विभाग अकरावा : काव्य - खतें
कोचिन, संस्थान- हे एक देश्य संस्थान असून ते मद्रास सरकारच्या ताब्यात आहे. याला कोचिन हे नाव त्याच्या पूर्वीच्या राजधानीच्या शहरावरून पडलें. हल्ली हे शहर इंग्रजांच्या ताब्यात आहे. याचे क्षेत्रफळ १४१७ चौरस मैल आहे. या संस्थानाचे एकमेकांपासून विभक्त असे दोन मुख्य भाग आहेत. त्यांपैकी मोठ्या भागाच्या उत्तरेस मद्रास इलाख्यातील मलबार जिल्हा, पूर्वेस मलबार व त्रावणकोर संस्थाने, दक्षिणेस त्रावणकोर संस्थान व पश्चिमेस मलबार व अरबी समुद्र असून धाकटा भाग ईशान्य दिशेस आहे व याला मद्रास इलाख्यातील मलबार व कोइंबतूर या दोन जिल्ह्यांचे वेष्टण आहे. याला चित्तूर म्हणतात. याशिवाय या संस्थानाचे त्रावणकोर संस्थानांतहि कांही प्रांत आहेत.
स्वरूप वर्णन:- या संस्थानचे डोंगराळ, सपाट व समुद्रकिनारी असे निश्चित मर्यादेचे तीन भाग आहेत. यापैकी पूर्वेकडील डोंगराळ भाग म्हणजे पश्चिम घटपर्वताचेच एक अंग असून यानें या संस्थानचा अर्धा अधिक प्रदेश व्यापिला आहे. व या भागांत लांब लांब डोंगरांच्या ओळी, मोठमोठ्या दर्या, खिंडी, दाट झाडी, निबिड अरण्यें व एकमेकालगत व समुद्रसपाटीपासून ५००० फूट उंचीची डोंगरसपाटी अथवा पठारें आहेत. या भागांत साग व इतर जातवान झाडांची वने असून तो पालवी व फुलें यांनी प्रफुल्लित दिसतो. या भागाच्या पश्चिमेस मैदान आहे. यांतून पुष्कळ नद्या, ओढे वहातात. मैदानांतील बहुतेक सर्व प्रदेश लागवडीस आणलेला दृष्टीस पडतो. हे मैदान समुद्रकिनार्यावरील आखातापर्यंत पसरले आहे. आखात व समुद्र यामध्ये लांबट व अऱुंद असा वालुकामय प्रदेश आहे. या सर्व प्रदेशभर नारळाच्या झाडांची दाटी असून नैसर्गिक अथवा कृत्रिम बांध असलेल्या कांही भागांत भाताची शेते दृष्टीस पडतात. हा प्रदेश सखल पाणथल असून पर्जन्यकाळांत याच्या कित्येक भागांत पूर येतात. कोचीन संस्थानांतील मुख्य नद्या अलवाये, चालकुडी, कुरुमाली अथवा कुरुव्हन्नूर, पोन्नानी व अनइमलाई या आहेत. या संस्थानच्या नैसर्गिक स्वरूपासंबंधाने लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हटली म्हणजे समुद्राशी समांतर असलेली आखातांची साखळी ही होय.
शिवाय या संस्थानात एकमेकालगत अशी एनमाक्कल व मनक्कोडी नांवाची दोन मोठी गोड्या पाण्याची सरोवरे असून ती एनमाक्कल व चिरक्कल या ठिकाणी आखातास मिळाली आहेत. या संस्थानची एकंदर ७००० पेक्षा अधिक एकर जमीन लागवडीस आणली आहे.
या संस्थानांतील नेलिपथिस टेकड्यांवर वेलदोडे व कॉफी यांचे उत्पन्न होते. मैदानात फणस, आंबा, सुपारी व केळी ही उत्पन्ने होतात व समुद्रकिनार्यावर नारळाचे उत्पन्न होते. या संस्थानांतील जंगलात हत्ती, गवे, वाघ, माकडे वगैरे जनावरे आढळतात.
या संस्थानची हवा दमट असून तिच्या योगे उत्साह व तरतरी वाटत नाही. पण एकंदरीत ती प्रकृतीस मानवते. उत्तर भागापेक्षा दक्षिण भाग फार दमट आहे. चित्तूर तालुका पालघांटावर असल्यामुळे तेथील हवा कोरडी असून ती प्रकृतीस फार मानवते. लहान टेकड्यांवरील व चित्तूरच्या काही भागांतील हवा विशेषकरून उन्हाळ्यांत रोगट असते. तेथील उष्णमान एप्रिल महिन्यात ९६० व डिसेंबरात ६९० असून त्याचे सर्वसाधारण प्रमाण ८२० आहे.
