विभाग अकरावा : काव्य - खतें
कोंकणी भाषा— कोंकणात बोलण्यात येणारी मराठी भाषा ही जास्त अनुस्वारयुक्त असते. याशिवाय तिच्यात (कांही शब्दपर्याय सोडल्यास) विशेष फरक होत नाही. कोंकणी असे विशेष नाव ज्या भाषेला आहे, ती गोव्याकडे आणि मालवणकडील भागात बोलली जाते. तिला गोमांतकी असेही म्हणतात. ही मराठीहून थोडीशी निराळी आहे. पहिल्याने इकडे सारस्वती म्हणून एक भाषा प्रचारात होती; पुढे कदंबराजवटीत तिची हळूं हळूं कानडी झाली. विजयानगरकराचे राज्य झाल्यावरही इकडे कानडीच सुरू होती. पुढे फिरंग्यांच्या अंमलात व मुसुलमानी रियासतींत त्या त्या भाषेची छाप बसून मूळच्या महाराष्ट्री भाषेत बराच फरक पडला. सांप्रत ही भाषा बरीच चमत्कारिक झाली आहे. शुद्ध मराठी भाषा बोलणार्याला ती एकाएकी समजत नाही. गोव्यात ती सर्वत्र सारखी आहे असे नाही. अंतराअंतराने तिच्यांत फरक पडतो. बुक्यानन म्हणतो की, गोवेप्रांतांत ५५ मैलांच्या टापूंत ही भाषा बोलतात. मोग्लींगचे म्हणणे असे आहे की, कोकणी भाषा बोलणारे लोक ही भाषा मराठीहून निराळी मानून तिचे व्याकरणही निराळे मानतात. परंतु व्याकरणाबद्दल मर्फी हा पुढीलप्रमाणे माहिती देतो :- 'कोकणी भाषेचे व्याकरण मराठीप्रमाणेच आहे असे निश्चितपणे सिद्ध होते. नामे व क्रियाविशेषणे ही एकाच विभक्तीने चालतात. या भाषेतील विशेष लक्षण म्हणजे, जे शब्द हिंदी व मराठी भाषेंत आकारान्त असतात ते कोकणात ओकारान्त होतात. हा प्रकार गुजराथी व मारवाडी या भाषांत दिसून येतो. मराठीतील काही अडचणी या कोकणीवरून समजून येतात. हिच्यात काही नियम अपूर्ण आहेत. या भाषेत सामान्य व्यवहारात संस्कृत शब्द बरेच आढळतात. हे शब्द शेणवी ब्राह्मण शुद्ध रीतीने उच्चारतात आणि गोमांतकांतील साधारण किरिस्ताव लोक त्यांचा अपभ्रंश करून बोलतात. उदा. उदक, वृक्ष, तृण असे शब्द शेणवी ब्राह्मण बोलतात व उदीक, रुख, तण हे शब्द किरिस्ताव बोलतात.'' हल्ली पोर्तुगीज भाषा फार प्रसार पावली आहे, त्यामुळे या कोकणी भाषेकडे सुधारण्याच्या दृष्टीने कोणी फारसे पाहात नाही.
