विभाग अकरावा : काव्य - खतें
कोट्टारू- मद्रास इलाख्यात त्रावणकोर संस्थानच्या अगस्तिवरम तालुक्यातील नागरकोईल गावचे उपनगर. त्यास प्रसिद्ध भूगोलशास्त्रज्ञ टॉलेमीने कोट्टियारा व्यापारी पेठ असें म्हटले आहे. हे प्युटिंजरच्या तक्त्यात कोट्टार म्हणून निदर्शित केले आहे व याला चोळ राजांच्या वेळी मुमुदीचोळपुरम असें नाव होते. कुलोत्तुंग चोलाने हे पांड्य राजापासून घेतले. कन्याकुमारीचे कोट्टारू हे नाव होय असें कुलोत्तुंगाच्या राज्याभिषेकाच्या १४ व्या व १५ व्या वर्षी खोदलेल्या लेखांवरून दिसते. (अय्यंगार- एन्शट इंडिया). प्राचीन काळी हे मोठ्या व्यापाराचे स्वतंत्र गाव होते. या ठिकाणी दूरदूरचे व्यापारी लोक येत असत. अद्याप दक्षिण त्रावणकोरमधील व्यापाराचे हे मुख्य ठिकाण असून येथे विणकामाचे कारखाने आहेत व उत्तम पोताचे कापड येथे तयार होते. येथे रोमन कॅथोलिक चर्च व इंग्रजी हायस्कूल आहे.