या संस्थानात पर्जन्यवृष्टी नियमित असून बरीच आहे व तिचे प्रमाण सर्वत्र सारखे आहे. या संस्थानात दोन्हीही वार्यांचा पाऊस पडतो. येथील पर्जन्यवृष्टीचे प्रमाण त्रिचूर येथे १३६'', एर्नाकुलम येथे १०८'' व तत्तमंगलम येथे ६६'' या प्रमाणे आहे.
इतिहास- इ.स. ८५० पर्यंत या संस्थानाचा केरलच्या राज्यांत समावेश होत होता. याच सुमारास चेरमान पेरुमाल या शेवटच्या राजाने मुसुलमानी धर्माचा स्वीकार करून आपले गोकर्णापासून कन्याकुमारीपर्यंत पसरलेले राज्य आपल्या नातेवाइकाच्या स्वाधीन केले व आपण अरबस्तानात तीर्थयात्रेस निघून गेला. त्याचें थडगे त्याच देशांत सापडल्याचे ऐकिवांत आहे. सध्यांचे राजे त्याचेच वंशज होत. येथील राजांची शेजारच्या इतर राजांशी व विशेषकरून कालिकतच्या झामोरिनशी नेहमी झटापट सुरूं असे. इसवी स. १५०२ मध्ये पोर्तुगीज लोकांस कोचीन शहरी राहण्याची मोकळीक मिळाली व त्याच्या पुढच्याच वर्षी त्यांनी तेथें किल्ला बांधून सभोवतालच्या प्रदेशांत व्यापार करण्यास सुरुवात केली. पोर्तुगीज लोकांनी झामोरिन विरुद्ध कोचीनच्या राजास चांगली मदत केली. १५९९ त मेनेझस नावाच्या रोमन कॅथोलिक पाद्याने कोचीनपासून १२ मैल अंतरावर असलेल्या उदयम्पेरूर या खेडेगांवी एक धार्मिक सभा भरवून सीरियन ख्रिश्चन लोक पाखंडी आहेत असे ठरविले व त्यांच्या प्रार्थनेच्या पुस्तकांत दुरुस्ती केली. १६६३ साली डच लोकांनी पोर्तुगीज लोकांस कोचीन शहरातून घालवून दिलें. पुढे डच लोकांनी सलगीने कोचिनच्या राजापासून समुद्रकिनाऱअयावर कांही गावांच्या मालकीची सवलत मिळविली. १७५९ त डच लोकांच्या वैभवास उतरती कळा लागल्यावर कालिकतच्या झामोरिनने कोचिनवर स्वारी केली. पण कोचिनच्या राजाने त्रावणकोरच्या राजाच्या मदतीने त्यास परतवून लावले. या कामगिरीबद्दल कोचिनच्या राजाने त्रावणकोरच्या राजास काही मुलुख बक्षीस दिला. १७७६ त म्हैसूरच्या हैदरअल्लीने कोचीनवर स्वारी केली व तेथील राजास आपले सार्वभौमत्व कबूल करावयास लावून तो त्याजपासून खंडणी घेऊ लागला. १७९१ पर्यत कोचिनचा राजा म्हैसूरचा मांडलिक होता. याच वर्षी त्यानें इंग्रजांशी तह करून त्यांचें स्वामित्व कबूल केले व एक लक्ष रूपये खंडणी देऊं लागला. १८०८ साली पालीयथ अचन या पिढीजाद प्रधानाने त्रावणकोरच्या प्रधानाशी इंग्रजांच्या रेसिडेंटास मारण्याचा कट केला व राजाच्या नकळत इंग्रजी सत्तेविरुद्ध बंड केले. हे बंड मोडून इंग्रजांनी राजाशी नवा तह केला. त्यास पावणेतीन लाख रुपये खंडणी द्यावयास लाविली. या शिवाय इतर राजांशी पत्रव्यवहार न करण्याचे व आपल्या पदरी इंग्रजांच्या संमतीशिवाय कोणत्याही यूरोपियनांस न ठेवण्याचे कबूल केले. इंग्रजांस संस्थानांतील कोणत्याही किल्ल्यास तटबंदी करण्याचा अथवा न करण्याचा अधिकार होता. उलटपक्षी इंग्रजांनी संस्थानचे सर्व शत्रूंपासून संरक्षण करण्याची हमी घेतली. १८१८ त खंडणीची रक्कम २ लाख ठरविण्यात आली. पुढे या संस्थानात पुष्कळशा सुधारणा होऊन ते चांगले भरभराटीस आले. १८६२ त लार्ड कॅनिंग या गव्हर्नर जनरलने येथील राजास वारस नसल्यास दत्तक घेण्याची सनद दिली. सध्याचे महाराजे सर रामवर्मा हे १९१४ त गादीवर बसले. यांना १७ तोफांच्या सलामीचा मान आहे. १९२१ साली संस्थानिकाला महाराजा ही पदवी ब्रिटिश सरकारने दिली.
