विभाग अकरावा : काव्य - खतें
कोप्पल- हैद्राबाद संस्थानातील रायचूर जिल्ह्यातील एक गाव. या ठिकाणी एक प्राचीन डोंगरी किल्ला आहे. याची लोकसंख्या १९११ साली ७५५८ होती. १७८६ मध्ये टिपू सुलतानने हे गाव जिंकून त्या ठिकाणी एक किल्ला बांधविला. १७९० मध्ये ब्रिटिशांच्या व निझामच्या सैन्याने या गावाला वेढा देऊन ते सर केले. १८५७ च्या बंडामध्ये भीमराव नावाच्या एक शूर गृहस्थाने हे गाव आपल्या ताब्यात आणले, पण थोड्याच दिवसांत ते गाव त्याला सोडून द्यावे लागले व तेथे झालेल्या चकमकीत तो मारला गेला. या गावात दोन किल्ले आहे. एक टेकडीवरचा जुना किल्ला व टिपूने बांधवलेला नवा किल्ला. टेकडीवरील किल्ला पायथ्यापासून ४०० फूट उंच आहे. हा किल्ला हिंदुस्थानातील इतर कोणत्याही किल्ल्यापेक्षा दुर्गम आहे असें सर जॉन मालकम म्हणतो. सर सालरजंगच्या घराण्याकडे जी जहागिरी आहे त्या जहागिरीचे हें मुख्य ठिकाण आहे. या ठिकाणी एक पोस्ट ऑफिस व एक शाळा आहे.