विभाग अकरावा : काव्य - खतें
कोपनहेगन- कोपनहेगन हे शहर डेन्मार्कच्या राज्याची राजधानी असून झीलंबद बेटाच्या पूर्व किनार्यावर साउंड सामुद्रधुनीच्या दक्षिणकिनार्यावर आहे. याची लोकसंख्या ६,७०,००० आहे. हे हॉलंड बेटाच्या पूर्वकिनार्यावर समुद्र व लहान लहान बेटे यांच्यामध्ये आहे. दोन बेटांमधील नैसर्गिक खाडीमुळे एक छान बंदर बनले आहे व या दोन बेटांमध्ये दळणवळण लँगेब्रो व निपेल्सब्रो या दोन पुलांच्या योगाने चालते.
आंतील शहराने व्यापिलेल्या प्रदेशास गॅमेलशोन म्हणतात. पाचव्या ख्रिश्चियनच्या पुतळ्याला हेस्टन (घोडा) म्हणतात. याभोवती पाहण्यालायक इमारती आहेत. पूर्वेस शार्लोटेन्बर्ग हा राजवाडा आहे. दक्षिणेस रॉयल नावाचे नाटकगृह आहे. लडव्हिग होल्बर्ग व अॅडाम ओहलेनश्चलागर या कवींचे पुतळे प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस आहेत व समोरच्या बाजूस अॅपोलो, पेगॅसस व हिपोक्रिनीचा झरा हे आहेत. इतर शिल्पकामे म्हटली म्हणजे ओफेलियाची उठावदार आकृती होय. कॉन्जेस नॅव्हिटरमधील इतर इमारती परराष्ट्रीय कारभाराची कचेरी, कित्येक व्यापारी गृहे, व्यापारी पेढी व थॉटस राजवाडा ह्या होत. नायहेव्हॅनच्या धक्क्यावर जुनी घरे आहेत.
कोन्जेन्स नायटोर्व्हपासून होल्मेन्स कॅनाल नांवाचा रस्ता नॅशनल बॅंकेवरून होल्मेन्स कर्क अथवा बादशाही आरमाराच्या चर्चला जातो. ख्रिश्चियन्स्बोर्गचा राजवाडा १७९४ व १८८४ या वर्षी दोन वेळा जळला. यांतील कलाकौशल्याचे काम बचावण्यांत आले. शक्ती, ज्ञान, आरोग्य व न्याय या देवतांचे पुतळे आगीतून बचावले गेले. ५,४०,००० पुस्तके व २०,००० हस्तलिखित लेख असलेले पुस्तकसंग्रहालय आगीतून बचावले गेले. धक्क्यावर सराफकट्टा (बोर्सेन) ही एक सुंदर इमारत आहे.
थॉर्व्हाल्डसन संग्रहालयाच्या दुमजली इमारतींत ईजिप्तिशयन व एट्रुस्कन शिल्पपद्धतीचे मिश्रण सापडते. या संग्रहालयात थॉर्व्हाल्डसनची सुमारे ३०० पुस्तके आहेत व एका खोलीत १८४४ मध्ये त्याच्या मृत्युसमयी जसे सापडले होते तसेच व्यवस्थित मांडलेले असें त्याचे सामान त्याच्या बसावयाच्या खोलीत आहे.
स्लॉटशोमच्या पश्चिमेस मुख्य जमिनीवर प्रिन्सेस पॅलेस आहे. यात पूर्वी पाचवा ख्रिश्चियन व सहावा फ्रेडरिक राहात असत. यांमध्ये राष्ट्रीय पदार्थसंग्रहालय आहे. व्हॉर फ्रू कर्क हे कोपनहेगन येथील कॅथेड्रल चर्च आहे. यामध्ये जॉन बॅप्टिस्ट, मोसेस ख्रिस्त व बारा साधू यांचे पुतळे आहेत.
