विभाग अकरावा : काव्य - खतें
कोमटी- ही व्यापारी जात मुंबई, मद्रास इलाखा, वर्हाड व मध्यप्रांत, संयुक्त प्रांत, म्हैसूर इत्यादी प्रदेशांत आढळते. हा आंध्रांतील मुख्य वैश्य वर्ग होय. यांची वस्ती बर्याच ठिकाणी असल्याने त्यांच्यांतील धार्मिक व सामाजिक संस्कारांत मोठी विविधता आलेली आहे. १९११ साली हिंदुस्थानांत एकंदर ७,६५,५३५ कोमटी होते. त्यांपैकी सर्वात जास्त मद्रासेंत (४,९८,२९५) होते. कोमटी हे नांव या जातीस कसें पडलें याविषयी भिन्न भिन्न मते दिसून येतात. को-मति (खोकडस्वभावी) गो-मति (गाईवाला), कु-मति (दुष्ट स्वभावाची) अशा तर्हेच्या उपपत्त्या पुढें आलेल्या आहेत. कोमट्यांच्या कन्यकापुराणात शिवानें यांना गाईप्रमाणे वागविले म्हणून गो-मति असे नांव दिल्याचे लिहिले आहे. पूर्वी गोदावरीच्या तीरी हे रहात असत असें म्हणतात; अद्यापहि मुख्य वस्ती तेथें आहे व गो-मति किंवा गोम्ती असे याचे त्या ठिकाणचें एक नांव आहे. तेव्हां गोमतीचें तेलगूंत कोमटी असे अपभ्रष्ट रूप झालें असावें अशी मांडणी करतात. सर्व ठिकाणचे कोमटी तेलगू बोलतात. ती त्यांची मातृभाषा होय. याखेरीज ज्या देशांत ते रहातात त्या देशची भाषा चांगली मुखोद्गत करितात. त्याची एक निराळी व्यापारी भाषा असते.
कोमट्यांत मुख्य दोन जाती आहेत. एक गवर (गौर) आणि दुसरी कलिंग. विजयानगरच्या उत्तरेस असणारे गौर व दक्षिणस असणारे कलिंग होत. गौर कोमट्यांत पुन्हा अनेक पोटजाती आहेत. कोणी शैव, कोणी वैष्णव व कोणी माध्वपंथी आहेत. धंद्यावरूनही अनेक पोटजाती उत्पन्न झाल्या आहेत. गौरव कलिंग यांच्यामध्ये परस्परांत लग्ने होत नाहीत. गौर मद्यमांस खात नाहीत. कलिंग खातात. धंद्यावरून पडलेल्या जातींत रोटीबेटी व्यवहार होत नाहीत. यांची देवके प्राणी व वनस्पती असतात. कोमटी आपणाला वैश्य समजतात व आपली गोत्रे व प्रवर सांगतात. ही जात बरीचशी ओबडधोबड चेहर्याची असते.
`मेनरिकम’ चालीप्रमाणे कोमटी तरुणाला आपल्या मामेबहिणीशी लग्न करता येते. कन्यकापुराणांतील कन्यकम्माने १०२ गौर कोमट्यांसह (हे पुढे गोत्रपुरुष झाले.) अग्निप्रवेश केल्याची कथा फार लोकप्रिय असून ती थोड्या-फार फेरबदलाने तेलगू मार्कंडेय पुराणात (१४ वे शतक) सुद्धां आलेली आहे. म्हणजे कोमट्यांचा उल्लेख इतका प्राचीन आहे. संस्कृत मार्कंडेय पुराणांत ही कथा नाही, तेव्हां ती कन्यकापुराणांतूनच घेतली असावी. कनिष्ठ व जवळ जवळ अस्पृश्य समजल्या जाणार्या मद्दिगांचा व यांचा संबंध पुरातनचा आहे. त्याचा उलगडा करण्यासाठी अनेक कथा सांगतात. मद्दिग स्त्री व ब्राह्मण पुरुष यांच्या संबंधांपासून कोमटी जात बनली आहे, असा एक आक्षेप कोमट्यांवर करण्यांत आला आहे.
कोमट्यांत बालविवाहाची चाल आहे. लग्न ब्राह्मण चालवितो. बहुपत्नीकत्वाची यांच्यात चाल आहे. पण पहिल्या बायकोला मूल होत नसेल तर दुसरे लग्न करावयाचे. वेदोक्त संस्कारांनी ब्राह्मण हरकत घेऊं लागल्याकारणानें पुष्कळ तंटे माजले आहेत. वेदोक्त व पुराणोक्त अशा दोन्ही पद्धतींनी लग्ने होतात. मद्रासकडे प्रथम वरांची मुंज करितात, मग काशीला जाण्याचा आव आणिला म्हणजे वधूचा बाप त्याला घरी नेतो व आपल्या मुलीशी लग्न करून देतो. कलिंग कोमटी गंजमच्या उत्तरेस राहात असून आपली मातृभाषा बहुतेक विसरले आहेत. त्यांचे उपाध्याय उरिया ब्राह्मण असल्यानें त्यांच्यांत उरिया चाली शिरल्या आहेत.