प्राचीन अवशेष- या संस्थानातील काही प्रदेशांत व विशेषेकरून उंचवट्यावरील भागांत पुरातन थडगी व त्याचप्रमाणे कोरीव लेणी आढळतात. कोरीव लेण्यांत तिरुबिलवामल व त्रिचूर येथील मुख्य होत. याशिवाय क्रांगूर येथील डच लोकांच्या किल्ल्याचे अवशेष, टिपूस थांबवून धरण्याकरिता बांधलेल्या भिंती व त्रिचूरचा किल्ला हे अद्यापि अस्तित्वात आहेत. या संस्थानात पुष्कळ पुरातन देवळेही आहेत. त्यामध्ये यांत त्रिचूर येथील वदकुन्नाथन व क्रांगूर जवळील तिरुवंचिकुलम ही मुख्य होत. मत्तांचेरी येथील घड्याळाचा मनोरा असलेले ज्यू लोकांचे देऊळ ३०० वर्षांचे आहे. याशिवाय पुरातन वास्तूंतील काही महत्त्वाच्या वस्तू म्हटल्या म्हणजे ज्यू लोकांचे ताम्रपट व ख्रिश्चन लोकांची देवळे ही होत. इ.स. १९२१ साली या संस्थानची लोकसंख्या ९,७९,०८० होती.
शेती- दरवर्षी पाऊस नियमित रीतीने व पुष्कळ पडत असल्याने येथील शेतीस कालवे वगैरेंची फारशी गरज नाही. चित्तूर तालुका व इतर काही भागांत मात्र कालवे वगैरेंची जरूर भासते. चित्तूर तालुक्यात अनिमलईचे कालवे असून इतर ठिकाणी लहान नद्या अडवून त्यांचे पाणी शेतीच्या उपयोगात आणतात. या संस्थनांत मुख्यत्वेकरून साळीचे पीक होते. येथील तांदळाच्या निरनिराळ्या पन्नास जाती आहेत. सखल प्रदेशांत तांदळाची दर वर्षी दोन पिके व उंच प्रदेशांत फक्त एकच पीक निघते व काही कालव्यांचे पाणी मिळणार्या अथवा अडवलेल्या नदीचे पाणी मिळणार्या चांगल्या जमिनीत दरवर्षी तीन पिकेंही निघतात. या संस्थानांतील रब्बीची पिके म्हटली म्हणजे नेहमीची कडधान्ये, केळी व इतर भाजीपाला, विड्याची पाने, सुपारी, सुंठ, ऊस, मिरी वगैरे होत. याशिवाय येथील वाळवंटात नारळाचे पीक होते. या संस्थानातून नारळाची निर्गत फार आहे. नेलिम्पथिस टेकड्यांवर ३१८२ एकर जमीन कॉफीची लागवड करण्यात गुंतली आहे. खरीपाच्या पिकाकरिता या संस्थानची १,३७,००० एकर जमीन उपयोगांत आणतात.या संस्थानांत म्हशीशिवाय इतर गुरे ढोरें अथवा मेंढ्या यांची मूळ उत्पत्ति होत नसून गाई व बैल अनुक्रमे कोइंबतूर व म्हैसूर येथून आणविली जातात.
या संस्थानांत कायमचे कालवे फक्त चित्तूर तालुक्यांतच आहेत. एकंदर कालव्यांची संख्या ६ असून त्यांपैकी २ संस्थानिक सरकारने बांधले आहेत आणि बाकीचे चार लोकांनी बांधले आहेत व याशिवाय संस्थानांत पाणी अडविण्याकिरता १६९ बांध आहेत. हे कालवे १७,००० एकर जमीनीस पाणी पुरवितात. प्रतिवर्षी संस्थानिक सरकार १७,००० रु. कालव्यांचा कर म्हणून वसूल करते.