व्हॉर फ्रू कर्कच्या उत्तरेस पहिल्या ख्रिश्चियनने स्थापिलेले विश्वविद्यालय आहे. येथे सरासरी २००० विद्यार्थी आहेत. या विश्वविद्यालयाला जोडून वेधशाळा, नायव्हेस्टर गेडमधील रसायनशास्त्र प्रयोगशाळा, तसेच ब्रेडगेड मधील शस्त्रप्रयोगशाळा व वनस्पतिबाग ही आहेत. विश्वविद्यालयाचे पुस्तकालय व क्लॅसनचे पुस्तकालय या दोहोंमध्ये २,००,००० ग्रंथ व ४००० हस्तलिखिते आहेत आणि प्राणिसंवर्धक उद्यान आहे. जवळच सेंट पिटरचे चर्च व क्रिस्टल गेडवर टिनिटी चर्च हा आहे. याचा १११ फूट उंचीचा गोल मनोरा यूरोपात अद्वितीय आहे. या चर्चपासून निघालेला जोबर मेयरगेड हा रस्ता दक्षिणेकढे जातो. यावर दुकानांची फार दाटी झाली आहे. यावर बिशप अॅबललोनचा पुतळा आहे. या अॅबलालोननेच हे शहर वसविले.
कॉन्जेन्स नायटोर्व्हचा ईसान्येकडील भाग हा श्रीमंत लोकांनी व्यापला आहे. अॅमालियनबोर्गचे राजवाडे, किल्ला, रोझेनबोर्गचे बगीचे व इतर सरदारांचे वाडे हे या भागांत आहेत. मोल्टके पॅलेसमध्ये १८ व्या शतकातील डच चित्रांचा संग्रह आहे. याच्या जवळच ग्रीसचा राजा जॉर्ज याचा राजावाडा आहे. या राजवाड्याच्या मागे अॅमालियन बोर्ग प्लॅडस् आहे. याच्या मध्यभागी पाचव्या फ्रेडरिकचा पुतळा आहे.
अंतर्दुर्गाच्या पश्चिमेस ओस्टननेगार्ड अथवा पूर्वेकडील रेल्वेचे स्टेशन आहे. याच्या नैर्ऋत्येस बगीचे पसरलेले आहेत. ऑस्ट्रे अॅन्लायेगमध्ये कोरीव चित्रे व खोदीव कामाचे शिल्पकलासंग्रहालय आहे. याच्या समोर नववा ख्रिश्चियन व राणी लुईसा यांच्या लग्नाच्या स्मरणार्थ बांधलेले डेन्मार्क नांवाचे स्मारक आहे. यात इंग्लंडचा राजा सातवा एडवर्ड व राणी अलेक्झांड्रा यांच्या विवाहप्रसंगाची उठावदार चित्रे आहेत. वनस्पतीसंवर्धक उद्यानांत टायकोब्रॅहीचा पुतळा व यांतच वेधशाळा, रसायनशास्त्रप्रयोगशाळा तसेच खनिजपदार्थसंग्रहालय, विविध धंदेशिक्षण देण्याच्या शाळा व दवाखाना या इमारती आहेत. ऑस्टेव्होल्डगेडच्या आतल्या बाजूस रोझेनबोर्ग पार्क व राजवाडा ही आहेत. डॅन्स्कफोक पदार्थसंग्रहालयामध्ये १६६० पासून शेतकर्यांच्या खासगी चरित्राचे वर्णन करणार्या वस्तूंचा संग्रह आहे. स्वातंत्र्यस्तंभ १७९८ मध्ये बांधलेला आहे. उत्तरेस मुख्य रेल्वे स्टेशन (बॅनेगार्ड) आहे. पश्चिमेकडील भागात फ्रेडरिक वर्गचे उद्यान आहे. यांत एक राजवाडा असून याचा लष्करी शाळेसारखा उपयोग करतात. या उद्यानात एक प्राणिसंग्रह आहे. बंदराच्या लगतच्या भागास ख्रिश्चनशाव्हन म्हणतात. यात व्हॉर फ्रेलसर्स कर्क आहे. अॅमागरचे बेट सुपीक असून यात भाजीपाला होतो. येथे डच लोकांची वसाहत आहे.
कोपनहेगनच्या आसपासचा उत्तरेकडचा व पश्चिमेकडचा भाग मनोवेधक आहे. क्लॅम्पनबोर्ग व स्कोडस्बोर्ग ही समुद्रकाठची हवा खाण्याची ठिकाणे आहेत. येथेच डायरेहॅव्हबर्ग (मृगालय) व स्कोहन (अरण्ये) आहेत. राजवाड्यात राष्ट्रीय ऐतिहासिक संग्रहालय आहे. व्हिडोरचा व्हिला अलेक्झांड्रा राणीला १९०७ मध्ये मिळाला.
