विभाग अकरावा : काव्य - खतें
कोकिल- कोकिलपक्ष्याकडे हिंदुस्थानात व पाश्चात्य देशांतहि प्राणिशास्त्रकोविदांचे तसेच इतर लोकांचेही कोणत्याही पक्ष्यांपेक्षा अधिक लक्ष वेधले आहे. या पक्ष्यासंबंधी पुष्कळ दंतकथा प्रचलित आहेत. पुष्कळ विद्वानांनी याच्यावर पुस्तके व लेख लिहिलेले आहेत. आपली अंडी दुसर्याच्या घरट्यामधून ठेवून ती उबवून घेण्याची यांची विचित्र पद्धतीच विद्वानांचे लक्ष्य वेधून घेण्याला कारणीभूत झाली आहे. हिंदुस्थानात कोकिलाला संस्कृतात परभृत, अन्यभृत अशी नावे दिलेली आढळतात. शाकुंतलमध्ये, स्त्रियांचे अशिक्षितपटुत्व सिद्ध करण्याकरिता, दुष्यंत हा दुसर्याकडून आपल्या पिलांचे संगोपन करून घेणार्या कोकिलाचा दाखला देतो. त्यावरून आपल्याकडेही कोकिलासंबंधी पाश्चात्यांप्रमाणेच कल्पना होती हे सिद्ध होते. याशिवाय कोकिलांचा आवाज, त्याचे मधुर कूजित यामुळेही त्याला विशेष प्रकारचे महत्त्व प्राप्त झाले आहे. वसंतऋतूच्या आगमनाबरोबरच कोकिल हा आपले आगमन आपल्या मधुर वाणीने सूचित करतो. यूरोपमध्ये व ध्रुवप्रदेशातही उन्हाळ्याच्या दिवसात म्हणजे एप्रिल महिन्याच्या प्रारंभापासून कोकिलांचे कर्णमधुर आलाप ऐकूं येऊं लागतात. वर्षाच्या इतर ऋतूंमध्ये तो आफ्रिकेत असतो, असे पाश्चात्यांचे म्हणणे आहे. प्रथमत: उन्हाळ्याच्या सुरुवातीस, पुंस्कोकिल आपले आगमन जाहीर करतो व थोड्याच दिवसांनंतर स्त्रीकोकिलहि त्याच्या पाठोपाठ येतो. या पुंस्कोकिलांच्या मध्ये स्त्रीकोकिलाबद्दल भांडणे सुरू होतात व शेवटी ज्याच्या त्याच्या कर्तृत्वाप्रमाणे ज्याला त्याला एखादी कोकिला मिळते. दिवसाप्रमाणेच रात्रीही यांचे गाणे चालूच असते. वर्षाऋतू प्राप्त झाला की हे कोकिलपक्षी कोठे गडप होतात कोणास ठाऊक? युरोपमध्येही अशीच स्थिती नजरेस येते. जसजसा ग्रीष्ण ऋतू संपण्याच्या बेतात येतो तसतशी या कोकिलांच्या आवाजातील माधुरी कमी कमी होऊ लागते. नंतर पुढे ग्रीष्णऋतू संपला की यांचे कूजन बंद होते व जुलैच्या मध्याला व फार झाले तर जुलै अखेरनंतर यांचा पत्ताहि लागत नाही.
कोकिलांमध्ये प्रजोत्पत्ती कशी होते याचे यथार्थ ज्ञान अद्यापीही कोणाला नही. तरीपण पाश्चात्य शोधकांनी यासंबंधी पुष्कळ प्रयत्न केले आहेत व अद्यापीही त्यांचे प्रयत्न चालूं आहेत. कोकिला ही आपली अंडी ज्यांच्या घरट्यात ठेवते त्या पक्ष्यांची अंडी ती बाहेर फेकून देते व त्या जागी आपली अंडी ठेवते व नंतर त्या अंड्यांचे ते पक्षी आपली अंडी समजून संगोपन करतात असे आढळून आले आहे. सप्टेंबरच्या सुमारास ही पिल्ले उडू लागतात व नंतर ती आपल्या आईबाबांच्या निवासस्थानाकडे जातात. कोकिला ही आपले अंडे दुसर्या पक्ष्याच्या घरट्यात ठेवण्याच्या कामी आपले चातुर्य व्यक्त करते. डर्मस्टॅट परगण्यातील अॅडाल्फ मुल्लर नावाच्या एका जंगली मनुष्याने दुर्बिणीच्या सहाय्याने यासंबंधीचा प्रकार पाहिला. कोकिला ही आपले अंडे हळूच आपल्या चोचीत धरून दुसर्या पक्ष्याच्या घरट्यात कशी ठेवते यासंबंधीची साग्र हकीकत त्याने दिली आहे. कधीकधी या पक्ष्याचे व कोकिलेचे भांडण होते; पण शेवटी हरप्रयत्नाने ती आपले अंडे त्या घरट्यात घुसडतेच. आपल्या अंड्यासारख्याच रंगाची अंडी घालणार्या पक्ष्याच्या घरट्यांमध्ये कोकिला ही आपली अंडी ठेवते, असे काही शोधकांचे मत आहे, पण त्यासंबंधी विद्वानांत मतभेद आहे. तथापि आपल्या अंड्यांसारखीच अंडी असणार्या पक्ष्यांच्या घरट्यात कोकिला ही अंडी ठेवते हे विधान पुष्कळ अंशी खरे आहे, असे मानण्यास पुष्कळ पुरावा आहे. हिंदुस्थान व इतर जगाचे भाग यामध्ये सापडणार्या कोकिलांमध्ये स्वरभिन्नत्वापेक्षा दुसरा फरक नाही व आहे तोहि फरक फारच सूक्ष्म आहे.