विभाग अकरावा : काव्य - खतें
कोकोनॉर- मध्य एशियामधील सरोवर. हे तिबेटच्या ईशान्येस ३७ उत्तर अक्षांश, १०० पूर्व रेखांशावर ९९७५ फूट उंचीवर आहे. या सरोवराच्या उत्तरेस नान-शान पर्वत व दक्षिणेस दक्षिण कोकोनार पर्वत आहेत. याची लांबी ६६ मैल व रुंदी ४० मैल असून त्यांत ६ बेटे आहेत. यापैकी एका बेटावर बौद्ध लोकांचा मठ आहे. त्यामुळे येथे यात्रेकरू येतात. सरोवराचे पाणी खारे आहे. तथापि त्यांत मासे पुष्कळ आहेत. हिवाळ्यात सरोवराचे पाणी तीन महिने गोठलेले असते. सरोवराला पश्चिमेस बुहेनगोल ही नदी मिळते.