कोपनहेगन येथील साहित्य व शास्त्रीय मंडळांमध्ये इ.स. १७४२ मध्ये स्थापलेली डॅनिश रॉयल सोसायटी, इ.स. १८२५ स्थापलेली रॉयल अॅन्टिक्केरियन सोसायटी, डॅनिश वाङ्मयवर्धक सोसायटी, रॉयल अग्रिकल्चरल सोसायटी, डॅनिश चर्च- हिस्टरी सोसायटी, इ.स. १८३८ त स्थापिलेली इंडस्ट्रियल अॅसोसिएशन, इ.स. १८७६ मध्ये स्थापिलेली रॉयल जिऑग्रॉफिकल सोसायटी व इतर संगीत विषयक संस्था या फार नांवाजलेल्या आहेत. इ.स. १७५६ मध्ये पाचव्या फ्रेडरिकने व्यापारी लोकांत कलाभिरुचीचा प्रसार करण्याकरता अॅकॅडेमि ऑफ आर्टस (कलाभुवन) स्थापित केली. इ.स. १८२६ मध्ये आर्ट युनियन व इ.स. १८७० मध्ये संगीत सार्वजनिक शाळा स्थापल्या. विश्वविद्यालयाशिवाय, पशुवैद्यकी व शेतकी विद्यालये, लष्करी शाळा व आरमारी शाळा या दुसर्या शिक्षणसंस्था आहेत. धंदेशिक्षण हे हुन्नरकला शाळा व विशिष्ट कलाविषयक संस्था या नावाच्या सोसायटीच्या शाळेत दिले जाते. या सर्व शाळा खासगी आहेत. प्राथमिक शिक्षण निरनिराळ्या पंथांचे लोक आपापल्या पंथाच्या शाळेतून देतात.
पूर्वीच वर्णन केलेली प्रार्थनामंदिरे लुथेरियन चर्चची आहेत. इतर काही महत्त्वाची रिफार्मड् चर्चची आहेत. सेंट अँस्गॅरियसचे कॅथॉलिक चर्च इ.स. १८४२ मध्ये बांधले. क्रिस्टलगेडमधील यहुदी लोकांचे प्रार्थनामंदिर इ.स. १८५३ मध्ये बांधलेले आहे. सध्यांच्या रस्त्यांच्या नावांवरून पूर्वी कोपनहेगनमध्ये मठ वगैरे इमरती होत्या, हे स्पष्ट होते.
कोपनहेगन हे डेन्मार्कमधील सर्वात मोठे व्यापाराचे शहर आहे. आउटर साऊंड व कॅलेवोस्ट्रँड यांच्या मधील अरुंद सामुद्रधुनीवर हे बंदर आहे. १८९४ मध्ये शहराच्या उत्तरेस फ्रिहॅव्हन (स्वतंत्र बंदर) बांधण्यात आले, व काही वखारी व इतर सोयी करण्यात आल्या. त्यामुळे व्यापारांत बर्याच सोयी झाल्या. हे बंदर मुख्यत्वेकरून रेल्वेच्या स्टेशनला वर्तुळाकार रेल्वेने व जकातीच्या कचेरीच्या धक्क्याला एका फाट्याने जोडण्यांत आले आहे. व्यापारी बंदर व लढाऊ जहाजांचे बंदर (ऑर्लोगशॅव्हन) यांच्यामध्ये एक बंधारा आहे व समुद्रकिनार्यावर दहा धक्के बांधून समुद्राला हटविले आहे. हे औद्योगिक शहर नाही. रॉयल चायना फॅक्टरी ही थोरव्हॅल्डसनच्या कामाच्या नमुन्याबद्दल प्रसिद्ध आहे. येथे लोखंडी जहाजे, इंजिने वगैरे बनविण्याचा एक मोठा कारखाना आहे. बाहेर देशांहून आणविलेल्या कच्च्या मालाचा पक्का माल बनविण्याचे कांही कारखाने फ्रीपोर्टच्या आवारांत आहेत.
