विभाग अकरावा : काव्य - खतें         

कोतवाल- मराठी साम्राज्यांत कोतवाल म्हणजे सर्व पोलिस खात्यावरील मुख्य अंमलदार असें. परंतु हल्लीच्या इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस याच्या कामापेक्षा या कोतवालच्या तत्कालीन कामात बराच फरक होता. राज्यातील मोठमोठ्या शहरी असें कोतवाल असत. त्यांच्या हाताखालील कोतवालीत शिपाई असत. सातारा, पुणे, नगर, बर्‍हाणपूर, नाशिक, सोलापूर वगैरे ठिकाणी हे कोतवाल असत. राज्यांतील या निरनिराळ्या कोतवालीवर मुख्य अधिकारी (पुण्याचा राजधानीचा कोतवाल नसून) तो प्रांतीय सुभेदार असें. खात्यांच्या एकीकरणाची रीत ही फार अलीकडील आहे. कोतवालांच्या कामाचे स्वरूप पुढीलप्रमाणे असें :-

पुणे येथील कोतवालासंबंधी कलमे अशी:- (१) कसबा व शहर येथील पेठांमधील मोठमोठे कज्जे व न्यायमनसुभे कोतवालाने तोडावे (किरकोळ कज्जे पेठांच्या मामलेदारांनी तोडावे); व शिक्षा वगैरे करावी. (२) बाजारातील वस्तूंचे (धान्य, कापड वगैरे व्यापारी मालाचे) बाजारभाव ठरवावे आणि त्यांची रोजची यादी (रिपोर्ट) सरकारात धाडावी. (३) वेट, बिगार सरकारी कामास लागेल तिची व्यवस्था करावी. (४) सरकारास कारागिरांचे काम लागल्यास त्यांचा पुरवठा करावा. (५) जमिनीची खरेदी-विक्री शहरांत ज्यांना करावयाची असेंल त्यांनी कोतवालाच्या हुकुमाने ती करावी आणि योग्य तो सरकारी दस्तूर (फी) घेऊन कोतवालाने खरेदी-विक्रीचे दस्तऐवज सरकारी सहीशिक्क्यानिशी करून द्यावेत. (६) गावातील रयतेपासून पुढील कर वसूल करावे. (अ) पाट व मोहतूर करणारांपासून सव्वा रुपया व एक शेला; (आ) कापड वगैरे मोजण्याचा गज तपासून अगर नवा करून देताना शिरस्त्याप्रमाणे रक्कम घेणे (इ) नवीन वजने करून त्यावर छाप मारणे व त्याचा दस्तूर (फी) घेणे व जुनी मापे नेहमी तपासणे;(ई) पेंढारी लोकांपासून त्यांच्या ताकदीप्रमाणे दरेक घरामागे सालीना आठ आणे ते एक रुपयापर्यंत कर घेणे; (उ) दरेक तेल्यापासून दरेक घाण्यामागे दररोज ३ रुक्के घेणे (एक रुका एक पै); (ऊ) नागेश्वर परिदर्गा (शेखसल्ला?) व कसब्यातील चावडी येथे दरमहा अनुक्रमे ४३, ४६ व ४३ चे तेल दिवाबत्तीकरिता जाळणे. हा खर्च वजा जातां (बाकी वरील तेल्यांच्या दुकानांतील कराची जी बाकी) राहाल त्यात वरकड चौथरे (पोलीस चौक्या) व दिवट्या वगैरेस खर्च करावा, (ए) गावात ठिकठिकाणी दसर्‍यास गोंधळ होतो अगर बकरे मारितात त्या वेळी या प्रत्येक कृत्यामागे ६ रुके सरकारांत घ्यावेत (ऐ) भांग, गांजा वगैरेवरील कर दरमहा वसूल करावा; (ओ) लोकांची खानेसुमारी करावी (वार्षिक); (औ) शहरांतून रोज जाणार्‍या येणार्‍या एकूणएक लोकांची नावानिशीची यादी ठेवावी; (७) रस्ते, गल्ल्या व घरे यांचे कज्जे तोडावे; (८) जुवाबाजांनी कोतवालाच्या परवानगीशिवाय जुवे खेळू नयेत व त्या लोकांपासून कोतवाल्याने सरकारी ठराविक कर वसूल करावा. (९) कोतवाली (खात्याचा) हिशेब दरमहाचे दरमहा सरकारात दाखल करावे. (१०) गावात दौंडी फिरविण्याची व्यवस्था करावी. (११) शहरांतील सरकारी किरकोळ कर (भाजीपाला, धान्य वगैरे आय़ात मालावरील) जमा करावेत. (१२) पुण्यात कोतवालीचे कामाचे चावडीस बुधवारांत जागा नेमून दिली. (१३) शहराचा चौकीपहारा सतत करणे व रयतेवर जुलूम न करता रयत आबाद राखणे. (१४) सरकारी वसूल वेळेवर सरकारात जर भरला नाही तर कोतवालाने त्यावर आपल्या पदरचे दरमहा दर शेकडा १ रुपयाप्रमाणे व्याज दिले पाहिजे. (१५) सरकारी वसुलांतून नौकरीस ठेविलेल्या शिबंदीचा (पोलीस घोडेस्वार व पायदळ वगैरेंचा) खर्च काढून घेऊन बाकीचा भरणा सरकारांत दरमहा भरावा.

एखादेवेळी कोतवालावर सदर अमीन (मुख्य न्यायाधीश)ची हुकूमत असें. साधे अमीन कोतवालाच्या हाताखाली असत. पुण्याच्या सबंध कोतवालीची सालीना नेमणूक तीन ते साडेतीन हजारापर्यंत असें. खासा कोतवाल याचा पगार सालिना ३०० ते ३५० रु. असून त्याच्या फडणिसास व दफ्तरदारास अनुक्रमे २०० व दीडशे रु. पगार असें. प्रत्येक कारकुनास सालीना १२५ रु. व प्रत्येक प्याद्या (शिपाई)ला सालिना ४८ रुपये असत. कोतवालाला एक दिवट्या देत व एख सरकार चावडीवर असें; यांना सालीना ६० रु. हरकामी आसामी (ऑर्डर्ली) दोन असत, त्यांना सालिना ५० रु. दोन नाईक, दोन दंडिये व दोन पानसारे यांना प्रत्येकास सालीना २४ रु. असा पगार असें. या सर्वांची बेरीज वरील ३।, ३।। हजारांच्या बेहड्यांत (नेमणूक पत्रांत) होई. आकस्मिक गोष्टींत भोजनखर्च, दप्‍तरखर्च, ऐवजखर्च वगैरे येई. त्याचा खर्च वेळेवर कोतवालाने आपल्या हुकुमतीत करून सालअखेरीस मात्र सरकारी मंजुरी घ्यावी लागे. तसेच एखादा कायद्याचा नियम अगर सरकारी हुकुम अन्यायाचा असल्यास तो बदलणे झाल्यास अगर प्रजेच्या फायद्याचे नवीन नियम वगैरे करणे झाल्यास ते कोतवालाने प्रथम सरकारात समजवावे म्हणजे सरकार योग्य ती तजवीच करीत असें. (वाड. पु. ७ भाग. २; पु.८ भा. ३)