विभाग अकरावा : काव्य - खतें
कोकनाडा, तालुका:— मद्रास इलाख्याच्या गोदावरी जिल्ह्याच्या समुद्रकिनार्यावरील हा एक तालुका असून याचे क्षेत्रफळ २९७ चौ. मैल आहे. १९२१ साली याची लोकसंख्या २,२९,१५१ होती. यांत कोकनाडा व सामलकोट या दोन शहरांचा व ९९ खेड्यांचा समावेश होतो. जमीन महसुलाचे उत्पन्न सुमारे ५३/४ लाख रु. आहे. याच्या किनार्यावर कोरिंग व इंजरम ही यूरोपियन वसाहतीच्या वेळी प्रसिद्ध असलेली बंदरे आहेत. कोरिंग जवळ तल्लारेवू येथे जहाजे बांधण्याचे काम होते. येथील मुख्य पीक म्हटले म्हणजे तांदूळ होय. या पिकास गोदावरी नदीच्या कालव्याचे पाणी देण्यात येते.
गांव- मद्रास इलाख्याच्या गोदावरी जिल्ह्याच्या कोकनाड तालुक्याचे हे मुख्य ठिकाण व बंदर आहे. एम.एस.एम. रेल्वेच्या सामलकोट जंक्शनपासून या शहराला एक फाटा गेला आहे. हे मुंबईपासून ८५० मैलांवर आहे. हे गोदावरी नदीच्या पूर्वेकडील शाखेच्या मुखाजवळ कोकनाड उपसागराच्या वरच्या बाजूस आहे. तैलंगणात हें गाव फार स्वच्छ आहे.
इ. स. १९२१ साली याची लोकसंख्या ५३,३४८ होती. रामायणातील काकासुराचे हे निधनस्थान समजले जाले. म्हणून तेलगूंत यास `काकिनाडा' (कावळ्याचे स्थान) म्हणतात. हे इतिहासदृष्ट्या महत्त्वाचे नाही. याच्या जगन्नाथपुरम् नावाच्या भागात पूर्वी डच लोकांनी वखार बांधली होती. परंतु ती १८२९ त ब्रिटिशांच्या ताब्यात दिली गेली. १७५९ त कर्नल फोर्डने मच्छलीपट्टण सर केल्यानंतर फ्रेंच लोकांनी आपले सैन्य दोन वेळी या ठिकाणी उतरविले होते. परंतु त्यांना सहज रीतीने तेथून हुसकविण्यात आले.
कोरिंगचा उपसागर जेव्हा माती जमून जमून निरुपयोगी झाला तेव्हां कोकनाडास महत्त्व आले. यांत दौलेश्वरम् पासून दोन कालवे काढले आहेत. एक सालमकोट मधून व दुसरा रामचंद्रपूरम् तालुक्यामधून जाऊन दोन्हीहि एका खाडीत नेऊन सोडले आहेत व अशा रीतीने जिल्ह्यातील जलमार्गाशी याचा संबंध जोडला आहे. येथे म्युनिसिपालटी १८६६ त सुरू झाली.
मद्रासच्या उत्तरेस कारोमांडलच्या किनार्यावर हे मुख्य बंदर आहे. यात रेल्वे सुरू झाल्यापासून व उपसागरात मातीचे पुष्कळ थर जमल्यामुळे याचे महत्त्व बरेच कमी झाले आहे. हे बंदर घेतांना, वकलप्पुडीच्या दीपस्तंभापासून काही अंतरावर असलेल्या बंदरात शिरण्याच्या मार्गापासून सुमारे पावणे पाच मैल दूर व ३० फूट खोलीच्या पाण्यात जहाजे नांगरली जातात. यातून इंग्लंड, फ्रान्स आणि बेल्जम येथे कापूस, फ्रान्सांत आणि इंग्लंडात तीळ वगैरे आणि सीलोन व मारिशस बेटांत तांदूळ जातो. रंगूनास तंबाकू जाते व तेथे तिचे चिरूट बनवितात. तूप, कडधान्ये व एरंडीचे तेल बाहेर गावी पाठविण्यात येते. यांत युरोपियन व इंडियन यांच्या चेंबर ऑफ कॉमर्स संस्था व एक पोर्ट कॉन्झर्वन्सी बोर्ड आहे.
यांत एक खाजगी मिठाची वखार आहे व पेनुगुड्यूरूजवळ काही मैलावर सरकारी मिठागरे आहेत. यात धान्य दळण्याच्या गिरण्या, तेल काढण्याच्या चक्क्या, एक लोखंड ओतण्याचा कारखाना आणि चुट्टे वळण्याच्या काही वखरी आहेत. गांवांत तेलाचे, तंबाकूचे, तांदूळ सडण्याचे, सरकी काढण्याचे व कापूस दाबण्याचे बरेच कारखाने आहेत. परंतु मुख्य धंदा म्हणजे दर्यावरील व्यापार होय.
यात १८५२ सालात मिठापुरमच्या राजाने एक कॉलेज स्थापले. दुसरे पी. आर. कॉलेज व दोन हायस्कूलेंही आहेत. सरकारी ट्रेनिंग कॉलेज व मुलींच्या शाळाही आहेत. येथे छापखाने पुष्कळ असून छपाईही स्वस्त असते. १९२३ त अडातसावी राष्ट्रीय सभा येथे भरली होती.