विभाग अकरावा : काव्य - खतें
कोरूना शहर- स्पेनमध्यें कोरूना प्रांताची राजधानी आहे. येथील लो.सं. १९११ साली ६०,४८३ होती. येथून मार्ड्राड व ओपोर्टो या शहराशी प्रत्यक्ष दळणवळण आहे. या शहराचा वरचा भाग व खालचा भाग असे दोन भाग आहेत. वरचा भाग जुना असून त्याच्या भोंवती भिंती आहेत. बंदर पूर्व भागांत आहे व ते अनेक दुर्गांमुळे सुरक्षित आहे. हरक्युलिस टावर उत्तरेस असून त्याची उंची ४०० फूट आहे. त्यावर एक उत्तम फिरता दिवा आहे. शेतीतील माल, दारू आणि मासे हे येथील निर्गत मालाचे पदार्थ आहेत. कारखान्यांत सरकारी तंबाखूचा कारखाना मुख्य असून बरेच लोक हेरिंग व सार्डाईन मासे धरण्याच्या कामांत गुंतलेले असतात. मध्ययुगांत अथवा बहुधां त्यापेक्षांहि पूर्वी याला `कारोनियम’ म्हणत असत. हे बंदर पूर्वीपासून नेहमीच फार महत्त्वाचें आहे. परंतु इतिहासांत ते अलीकडेच दिसूं लागले. इ.स. १५८८ मध्ये `अजिंक्य आरमार’ (इनव्हिन्सिबल आरमाडा)ला या बंदराने आश्रय दिला. १५९८ मध्यें ब्रिटिशांनी हे शहर काबीज केलें. १७४७ व १८०५ या साली ब्रिटिशांनी फ्रेंच लोकांवर या ठिकाणी जय मिळविला. १८२३ साली ते फ्रेंचांच्या ताब्यांत गेले. १८३६ मध्ये कारलिस्टनी तें आपल्या ताब्यांत घेतलें. स्पॅनिश अमेरिकन युद्धामुळे जेव्हा क्युबा व पोर्टोरिको ह्या वसाहती स्पेनच्या ताब्यांतून गेल्या तेव्हां कोरूनाचे फार नुकसान झालें. कारण या वसाहतींशी कोरूनाचा बराच व्यापार होता.