विभाग अकरावा : काव्य - खतें
कोकंब— कोकंबाच्या बियांपासून तेल काढतात. हे शेकडा तीसपर्यंत निघते. तेल दोन तर्हेने काढतात. बिया फोडून वरची टरफले काढून टाकतात. नंतर आतील गर उखळांत कुटून पाण्यात उकळतात. थोडा वेळ उकळल्यावर पाणी गार होऊं देतात म्हणजे तेल वर येते. त्याचे लहान-लहान गोळे किंवा वड्या करतात. दुसरी रीत अशी की, वरीलप्रमाणेच बिया कुटून त्या पाण्यात यातून ते पाणी रात्रभर तसेच ठेवून देतात. सकाळी तेल वर येईल तेवढे काढून घेऊन राहिलेले पाणी रवीने ताकासारखे घुसळतात म्हणजे लोण्याप्रमाणे पाण्यांवर तेल येते. थंडीच्या दिवसात तेल चांगले (पुष्कळ) निघते. घुसळून काढलेले तेल स्वच्छ असते. तेलाचा उपयोग आमांशावर, थंडीने आग फुटते त्यावर व पावसाळ्यांत चिखलाने पाय कुजतात, त्यावर लावण्यासाठी चांगला उपयोग होतो. कोकंब तेलाच्या मेणबत्त्या करण्यासाठी उपयोग होईल परंतु तेल मात्र भरपूर मिळाले पाहिजे.
कोकंबाच्या फळांपासून कोकमसाले (आमसोले) तयार करतात. एप्रिल महिन्यात फळे चांगली पिकल्यावर ती फोडून बिया वेगळ्या काढतात आणि रस व साले एके ठिकाणी एका भांड्यात वाटतात. बिया पिळून त्यांचे पाणी यात टाकतात. बिया वाळवितात. साले उन्हात वाळवितात; व ती वाळल्यानंतर पूर्वी काढलेल्या रसांत ऊकळून पुन्हा वाळवितात. याप्रमाणे त्यांना चार-पाच पुटे दिल्यानंतर ती विकण्यास तयार होतात. मालवण, गोवा वगैरे ठिकाणी कोकमसाले तयार करतात. आमसुलांचे सार व चटणी करतात. त्यांचा उपयोग चिंचेऐवजी भाजीत घालण्याकरिताही करतात. आमसुले वैद्यकांत उत्तम पित्तशामक म्हणून वर्णिली आहेत.