इतिहास- कोपनहेगन (म्हणजे व्यापार्यांचे बंदर) या शहराचा उल्लेख प्रथम १४०३ मध्ये इतिहासात सापडतो. हे पूर्वी केवळ मच्छीमार खेडे होते व बाराव्या शतकाच्या मध्यापर्यंत हे असेंच होतें. यावेळी पहिला व्हाल्डेमार याने हे एक्सेलव्हाइड याला नजर केले. याने येथें एक किल्ला बांधला. नंतर येथें व्यापार्यांची वस्ती झाली व याला कॅपमनाहोफन हे नांव प्राप्त झाले. १२४५ मध्ये डॅनिश राजा चौथा एरिक यानें बिशप नील्स स्टिग्सन याला हाकून लाविले. परंतु १२५० मध्ये राजाच्या मरणानंतर बिशप जेकब अरलॅंडसेन यानें हे शहर पुन्हा घेतले व १२५४ मध्ये नगरवासीयांना प्रथम नागरिकपणाचे हक्क दिले. यानंतर जुन्या सनदांच्या मनाईस न जुमानतां व्यापारी संघ स्थापन करण्यांत आले. ते शहराच्या अधिकार्यांच्या सत्तेखाली होते. १२४८ मधील लुबेकच्या लोकांच्या व १२५९ मधील रूगेनच्या प्रिन्स जॅरोमिनरच्या हल्ल्यांमुळे कोपनहेगनच्या भरभराटीस प्रतिबंध झाला. १३०६ मध्यें या शहराने नॉर्वेजियन लोकांनां हांकून लाविले. परंतु १३६२ व १३६८ मध्ये व्हाल्डेमारच्या प्रतिस्पर्ध्यांनी हें शहर पुन्हां काबीज केले. पुढल्या शतकांत हॅन्सियाटिक लीग (संघ) हा नवीन शत्रू उत्पन्न झाला व राणी फिलिप्पा हिने यांचा बेत फसविला. रोस्किल्डे येथील बिशपांच्या ताब्यांतून हे शहर घेण्याचा पुष्कळ राजांनी प्रयत्न केला परंतु १४४३ पर्यंत हे शहर परत करण्यात आले नाही. नंतर कोपनहेगन हे राजधानीचे ठिकाण बनले. १५२३ पासून १५२४ पर्यंत दुसर्या ख्रिश्चियनने हे शहर पहिल्या फ्रेडरिकविरुद्ध लढविले. अखेरीस फ्रेडरिकनें तें घेतले व त्याची तटबंदी मजबूत केली. १५३६ मध्यें एक वर्षभर वेढा दिल्यानंतर हें शहर तिसर्या ख्रिश्चियनला शरण आले. १६५८ ते १६६० पर्यंत स्वीडनचा चार्लस गस्टव्हस यानें निरर्थक या शहराला वेढा दिला होता व पुढच्या वर्षी मोठ्या शौर्याने स्वसंरक्षण केल्याबद्दल या शहरास कित्येक हक्क देण्यात आले. ज्या तहाच्या योगाने तिसर्या फ्रेडरिकच्या स्वीडिश लढाईचा शेवट झाला होता त्या तहाला या शहराचे नाव १६६० मध्ये मिळाले. १७०० मध्ये इंग्लंड, हॉलंड व स्वीडन यांच्या संयुक्त आरमाराने या शहरावर हल्ला केला. १७२८ मधील एका मोठ्या आगीत येथील १६४० घरे व ५ प्रार्थनामंदिरे जळाली. १७९५ मधील दुसर्या आगीत ९४३ घरे व सेंट निकोलस व राधस ही देवालये जळून फस्त झाली. १८०१ मध्ये ब्रिटिश आरमाराने डॅनिश आरमाराचा रोडस्टेडमध्ये नाश केला. १८०७ मध्ये लॉर्ड कॅथकार्टच्या नेतृत्वाखाली एका ब्रिटिश आरमाराने ह्या शहरावर गोळ्यांचा पाऊस पाडून विश्वविद्यालयाच्या इमारती, मुख्य प्रार्थनामंदिर व इतर इमारती यांचा नाश गेला. कोपनहेगनची लढाई १८०१ मध्ये झाली.