विभाग अकरावा : काव्य - खतें
कोर्टोफान- हा ईशान्य आफ्रिकेतील आंग्लो ईजिप्शियन सुदानचा एक प्रांत आहे. या प्रांताचे क्षेत्रफळ १,३०,००० चौरस मैल असून याच्या पश्चिमेस डारफुर, उत्तरेस बायुडाचे माळरान, पूर्वेस व्हाइट नाइल प्रांत आणि दक्षिणेस शीलुक्स लोकांचा व इतर निग्रो जातींचा देश आहे.
कोर्डोफानचा बराचसा भाग उन्नतावनत मैदानांचा बनलेला असून, निर्जन, रुक्ष व ओसाड असा आहे. हत्ती, गेंडे, सिंह, चित्ते, काळवीट, म्हशी, ससे इत्यादि प्राणी येथे आहेत. येथील पुष्कळ जिल्ह्यांतून लोखंड सापडते पण सर्पणाच्या अभावामुळे ते सांपडून न सांपडून सारखेच आहे.
रहिवाशी- इ.स. १९०३ साली येथील लोकसंख्या ५,५०,००० होती. रहिवाशांचे साधारणत: दोन वर्ग करिता येतील; (१) मैदानांवरील अरब लोक व (२) डोंगरांवरील न्युबाज. मैदानांवरील बरेचसे गावकरी संमिश्र रक्ताचे आहेत. कित्येक लहान-लहान खेड्यांतील जाती मूळच्या निग्रो रहिवाशांच्या वंशज आहेत, असे सांगतात. गोवामा ही एक महत्त्वाची जात होय. डार हमीद व बेडेरिआ या जाती हिच्या खालोखाल येतात. फिरत्या व कळपवाल्या अरबांचेही दोन वर्ग करिता येतील. उंटवाले अरब व गुरांचे कळप बाळगणारे अरब यांपैकी उंटवाले अरब उत्तरेकडे रहातात व दुसरे म्हणजे बागारा हे दक्षिणेत राहतात. बागारा हे उत्तम शिकारी आहेत. भाले व रुंद पात्याच्या तलवारी ही यांची शस्त्रे होत. न्युबाज लोकांच्या पुष्कळ पोटजाती आहेत. प्रत्येक जात आपल्या राजाच्या अंमलाखाली असते. न्युबाज लोकांचा वंश फार प्राचीन होय. हे लोक काळे, ठेंगण्या बांध्याचे व स्पष्ट निग्रो अवयवांचे आहेत. उत्तरेकडील डोंगरांतहि कृष्णवर्णाचे व लोकरीसारख्या केसांचे लोक आहेत, पण यांचे अवयव निग्रो लोकांसारखे नाहीत. हे अरबी भाषा बोलतात व यांना न्युबाअरब लोक अशी संज्ञा आहे. एल ओबेद हे या प्रांताच्या राजधानीचे शहर होय. निरनिराळे व्यापारी रस्ते या शहरी येऊन मिळतात. खार्टुमपासून समारमधून येथे रेल्वे आलेली आहे.
इतिहास- कोर्डोफानच्या प्राचीन इतिहासाविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. येथे केव्हांही स्वतंत्र राज्य नव्हते. १६ शतकाच्या सुरुवातीस हा प्रांत फुंज साम्राज्याच्या अंमलाखाली होता. त्या शतकाच्या अखेरीस डारफुरच्या सुलतानाने हा प्रांत जिंकला. १७७५ च्या सुमारास तो फिरून फुंज साम्राज्याकडे आला. यावेळी अरबांच्या पुष्कळ टोळ्या येथे येऊ लागल्या. १७८४ त हा प्रांत फिरून डारफुर सुलतानाकडे गेला. १८२१ त महमद याने हा प्रांत जिंकला. १८८२ पर्यंत तो ईजिप्तच्या अंमलाखाली होता. या वर्षी हा प्रांत माहनदीच्या ताब्यात गेला. खलीफ अबदुल्ला हा १८९९ त येथेच मरण पावला. पुढे नूतन सुदान सरकारच्या ताब्यांत हा देश गेला. अडदांड न्युबाज व अरब यांनां वठणीवर आणून शांत करण्यास सुदन सरकारला फारच श्रम पडले.