विभाग अकरावा : काव्य - खतें
कोबर्ग- जर्मनीतील एक शहर सॅक्सोबर्ग. गोथा नांवाच्या संस्थानाच्या हे व गोथा अशा दोन राजधान्या आहेत. रंजन नदीला मिळणार्या इत्झ नांवाच्या एका लहान नदीच्या कांठी वसलेले असून गोथाच्या आग्नेयीस ४० मैलांवर आहे. लोकसंख्या (१९१०) २३७८९. शहर पुरातन असून येथे ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाच्या अशा बर्याच गोष्टी पहावयास सापडतात. बाजारचौकात महाराणी व्हिक्टोरिया यांचे पति राजपुत्र आलबर्ट यांचा धाकट्या विल्यम यीडने तयार केलेला पुतळा आहे. येथे १६०४ मध्ये स्थापलेली एक व्यायामशाळा असून औद्योगिक व शेतकी शिक्षणाकरितां कित्येक शाळा आहेत. येथील ड्यूकच्या ग्रंथसंग्रहालयात एक लाख पुस्तके आहेत.
येथील कोबर्ग नांवाचा पुरातन किल्ला शहराच्या वस्तीपेक्षा बर्याच उंच जागेवर बांधलेला आहे. हा ११ व्या शतकात बांधला गेला असावा असा अंदाज आहे. इ.स. १७८१ त वेड्याच्या इस्पितळाकडे या किल्ल्याचा उपयोग करूं लागले. परंतु १८३५-३८ त याचा जीर्णोद्धार केला गेला व आता येथें प्राणिशास्त्राचे पदार्थसंग्रहालय आहे. प्रॉस्टेस्टंट धर्माचा संस्थापक मार्टिन ल्युथर हा इ.स. १४३० मध्ये ह्या किल्ल्याच्याच एका खोलीत रहात असे. ज्या बिछान्यावर तो निजत असे तो बिछाना व ज्या व्यासपीठावरून तो उपदेश करीत असे ते व्यासपीठ अजून तेथें दाखवितात. येथे रंगाचे, यंत्रे तयार करण्याचे, दारू गाळण्याचे, लोखंडाचे ओतीव काम करण्याचे, चिनई मातीची भांडी तयार करण्याचे व लाकडाचे तक्ते पाडण्याचे कारखाने असल्यामुळे या शहरास औद्योगिक दृष्ट्या महत्त्व आहे. जवळच ड्यूकचे राजवाडे असून त्यापैकी एकांत राजपुत्र ऑलबर्टचा इ.स. १८१९ त जन्म झाला होता.
ह्या शहराचा १२०७ मध्ये प्रथम उल्लेख केलेला आढळतो. येथे असलेल्या किल्ल्यावरूनच या शहराचे नाव कोबर्ग असे पडले. यूरोपमधील ३० वर्षांच्या युद्धात ह्या किल्ल्याभोवती ३ वर्षे (१८३२-३५) वेढा पडला होता. इ.स. १८३५ पासून सॅक्सकोबर्गचे ड्यूक येथे राहू लागले.