विभाग अकरावा : काव्य - खतें
कोच जात- यांची वस्ती आसाम, बंगालांत, बिहार व ओरिसा यातून आहे. आसाममधील या जातीची लोकसंख्या २,३७,५७३ आहे. आसामांतील ही राष्ट्रजात नसून ती एक हिंदू लोकांची जात आहे व तिच्यात इतर राष्ट्रजातींतून हिंदुधर्म स्वीकारलेल्या लोकांना घेतात असे गेटचे मत आहे. ह्या लोकांचे बोडो जातीच्या लोकांशी साम्य असल्यामुळे ते मंगोलियन लोक असावे असेही पण त्याचें मत आहे. वरील ब्रह्मपुत्रा खिंडीत त्यांना शूद्र समजतात व ब्राह्मणांना त्यांच्या हातचे पाणी चालते. परंतु मध्य व पश्चिम आसामांतील जिल्ह्यांतून या लोकांचा इतका वरिष्ठ दर्जा समजला जात नाही. या जातीचे निरनिराळे पोटभाग आहेत व त्या प्रत्येकांतून धर्मांतर केलेल्या घराण्याला जावें लागते.
बंगाल्यांत कोचांचे निरनिराळे वर्ग असून प्रत्येक वर्गावर एक पुढारी (महंत) नेमिला असतो. महताची जागा वंशपरंपरा चालते महतावरचा मुख्य दिगरी महत किंवा परमाणिक महत नांवाचा असतो. या महतांच्या निकालावर साहेब गोसैन याच्याकडे अपील करावयाचे असते. (से. रि. १९११ बंगाल व आसाम).