विभाग अकरावा : काव्य - खतें
कोका- इरिथ्रॉक्सिलॉन ह्या वर्गातील झाडांच्या एकंदर पन्नास जाती आहेत. ही झाडे उष्ण प्रदेशांत होतात. हिंदुस्थानात या वर्गाच्या सहा जाती आहेत.
पहिली इ. कोका. या जातीची झाडे दक्षिण अमेरिकेच्या निरनिराळ्या भागांत आढळतात. परंतु ही झाडे मूळची पेरू व बोलिव्हिया येथील आहेत.
हिंदुस्थानातील लागवड- इ. स. १८७० त सिलोनमध्ये कोका जातीच्या झाडांची लागवड करण्यात आली. पुढे कोकेनच्या उपयोगाचा शोध लागल्यामुळे युरोपातून कोकाच्या पानांस बरीच मागणी होऊ लागली. याच सुमारास कोका झाडाची लागवड चहाच्या मळ्यातून सुरू होऊ लागली व हिंदुस्थान सरकारने कोकाची पाने तयार करण्याबद्दल माहिती दक्षिण अमेरिकेतून मागविली. निलगिरी पर्वताची उतरण, मद्रास इलाख्यांतील काही भाग, आसाम, सिलहत व हिमालयपर्वताचा १०० पासून २००० फूट उंचीचा प्रदेश या ठिकाणी या झाडांची लागवड करण्याचे प्रयोग केले आहेत. या झाडास थोड्या धुक्यापासूनसुद्धा इजा होते व त्यास पाऊस बराच लागतो.
काही जातींच्या झाडांपासून निघणार्या कोकेनचे स्फटिकीभवन होत नाही; याकरिता झाडाची जात नीट निवडून घ्यावी लागते. याच्या लागवडीला जमीन ओलसर व सुपीक लागते व पीक काढल्यानंतर जमिनीतील कस निघून जात असल्यामुळे नवीन खत घालणे जरूर असते. रोप लावल्यानंतर १८ महिन्यांनी पाने काढता येतात व एकदा लावलेल्या झाडांची पाने ४० वर्षेपर्यंत काढता येतात.
झाडांची पाने जेव्हा कडक होऊन वाकविली असता मोडतात तेव्हा ती काढतात. सुपीक जमिनीतील झाडापासून एखा वर्षात दोन अथवा तीन वेळा पाने काढता येतात. वाळलेली पाने एक दोन दिवस ठेवून नंतर (वातागम्य) डब्यात ती भरतात. ही पाने होता होईल तितक्या लवकर जहाजावर चढवावी, कारण ती उष्णकटिबंधापेक्षा समशीतोष्ण कटिबंधात जास्त दिवस टिकू शकतात. या पानांतील आल्कलॉईड व क्षार व्यापाराकरिता वेगळे करण्याचा प्रयत्न हिंदुस्थानात आजपर्यंत झाला नाही. या पानातील आल्कलॉईड व क्षार ही दोन्ही मादक असून ती शरीराच्या कोणत्याही भागास लावली असता तो भाग बधिर होतो.
व्यापार- सर्व जगास कोकेनचा पुरवठा दक्षिणअमेरिकेतून होतो. इ.स. १९०३ मध्ये पहिल्याने १४०० औंस कोकेन हिंदुस्थानात आले. त्याची किंमत १८४४२ रुपये होती. कोकेनचा उपयोग लोकांनी करू नये म्हणून सरकारने कायदे केले आहेत. परवान्याशिवाय कोकेन विकणे कायद्याने मना केले असून त्याची गणना मादक पदार्थांत केली आहे.