विभाग अकरावा : काव्य - खतें
कोठी- अठरा कारखान्यांत कोठी हा एक कारखाना असें. कोठीत धान्यसंग्रह विशेषेकरून करीत. परंतु जुन्या कागदपत्रांत खजिना, वखार किंवा कापडचोपड अथवा इतर सरकारी सामान साठवण्याची जागा या अर्थीही हा शब्द येतो. लष्कराची रसत पुरविणारे खाते यासही कोठी म्हणत. उ. `लष्कराची कोठी चालली किंवा लुटली' वगैरे. सामान्य अर्थ धान्यागार. या कोठीवरील अधिकारी तो कोठावळा. यावरूनच कोठवळे हे आडनाव प्रचारात आले आहे. प्रत्येक किल्ल्यावर धान्याची अशी कोठी असें. दारूच्या कोठारासहि काही जागी कोठी शब्द इंग्रज लावीत. तसाच वखार या अर्थी हा शब्द इंग्रज किंवा फिरंगी वगैरे टोपीवाल्यांच्या फ्याक्टरीना लावीत असत. कोठवळ्याकडे मुदबखखान्या (स्वयंपाक)वरील देखरेखीचे काम असें. राजाच्या मुदबखखान्याची व्यवस्था त्यानेच पाहावयाची असें. पेशवाई अखेर इंग्रजांच्या रेसिडेन्सीलाही कोठी म्हणू लागले होते. कोष्ट या संस्कृत शब्दापासून कोठी हा शब्द बनला आहे.