या भाषेत पूर्वी काही कथा व काव्यही झालेले आहे. नायकस्वामी, सांतबानायक, सोहिरोबा आंबिये इ. कवींनी या भाषेत काव्यरचना केली आहे. हल्ली गोव्याकडे जुनी कोकणी लौकिक गीते फार कमी ऐकण्यात येतात. या गीतांचा संग्रह करणे अत्यावश्यक आहे. भाषाशास्त्रदृष्टीने या संकलनाचा बराच उपयोग होईल. कोकणी भाषेत ग्रंथरचना अगदीच अल्प आहे; ती वाढविली पाहिजे. पूर्वीचा एखादा मोठा ग्रंथ या भाषेत रचलेला ऐकण्यात नाही. काही लोक स्टिफेनच्या ख्रिस्तपुराणास कोंकणी भाषेतील ग्रंथ म्हणतात आणि याप्रमाणेच आणखी काही ग्रंथांस कोकणी भाषेचे म्हणतात; परंतु स्टिफेनचा ग्रंथ हा कोकणी नसून मराठी भाषेतील आहे, असे विद्वान लोकांचे म्हणणे आहे. हल्ली मुंबईस असलेले किरिस्ताव लोक ह्या कोकणी भाषेला पारखे होत चालले आहेत. मात्र पत्रव्यवहारात हे लोक कोकणी भाषा वापरून ती रोमन लिपीत लिहितात. गोमांतकांतील उच्च वर्गाची ओढ मराठीकडे फार आहे. कोकणी भाषेची प्रगती म्हणजे मराठीचा अपकर्ष असे जे त्यांचे मत दिसते ते वास्तविक नाही. परंतु ही प्रगती होण्यास फार प्रयास पडतील. मुंबईस आलेले किरिस्ताव इंग्रजी भाषा जास्त उचलीत चालले आहेत. त्यांच्यात इंग्रजी, हिंदी व कोकणी या तीनही भाषा प्रचारात आहेत. पुन्हा या त्यांच्या कोकणीवर पोर्तुगीज भाषेचीही छाप पडतेच. गोव्यांत तर या पोर्तुगीज भाषेचे दडपण फार पडल्याने तेथें कोकणी भाषेचे विकसन न होता ते मुंबईस होते. या भाषेची थोडी कल्पना येण्यास पुढे एक छोटासा उतारा देतो.
इन्दिरेच्यो शिरवळ्यो (सौ. शान्ताबाय वर्दे हिणें सांगिल्ली काणी) :- एक असलो म्हाळपै. तापची असली एक बायल. तिचे नांव इन्दिरी. ती मोटी करनखरी, पाडी, उंवाळलेली आसली. घोवान एक सांगल्यार ती दुसरेच करताली. एक फावट म्हाळपैक शिरवळ्यो खायनशो दिसल्यो. ताका सांमकी गांठ लागली. सुकून सुकून ताचो सामको भातकुटो जालो. तो मरचे तडीक पावलो. पुण सभागी करतलो कितें ? बायले फुढे ताचे शाणपण चालता? तिचेकडन उलशी माणुसकी आसं म्हाळपैच्यो हाडांक काती लागिल्ल्यो पळौन, शेजन्नीन ताका एकदीस विचाल्ले, `आरे म्हाकू. हाली तुझी सामकीच अवस्ता जाली ती किते?' ताणे म्हळे, `किते सांगू? व्हडले वा, म्हाका पिडा-रोग बी कायचना. म्हाका शिरवळ्या खायनशो दिसल्यात. पणून करून घालता कोण? आम गेले करनखरेक तूं वळखना?' शेजान्नीन. म्हळे, 'तंर तुका शिरवळ्यो मेळपाची आस्ता ना तू तिका सांग : तुजो म्हणचे वेय यवेपाचो आसं. ताका तूं जाय जाल्ली पोळी करून घाल. शिरवळ्यो मात नाका.' म्हाळपैक घरा गेलो आनी बायलेक ताणें तशेंच सांगलें, इन्दिरी दळूंक बसली. तेन्ना घोवान तिका म्हळें 'आज चंडशे तांदूळ दळटा तूं?' तिणे बोंचो मुड्डून जाप केली, 'तुज्यो त्यो लातबडायो म्हाका नाकात. शिरवळ्यो करूं नाका म्हणून सांगूंक, तू कोण? म्हंजे सोयरूं म्हाकां फांटी सांगताले, आपल्या मांवाक आसं तो शिरवळ्यांचे, मोटो धोस्त. त्योच हांव करतली. तूं आपलो सांगशी: सान्नां कंर; वडे कंर; पोळे कंर. पणून हांव खैं आयकूंक आयल्यां ?'
[दणाईत व वागळे-गोमांतकाचा प्रा.अ. इतिहास; स्वयंसेवक व ४ अं. ५; विद्यासेवक व. १ अ. २]