१९२२ साली अभिरापल्लीचे धरण बांधण्यासंबंधी त्रावणकोर व कोचीन सरकार या दोहोंमध्ये एक योजना ठरली होती. छल कुडी नदीचा ओघ वळवून त्रावणकोर सरहद्दीनजीक असलेल्या अरण्यांतील पाच हजार एकर जमिनीस पाणी पुरविणे हा हेतू असल्यामुळे अर्थात हे सर्व त्रावणकोर सरकारने करावे असे ठरले. सुमारे वीस हजार एकर कोचीनमधील पिकास पाणी पुरविले जावे म्हणून इचिफ्युराचे खाली १२ मैल लांबीचे धरण कोचीन सरकारने बांधावे असे ठरले. कोचीनमधील जमिनीची लागवड उन्हाळ्यात होते. त्यावेळी कोचीन सरकारने सर्व पाणी घ्यावे. परंतु राहिलेल्या ऋतूंत त्रावणकोर संस्थानने सर्व पाण्यावर हक्क सांगावा, असे ठरले गेले. १९२३ जूनमध्ये कोचीन सरकारने एका इंग्रजी कंपनीचा अर्ज विचारात घेतला. निलगिरीतील पैकारा नदीच्या पाण्याचा पुरवठा करणारा प्रांत आपल्या ताब्यात असावा व तेथें सर्व पाणी जमा करण्याचा सर्व हक्क आपणास असावा असे या इंग्रज कंपनीचे मागणे होते. विद्युच्छक्तीची वाढ करण्याकरिताच या कंपनीला पाण्याचा सर्व हक्क हवा होता.
संस्थानातील जंगले- या संस्थानचा जवळजवळ ६०५ चौरस मैल प्रदेश जंगलांनी व्यापिला असून ती संस्थानच्या उत्पन्नाची मुख्य बाब आहे. जंगलांचे उत्तर व दक्षिण असे दोन भाग असून त्या प्रत्येकावर एक असिस्टंट कॉन्झरव्हेटरची नेमणूक केली आहे व या दोघांवर कॉन्झरव्हेटर देखरेख ठेवितो. पहिल्या भागांत मचाड व चित्तूर या दोन डोंगर ओळींचा समावेश होत असून दुसर्या भागांत कोदास्सेरी व परंबिकोलम या दोन रांगा आहेत. या दोन्हीही भागांत साग, शिसवीचे लाकूड व टेंबुरणीचे लाकूड व इरूल, अईनी व्हेंगाई वगैरे सर्पण उत्पन्न होते. परंबिकोलम, नेलिंपथिस व कोदास्सेरी या रागांत उत्तम इमारती लाकडांची पैदास होते. याशिवाय जंगलांचे इतर उत्पन्न म्हटले म्हणजे वेलदोडे, मध, मेण वगैरे जिन्नस होत. संस्थानांतील लोकांस जंगलांतून सर्पणाच्या मोळ्या, बांबू, कुंपणाचे काटे, खतांकरिता पालवी, शेतकीची आउते करण्याकरिता लाकूड, चारा, झोपडीचे गवत ही फुकत घेऊन जाण्याची मोकळीक आहे. १९०३-४ साली संस्थानास जंगलाचे उत्पन्न ५,८४,००० रु. झाले. या संस्थानांत चुनखडी, ग्रेनाइट व लॅटराइट या दगडांच्या खाणी असून लोखंड व अभ्रक या धातूही सापडण्यासारख्या आहेत.
व्यापार व उद्योगधंदे- या संस्थानांतील चित्तूर व तलपिल्ली तालुक्यांत सुती कापड निघते. सुबक कापड विणणे झाल्यास परकीय सुताचा उपयोग करतात. वदकांचेरी येथे निरनिराळ्या रंगांच्या उत्तम गवती चटया होतात. एर्नाकुलम व मत्तांचेरी येथे काथ्याच्या चटया व गालीचे तयार होतात.
