विभाग अकरावा : काव्य - खतें
कोंकणी— हे प्रादेशिक नांव आहे. कोकणातून आलेले ते कोकणी. गुरव, कलावंत व गान, खारवे, न्हावी, शिंपी, गवळी, कुंभार, कुणबी, सुतार, लोहार, सोनार, चांभार, कोळी यांसारख्या जातींतून कोकणी आहेत. या जातीची विशेष वस्ती मुंबई-कानडा जिल्ह्यांत आहे. गुजराथेतही हे लोक आहेत. त्यांना कोकणी असे म्हणतात. सुरत जिल्ह्याच्या दक्षिण भागांत व धरमपूर आणि बांडा संस्थांनात या लोकांची मुख्यतः वस्ती असून १९११ साली त्यांची संख्या ७१,६७८ होती. ठाण्याच्या वाली लोकांप्रमाणे ही जात दिसते. नांवावरून ते कोकणातून आले असावे हे उघड आहे. शिवाय त्यांच्या भाषेत गुजराथी व मराठीचे मिश्रणही आढळून येते. इ.स. १३९६-१४०८ सालात पडलेल्या दुर्गादेवीच्या दुष्काळामुळे त्यांना उत्तरेकडे जाणे प्राप्त झाले असे म्हणतात.
बहुपत्नीत्वाची चाल त्यांच्यात असून विधवाविवाहही रूढ आहे. लग्न ठरविताना उभय पक्षांकडून सुरापान केले जाते व देणग्याही दिल्या जातात. हुंड्याची रक्कम ८ किंवा १० रुपयांपेक्षा जास्त नसते. लग्नापूर्वी वधूवरांना त्या त्या वेळेप्रमाणे व प्रसंगाप्रमाणे मिरवीत नेण्याची चाल असल्याचे आढळून येते. लग्नात त्यांना एका बैठकीवर बसवितात व त्यावेळी एक स्त्री त्यांच्या पदरास गाठ मारते. परस्परांनी नावे घेतल्यानंतर ती सोडण्यात येते. लग्नानंतर भात, रोटी व दारू यांची मेजवानी वधूच्या बापाने द्यावी अशी पद्धत आहे.
ब्रह्मा व वाघदेव यांची कोकणी लोक पूजा करतात. एखाद्या शमी वृक्षाजवळ ब्रह्मा नांवाच्या देवाची स्थापना केलेली असते. एका लाकडी स्तंभावर वाघाचे चित्र कोरलेले असते व त्यावर शेंदूर फासतात. कोकणी लोकांस ब्राह्मण उपाध्याय लागत नाही.
मृतास स्नान घालून नंतर त्यास स्मशानाकडे नेतात. प्रेतसंस्कार केल्यानंतर नदीत स्नान करून नंतर घरी येऊन दारू पिण्याची त्यांची वहिवाट आहे. मृताची राख भरून चौथ्या दिवशी आप्तास जेवण घालतात व वर्षअखेरीस मृताची रौप्य मूर्ती करून तिच्यापुढे दीप लावतात.
हे लोक मजुरी करतात व शेतीही करतात. ज्यांना शेतीकरतां बैल घेण्याचीही ऐपत नसेल असे कोंकणी स्वतःच नांगर ओढतात व अशा लोकांना 'हाथोडिया' असे म्हणतात. महाराष्ट्रातील कोकणी लोकांत गोमांतकी कोकणी म्हणून एक वर्ग आहे. त्यांची वस्ती विशेषेकरून मुंबई शहरात आढळते.
ठाणे— ठाणे जिल्ह्यातील कोकणी गंभीरगडचा डोंगरी किल्ला राखण्याकरिता आपले पूर्वज कोकणातून या भागात आले असे हे सांगतात. यांची राहणी गलिच्छ असून हे आपला परंपरागत शेतकीचा धंदा करतात. लग्नविधी ब्राह्मण चालवितो. लग्नाप्रीत्यर्थ ब्राह्मणाला दक्षिणा व जातिप्रमुख पाटलास शेलापागोटे देतात. उत्तरक्रियेच्या प्रसंगी ब्राह्मणाची जरुरी नसते. खंडोबा, देवी, चंद्र, सूर्य, चेदा, हिरवा वगैरेंना पूजतात. उपाध्याय ब्राह्मण नसतो. हिंदूंची व्रते व उपोषणे पाळतात. पाटील तंट्यांचा निवाडा करतो. हे मिश्रभाषा बोलतात. त्यात मराठीचा भरणा जास्त असतो. यांच्यात मुलांना शिक्षण देत नाहीत.
कानडा— येथील कोकणे आपणाला मराठे क्षत्रिय समजतात. इतर लोकही त्यांना शूद्रांपेक्षा उच्च वर्णाचे मानतात. यात सावंत, देसाई, साइल अशी आडनावे असून हे नावापुढे नाईक हे पद जोडतात. या कोंकण्यांची नावे महाराष्ट्रीय वाटत नाहीत. उदा. फकिरो, चौडो, कांडलो इत्यादी हे कोंकणी भाषा गोवॅनीज लोकांप्रमाणे हेल काढून बोलतात. निरंकार, महामाई, राऊळनाथ, खेत्री या देवतांना बळी देतात. हे महालय, श्राद्ध वगैरे करतात. गोवा, गोकर्ण, काशी व पंढरपूर या ठिकाणी हे यात्रेला जातात. कर्हाडे ब्राह्मण यांची भिक्षुकी करतात. बावा नावाचे यांच्या जातीचे उपाध्यायही आहेत. सदाशिवगडाजवळील कृष्णापूरच्या विठोबाला हे भजतात व भजनांत तुकारामाचे अभंग म्हणतात. यांचे आचारविचार सावंतवाडीकर मराठ्यांप्रमाणे दिसतात. प्रत्येक गावांत पंचायत असून बुधवंत हा त्याचा मुख्य असतो. हे लोक मुख्यतः शेतकरी पेशाचे आहेत.
त्रावणकोर— येथेही यांची वसाहत आहे. व्यापार हा यांचा सर्वसाधारण धंदा आहे. इतर वेळी मलबारी लोकांप्रमाणे यांचा पोषाख असतो. परंतु धार्मिक किंवा सणाच्या दिवशी पूर्वकिनार्यावरील ब्राह्मणांप्रमाणे असतो. यांच्या जातींत बरीच गोत्रे आहेत. होता होईल तो आतेच्या किंवा मामाच्या मुलीला वरण्याचा यांचा प्रघात आहे. यांचे वैवाहिक विधी जवळजवळ ब्राह्मणांसारखेच आहेत. [सेन्सस रिपोर्ट, (मुंबई व त्रावणकोर) मुं. गॅ. एन्थावेन].