विभाग अकरावा : काव्य - खतें
कोंडपल्ली- मद्रास इलाख्यांतील कृष्णा जिल्ह्याच्या बेझवाडा तालुक्यांतील एक गाव. याच्या जवळच एक डोंगरी किल्ला असून त्याला कोंडपल्लीचा किल्ला असें म्हणतात. १९०१ मध्ये येथील किल्ल्यामुळे व उत्तर सरकारच्या राजधानीचे हे एक शहर असल्यामुळे पूर्वी या गावाला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. १३६० मध्ये कोंडउविडूच्या रेड्डी राजांनी हा किल्ला बांधला. १४७१ मध्ये बहामनी सुलतानाने ओरिसाच्या राजापासून हा किल्ला जिंकून घेतला पण पुढे पुन्हा तो ओरिसाच्या राजानी परत मिळविला. १५१५ साली विजयानगरच्या कृष्णदेवाने तो ओरिसाच्या राजापासून जिंकून घेतला. १५३१ मध्ये तो सुलतान कुली कुतुबशहाच्या हातात पडला. १६८७ साली औरंगझेबाच्या ताब्यात तो येऊन सुमारे ७५ वर्षे तो मोगलांच्या ताब्यात होता, पण १७६६ मध्ये निझामपासून जनरल कैलाडने तो जिंकून घेतला. इ.स. १८५९ पर्यंत त्या ठिकाणी ब्रिटिशांनी आपले लष्कर ठेवले होते. येथील किल्ल्याच्या आसमंतातील भागात हल्ली जिकडे तिकडे जंगल वाढलेले आहे, तरी अशा स्थितीतहि किल्ला अद्यापि प्रेक्षणीय आहे. या ठिकाणी डोंगरावर एक प्रकारचे हलके लाकूड मिळते व त्या लाकडापासून येथील लोक खेळणी तयार करतात.