या संस्थानांतील मुख्य औद्योगिक कारखाने म्हटले म्हणजे खोबर्याचे तेल काढण्याचे होत. याशिवाय येथे रोजच्या उपयोगांतील मातीची भांडी तयार होत असून त्रिचूर व मुकुंदपुरम तालुक्यांत दोन दोन कवलें व विटा तयार करण्याचे कारखाने आहेत. विपिन येथे व सोरानपूर जवळ लाकूड कापण्याच्या गिरण्या आहेत. मत्तांचेरी येथे नारळाच्या काथ्याचे दोर करण्याचे विजेचे कारखाने आहेत. विणकामाच्या धंद्यात साधारण प्रगति झालेली असून त्रिचूर येथील कातण्याच्या व विणण्याच्या सिताराम गिरणीचें भांडवल १९२० मध्ये वीस लाख रुपये इतके वाढले. १९२३ साली एकंदर ३०० माग यांत्रिक शक्तीने चालणारे असे होते. खोबरेल तेलाचा व्यापार एवढा वाढला आहे की, व्यापाराकरिता समुद्रातून जाणारी मोठाली जहाजे थेट बंदरांत येतात. इ.स. १९२१ च्या खानेसुमारी प्रमाणे यंत्राने चालणार्या तेलाच्या गिरण्या ९ आहेत. तीन चिरकामाच्या गिरण्या असून तेथें ४०० लोक काम करितात. कौल व विटांचे पाच कारखाने असून तेथील कामकर्यांची संख्या ४०० आहे. सहा रबराचे कारखाने आहेत व तेथील कामकर्यांची संख्या १४०० आहे. उपरिनिर्दिष्ट कारखानेच संस्थानांतील मोठ्या औद्योगिक संस्था होत. इ.स. १९२२-२३ साली छलकुडी येथे ६०,००० रुपये भांडवलाचा एक मातीच्या भांड्याचा कारखाना स्थापण्यात आला आहे.
या संस्थानांतून खोबर्याचे तेल, सूत, दोर, नारळाच्या दोर्या व चटया, खोबरे, सुपारी, सुंठ, मिरी, मासे इत्यादी जिन्नस बाहेर पाठविले जातात व बाहेरून तांदूळ, कापूस, सुती कापड, चाकू, कात्र्या, साखर वगैरे जिन्नस येतात.
१९०२ साली मद्रास रेल्वे कंपनीने शोरानूरपासून एर्नाकुलमपर्यंत एक आगगाडीचा रस्ता बांधला. एक ६५ मैल लांब असलेला व ७० लाख रुपये खर्च लागलेला रस्ता संस्थानिक सरकारने बांधला असून तो मद्रास रेल्वे कंपनी उपयोगात आणीत आहे. शोरानूर-नीलांबर रेल्वे काढण्याची वाटाघाट चालू आहे. संस्थानांतील पक्क्या रस्त्यांची लांबी ३९१ मैल; कच्या रस्त्यांची लांबी ५६ मैल आहे. याशिवाय समुद्रालगत जलमार्गाने व्यापार चालतो.
नवीन रस्ते बांधले जात असून सध्याची ट्राम्बेगाडी, संस्थानच्या रानातील उत्पन्नाच्या वाहतुकीकरिता अपुरी पडत असल्यामुळे तिचे क्षेत्र वाढविण्यांत येत आहे. वाहतुकीकरिता कायमच्या खुल्या असलेल्या रस्त्यांची लांबी वळणाचे दोन्ही रस्ते धरून ५२ मैल आहे.
राज्यव्यवस्था- कोचीन संस्थानाचे उत्तर व दक्षिण असे दोन भाग केले असून त्यांची मुख्य ठिकाणे अनुक्रमे त्रिचूर व एर्नाकुलम ही आहेत. यांपैकी प्रत्येक भाग एका अंमलदाराच्या ताब्यात असून त्यास पेशकार अशी संज्ञा आहे. हा अंमलदार जिल्ह्याचा न्यायाधीश असून त्याचा हुद्दा इंग्रजी मुलुखातील कलेक्टराच्या बरोबरचा असतो. उत्तर भगांत त्रिचूर तलपिल्ली व चित्तूर, हे तालुके असून दक्षिण भागांत कनयन्नूर, कोचीन, कांगनूर व मुकुंदपुरम हे तालुके आहेत. या प्रत्येक तालुक्यावर एका तहसिलदाराची नेमणूक केली असून त्याला दुय्यम प्रतीच्या न्यायाधीशाचा अधिकार असतो. याशिवाय नेम्मारकुन्नमकुलम व अदूर येथे तीन स्थायिक व मदतगार न्यायाधीश नेमले आहेत. तालुक्याचे आणखी ४४ विभाग आहेत. या सर्वांवर दिवाण हा मुख्य प्रधान असून त्याच्यावर सर्व राज्यव्यवस्थेची जबाबदारी असते.
संस्थानचे एकंदर उत्पन्न सुमारे ३० लाख आहे. ब्रिटिश सरकारला खंडणी २ लाख रु. द्यावी लागते. सध्या संस्थानांत इंग्रजी अमलाखालील प्रदेशात प्रचलित असलेली हिंदी नाणी प्रचारात आहेत.