यांच्यात विधवाविवाह रूढ नाही. शैवांखेरीज कोणाहि विधवेचे मुंडण सक्तीने करण्यांत येत नाही. अंगावर दागीने घालणे, पाने खाणे विधवा निषिद्ध मानीत नाहीत. शैव कोमट्यांत देखील बालविधवांचे मुंडण होत नाही. वैष्णव विधवा तर नेहमी सकेशाच असतात. सजीव आणि मृत या दोघांचे जे लग्न लावण्यांत येते ते मात्र फार विलक्षण दिसते. एखाद्या स्त्री-पुरुषाचा संबंध असेल व तो पुरुष कदाचित दिवंगत झाला तर त्याच्या प्रेताशी त्या स्त्रीचे लग्न खर्या लग्नाप्रमाणे लावितात. वधू खोबर्याच्या विड्या तोडून त्याच्या तोंडावर थुंकते; त्याच्यापुढे बसून पुष्कळ वेळ भाषण करिते; नंतर प्रेताला न्हाऊं-माखूं घालून विडा खावयास देतात व या तर्हेचे लग्नसोहळे संपल्यावर त्याची प्रेतयात्रा निघते. उत्तर सरकारांत राहणार्या लिंगायत कोमट्यांमध्ये वरील चाल आहे.
सर्व ठिकाणी कोमटीकन्यका `परमेश्वरी’ या कुमारी देवतेला भजतात. तिची जागजागी देवळे आहेत. या देवीखेरीज इतर देवतांचीहि ते पूजा करितात. विझगापट्टम येथील कोमटी किनार्यावरील डोंगरावर पुरलेल्या एका मुसुलमान साधूची फार आराधना करितात. त्या बंदरांत येणारें जाणारे प्रत्येक जहाज आपले निशाण तीनदा वाकवून त्याला सलामी देते. प्रवास सुरक्षित व्हावा म्हणून हिंदू बोटींचे मालक त्याला चांदीची डोणी अर्पण करीत. हल्ली बोटीचे मालक कोमटी नाहीत तरी ते या साधूला भजतात व खटल्यांत यश यावें, दुखणी बरी व्हावी म्हणून याला नवस करतात. धार्मिक विधी करण्यास हे लोक ब्राह्मणांनां बोलावतात व त्यांनां आपले गुरू करतात. या ब्राह्मणाला भास्कराचार्य असें म्हणतात. सोळाव्या शतकापूर्वी होऊन गेलेल्या संस्कृत कन्यकापुराणाच्या तेलगू भाषांतरकाराचें हे नांव होतें. त्याने कोमट्यांनां दैनिक आचारांचे काही नियम घालून दिले आहेत. हा वैश्यगुरू भास्कराचार्य व त्याचे वंशज गृहस्थाश्रमी असून त्यांना या ज्ञातीकडून वर्षासन असे. हल्ली निरनिराळ्या ठिकाणी गुरुपीठे असून धार्मिक कारभारांत यांचा अधिकार मानला जातो.
मोठे व्यापारी, वाणी आणि सावकार म्हणून कोमटी प्रसिद्ध आहेत. मद्रास शहरांत सर्व आयात मालाचे ते घाऊक व्यापारी आहेत. बहुतेक कोमटी विद्यासंपन्न असतात व त्यामुळें यांचा कारभार चांगला चालतो. येथून तेथून सर्व कोमटी हुषार, मेहनती, मितव्ययी व गबर असतात. अशी म्हण आहे ती काही खोटी नव्हे. जर एखादा कोमटी धंद्यांत बुडाला तर त्याचे जातभाई त्याला मदत करून पुन्हां मार्गाला लावतात. यांचा दानधर्म व्यवस्थित असतो. प्रत्येक कन्यकापरमेश्वरीचे देऊळ म्हणजे एक दानगृह होय. या पैशातून कोमटी स्त्रीशिक्षण, अनाथसंगोपन यांसारख्या संस्था चालवितात. वैश्य ज्ञातींची नैतिक, धार्मिक, शैक्षणिक, सामाजिक व औद्यगिक उन्नती करण्यासाठी १९०५ साली `दक्षिण हिंदुस्थान वैश्यसंघ’ नांवाची एक संस्था यांनी स्थापिली. लायक कोमटी विद्यार्थ्यांना यांतून इंग्रजी व स्वभाषा शिकण्यासाठी शिष्यवृत्त्या देण्यांत येतात. शेट्टी, चेट्टी (श्रेष्ठींची अपभ्रष्ट रूपे)ही बहुमानार्थक नांवे कोमट्यांतहि आहेत. हल्ली कोणी कोणी आपणाला अय्या म्हणवितात. (थर्स्टन).
त्रावणकोरमध्ये यांची संख्या सुमारे दोनशे आहे व म्हैसूरमध्ये जवळ जवळ दहा हजार आहे. यांची भाषा तेलगूच आहे. मुंबई इलाख्यांत यांची संख्या २१,८६५ असून हे विशेषत: बेळगांव, विजापूर व धारवाड जिल्ह्यांत आढळतात. नाशिक जिल्ह्यांतहि यांची थोडी वस्ती आहे. हे जुन्या कपड्यांचा व्यापार करतात. यांचा धर्मगुरू कृष्णाचार्य नांवाचा असून निझाम हैदराबादनजीक बर्सुवार्गल येथे त्यांचा मठ आहे. यांच्यांत जातिसभा असून ती आचार्यांनी नेमलेल्या मानकर्यांच्या संमतीनें जातीचे प्रश्न सोडविते. मध्यप्रांतांत यांची वस्ती सुमारे ११००० आहे. यांच्यात यज्ञ, पट्टी, जैन व बिड्डर अशा जाती आहेत. यांची राहणी मद्रासेतील कोमट्यांप्रमाणेच आहे. (सेन्सास रिपोर्ट; रसेल व हिरालाल).