विभाग अकरावा : काव्य - खतें
कौचाबंबा- हे बोलिव्हियांतील एक शहर आहे. दक्षिण अक्षांश १७०- २७' व पश्चिम रेखांश ६५० ४६' यांच्यावर हे आहे. लोकसंख्या (१९००) २१,८८६ आहे. बहुतेक लोक इंडियन व मेस्टिझो आहेत. हवा सौम्य व समशीतोष्ण आहे व सभोवारचा प्रदेश सुपीक व लागवडीस योग्य आहे. हे बोलिव्हियातील मोठे प्रगतीचे शहर मानले जाते. परंतु हे तुटक असल्यामुळे आता मागे पडले आहे. येथील वखारीत परकी माल बराच आहे. या शहराचे ओरूरोशी तारेने दळणवळण आहे. याची मांडणी व्यवस्थित असून बगीच्यांनी युक्त अशी बरीच मनोहर घरे येथे आहेत. येथे एक विश्वविद्यालय व दोन विद्यालये आहेत. परंतु त्यांना सरकारी मदत नाही. हे शहर सोळाव्या शतकात वसविले गेले व काही वेळ याला ओरोपेसा म्हणत असत. स्वातंत्र्य युद्धात या शहराने बराच पुढाकार घेतला होता. यावेळी स्त्रियांनी देखील स्पॅनिश लोकांवर हल्ला केला होता.