१८६५ त इंग्रज सरकारने १,१०,५०० रु. उत्पन्नाची हमी घेतल्यावर संस्थानिक सरकारने तंबाखूच्या मक्त्याची वहिवाट बंद केली. संस्थानांतील इकडून तिकडे जणार्या मालावरील जकात उठविली; आपल्या बंदरावरील जकात इंग्रजी बंदराबरोबर आकारण्याचे ठरवले व मलबार जिल्ह्यांतील भावाने आपल्या मुलखात मीठ विकण्याचे ठरविले.
दिवाणी न्याय देण्याचे काम सहा मुन्सफकोर्टे, दोन जिल्हाकोर्टे व एक मुख्य कोर्ट यांजवर सोपविले आहे. फौजदारी न्याय देण्याचे काम मुख्य कोर्ट, दोन सेशन कोर्टे, दोन पहिल्या प्रतीचे जिल्हान्यायाधीश दहा दुय्यम प्रतीचे अथवा तिसर्या दर्जाचे न्यायाधीश याजवर सोपविले आहे. मुख्य कोर्टाचा निकाल कायम असतो. पण फाशीच्या शिक्षेस मात्र राजाची संमती लागते. मुख्य कोर्टात तीन न्यायाधीश असून त्यांपैकी एक युरोपियन बॅरिस्टर असतो.
कायदे करण्याकरिता ७ सभासद व एक अध्यक्ष यांची एक सभा नेमली असून तिची मुदत तीन वर्षेपर्यंत असते. कायदा करावयाचा झाल्यास पहिल्याने या सभेस कायद्याचा मसुदा करण्याविषयी विनंती करण्यात येते; व मसुदा तयार झाल्यावर दिवाण त्यांत योग्य ते फेरफार करून तो रेसिडेंटामार्फत मद्राससरकारकडे पाठवितो. मद्रास सरकारने तो पसंत केल्यावर तो राजापुढे सादर करण्यात येतो व त्याची संमती मिळाल्यावर त्याला कायद्याचे स्वरूप प्राप्त होते. कधी कधी कायदेमंडळाला न विचारतां देखील मसुदा तयार करण्यात येतो. विशेष प्रसंगी राजा आपल्या नावाने हुकुमनामे काढतो व हे हुकुमनामे कायदेच समजले जातात. संस्थानचे लष्कर २७६ शिपायांचे आहे. संस्थानात एखंदर ५९३ पोलिसशिपाई आहेत. १९२०-२१ साली एकंदर १७१ सरकारी व २७३ निमसरकारी संस्था होत्या. जुलै १९२३ मध्ये शाळेतील मुलांना अनेक सवलती देऊन, मागासलेल्या वर्गामध्ये शिक्षणप्रसार करण्याचा कोचीनसरकारने प्रयत्न केला. शैक्षिणकदृष्ट्या `मागासलेले' व `खालावलेले' असा भेद करून, संस्थानांतील इंग्रजी शाळांतून शिक्षण मोफत देण्याची संस्थानने तजवीज केली. कारण लोकांच्या वाढत्या दारिद्यामुळे अर्धी फी ठेऊनहि शाळेतील मुलांची संख्या कमी होऊ लागली होती. एर्नाकुलम येथे एक कॉलेज आहे. संस्थानांत एखंदर ३३ दवाखाने व इस्पितळे आहेत.
तालुका- हा एक समुद्रकिनार्यावरील विभाग व तालुका असून मद्रास इलाख्यांतील मलबार जिल्ह्याच्या दक्षिणेस आहे. याचे एकंदर क्षेत्रफळ २ चौरस मैल आहे. याची लोकसंख्या १९०१ साली २५८५९ होती. या तालुक्याचे मुख्य ठिकाण कोचीन बंदर आहे.
शहर- हे कोचीन संस्थानच्या सरहद्दीतील समुद्र किनार्यावर वसले आहे. शहराच्या उत्तर भागात कित्येक डच घरे दृष्टीस पडतात. हे शहर एक उत्तम बंदर असून तेथील पाण्याची खोली ७ पासून ९ पुरुष आहे. सध्या आगबोटी या बंदराच्या दोन मैल अंतरावर उभ्या राहतात.
पहिल्याने हे शहर एका लहानशा नदीच्या काठी होते. पुढे १३४१ त या नदीस महापूर आला व महापुराच्या योगाने जवळच्या प्रदेशाचे स्वरूप अगदी बदलून जाऊन पूर्वीच्या ठिकाणी बंदर व व्हिपीन बेट ही अस्तित्वात आली, अशी दंतकथा आहे.
