चलली आहे. निरनिराळ्या व्यापारात पडण्याकडे मंडळीच्या मनाची प्रवृत्ती होत असून त्याप्रमाणे औद्योगिक उन्नतीचे प्रयत्न होत आहेत. धार्मिकोन्नतीचा प्रश्नही ज्ञातीतील प्रमुख संस्थेने हाती घेतला असून त्या दृष्टीने शक्य ते प्रयत्न चाललेले आहेत. [बाळकृष्ण अनंत बेर्डे यांजकडून आलेल्या माहितीवरून].