विभाग अकरावा : काव्य - खतें
कोलबेर (१६१९-१६८३)- या फ्रेंच मुत्सद्याचा जन्म र्हीम्स शहरीं झाला. लहान हुद्यावरून चढत चढत अखेरीस तो फ्रान्समधील अतिशय थोर मंत्र्यांपैकीं एक मंत्री झाला. इस. १६६१ मध्यें तो कंट्रोलर- जनरलच्या जागेवर गेला. टॅल्ली अथवा संपत्तीवरील कर कमी करणें व डिपार्टमेंटल कचेरी स्थापणें ह्या त्याच्या प्रथम सुधारणा होत. उद्योगधंदे व व्यापार यांमध्ये शिस्त व नियमितपणा असावा असें त्यास मनापासून वाटे. त्यानें केलेले ठराव नेहमीं अतिशय कडक असत. उद्योगधंदे वाढविणें, जकातचौक्या स्थापून व्यापार चिरस्थायी करणें व मोठ्या रकमा किंवा हक्क देऊन नमुनेदार कारागिरीच्या कामाची निपज करणें ह्या गोष्टी त्यानें केल्या. वसूल गोळा करण्यांत येणार्या लबाड्या बंद करण्याकरितां त्यानें कसून प्रयत्न केला व या कामीं फार निष्ठुरपणा दाखविला. तथापि पूर्णपणें नवीन अशी पद्धत अमलांत आणण्याजोगें त्याचें मन विचारी व खोल नव्हतें. त्याला मार्गांत पुष्कळ अडचणी आल्या; परंतु त्यानें शहाणपणानें व धैर्यानें त्यास तोंड दिलें. जहाजांच्या व्यापाराची त्याला फार आवड होती. त्याचप्रमाणें कला व शास्त्रें हे त्याच्या आवडीचे विषय होते. कारागिरांना उदार देणग्या देऊन त्यानें कलेस उत्तेजन दिलें. इ.स. १६६३ मध्यें त्यानें दि अॅकॅडमी ऑफ इन्स्क्रिप्शन्स आणि `बेल्स लेटर्स’ यांची स्थापना केली. स. १६६८ त अॅकॅडमी ऑफ सायन्सेस ही संस्था त्याने स्थापन केली. स. १६८३ त पॅरिस येथें तो मरण पावला.