इतिहास- या शहराचा स्वतंत्र इतिहास पोर्तुगीजांच्या आगमनापासून सुरू होतो. इ.स. १५०० साली येथे कॅब्राल आला होता. याचा येथील राजाने चांगला सन्मान केला. हा मिरी घेऊन पोर्तुगाल देशास परत गेला. १५०२ मध्ये येथे व्हास्को-ड-गामा येऊन त्याने एक वखार स्थापन केली. १५०३ मध्ये अलबुकर्क येथे येऊन त्याने येथील राजास झामोरिनविरुद्ध मदत केली. पुढे झामोरिनला परतवून लावल्यावर अल्बुकर्कने येथे मॅनुअल कोट्टा नावाचा एक किल्ला बांधला. १५०४ मध्ये झामोरिनने या किल्ल्यावर चाल केली. पण पॅचेकोने त्याचा हल्ला परतवून लाविला. १५०५ साली या शहरी अलमेडा नावाचा पोर्तुगीज गव्हर्नर येऊन त्याने किल्ल्याची डागडुजी केली. १५३० मध्ये येथे सेंट फ्रँसिस झेवियर येऊन त्याने पुष्कळ लोकांस ख्रिश्चन धर्माची दीक्षा दिली. १५७७ त जीसस नामक मंडळाने एतद्देशीय लिपीतील पहिले पुस्तक प्रसिद्ध केले. १५८५ त येथे राल्पफिश नावाचा पहिला इंग्रज प्रवासी आला होता. १६३४ त ईस्ट इंडिया कंपनीने येथे आपले ठाणे वसविले. १६६३ त हे शहर डच लोकांनी काबीज केले. डच अमदानीत येथील व्यापार बराच वाढला व येथील जकाती-वसुलाचा आकडा ३०००० रु. यावर येऊन ठेपला. डच लोकांनी या शहराच्या रचनेत बरेच फेरफार केले. १७९५ त इंग्रज लोकांनी हे शहर हस्तगत केले. १८१४ त हे शहर पूर्णपणे इंग्रजांच्या ताब्यात आले.
हे शहर मलबार किनार्यावरील तिसर्या दर्जाचे बंदर आहे. १९०२-४ साली येथील आयात व निर्गत व्यापार अनुक्रमे ८२ व २०८ लाख किमतीचा होता. येथून मुख्यत्वेकरून खोबर्याचे तेल व नारळाचे दोर बाहेरगावी जातात. येथे बाहेरून येणारे मुख्य जिन्नस म्हटले म्हणजे ब्रह्मदेश व बंगाल प्रांतातून येणारा तांदूळ होय. येथील व्यापाराचे इतर जिन्नस म्हटले म्हणजे मिरी, इमारती लाकूड, सूत, सुती कापड व घासलेट तेल हे होत.
मद्राससरकारच्या योजनेप्रमाणे १९२१ मेमध्ये कोचीन येथे बंदर करण्याच्या कामास आरंभ झाला. १९२३ त प्रयोगात्मक काम बहुतेक पुरे झाले. या कामाचा मूळ अंदाज ६ लाख होता तो ९ लाख झाला. कारण बंदराच्या आतील भागातील गाळ काढून खोली वाढविणे जरूर झाले होते. काम लवकर व्हावे म्हणून १९२२ त एक नवीन गाळ काढण्याचे यंत्र आणले. या योजनेच्या दुसर्या विभागाचा अंदाज ५५ लाख झाला. १९२३ मध्ये या योजनेचा प्रयोगात्मक भाग यशस्वी झाला. कारण मूळच्या कोचीन बंदरातील गाळ यंत्राच्या साहाय्याने नाहीसा झाला. या बंदराचा अंतर्बाह्य छेद करण्यात आल्याने इष्ट परिणाम झाला. कारण बंदरातील खोल पाण्यामुळे वेणदुरट्टी नावाचे बेट व एनाकुलम या दोहोंमधील खोल पात्र जोडले गेले व नियोजित दिशेने पाण्याची भरती-ओहटी सुरू झाली.
येथील हवा दलदलीत उष्ण असून पाणी विकारी आहे. येथे ५।६ हायस्कूले व तितक्याच मिशनरी संस्था आहेत. इंग्रजी व मल्याळी भाषेतली मासिके, वर्तमानपत्रे निघतात. २ फ्रेंच-इंडो-चीनच्या अगदी दक्षिण टोकाला ही एक फ्रेंचांची वसाहत आहे. याच्या पश्चिमेस सयामचे आखात वायव्य व उत्तर- कम्बोडिया, पूर्वेस- अनाम, आग्नेयीस चीनचा समुद्र आहे. क्षे.फ. २५६००० चौरस मैल लोकसंख्या १६९९००२९.
भूवर्णन- हा देश एक सुपीक मैदान आहे. अनाम हा पर्वत आहे. मेकांग, डोनाय, सायगॉन आणि वैको या मुख्य नद्या आहेत. याची हवा उष्ण व सर्द आहे. पावसाळा एप्रिल ते ऑक्टोबरपर्यंत असून पाऊस अति पडतो. उन्हाळा एप्रिल ते जूनपर्यंत असतो. यात वाघ, चित्ता, मुंगुस, डुक्कर, हरीण, रेडा, गेंडा, हत्ती, वानर इ. बदके, जलचर पक्षी सर्व वगैरे प्राणी आढळतात.
उत्पन्न आणि धंदे- तांदूळ, मिरी, ऊस, बुंद, कापूस, तंबाखू आणि ताग. शेतीकडे रेडे आणि घोडे यांचा उपयोग विशेष करतात. तांदळाच्या गिरण्या, साखर, तांदळाची दारू, रेशीम, मासे आणि मीठ हे मुख्य धंदे आहेत. येथून तांदूळ, वाळलेले अथवा खारे मासे, मिरी, कापूस वगैरे माल निर्गत होतो. येथील आयात- पक्का माल, धातू, लोखंडी सामान, यंत्रसामुग्री, चहा, मद्ये, खनिज तेले, अफू, कागद,हत्यारे आणि बंदुकीची दारू. या देशात सायगान आणि मिथो ही मुख्य बंदरे आहेत.
राज्य व्यवस्था- कोचीन चायना येथे एक लेफ्टनंट गव्हर्नर नेमला असून तो इंडो-चायना येथील गव्हर्नर जनरलच्या हुकमतीखाली असतो. त्याचे एक १६ जणांचे मंडळ असते. पैकी ६ सभासद फ्रेंच नागरिक ६ तद्देशीय आणि ४ सायगॉन येथील व्यापारी मंडळ आणि सल्लागार मंडळ यांनी निवडलेले असतात. या मंडळाकडे सर्व प्रकारची कामे सोपविलेली असतात. कौन्सिलप्रिव्ही हे सल्लागार मंडळ असून यांत २ तद्देशीय सभासद असतात. वसाहतीचे ४ भाग केले आहेत. प्रत्येक भागाच्या अधिकार्याला इन्स्पेक्टर म्हणतात. या भागांचे २० प्रांत आहेत. प्रत्येक प्रांतावर एक अॅडमिनिस्ट्रेटर व प्रांतिक कौन्सिल असते. प्रांताचे जिल्हा आणि काम्यून असे भाग असतात. काम्यूनमधील सर्व व्यवस्था तद्देशीय लोकांच्या हाती असते. प्रत्येक काम्यून एक मेबंर प्रांतिक कौन्सिलाकरिता निवडते. मेयर व दोन सल्लागार हे सर्व गावची व्यवस्था ठेवतात. जमीनमहसूल आणि डोईपट्टी ही उत्पन्नाची साधने आहेत. ९ मुख्य शहरांत फ्रेंच न्यायकोर्टे असून ४ शहरांत फौजदारी कचेर्या आहेत. या कचेर्यांत फ्रेंच किंवा अनामी कायद्यांप्रमाणे निकाल देण्यात येतो. दोन अपीलकोर्टे आहेत. जवळजवळ ६०० प्राथमिक शाळा आहेत. सायगॉन राजधानी असून तीनचार मोठी शहरे आहेत.
इतिहास- कोचीनचीनचा प्राचीन इतिहास ज्ञानकोश वि. १ यांत आलेला आहे. (पा. १९६-१९७). ९ पासून १२ व्या शतकापर्यंत कोचीनचीन हा ख्मेर राष्ट्राचा भाग होता. नंतर १५ व्या शतकापर्यंत चंपा राज्याच्या सत्तेखाली आला. १७ व्या शतकात याचा पूर्वभाग आणि १८ व्यात पश्चिम भाग अनामी लोकांनी घेतला. १८६७ मध्ये अनामी लोकांपासून फ्रेंयानी कोचीन-चायना घेतला. १८८७ मध्ये याचा इंडो-चायना यात समावेश करण्यात आला.