विभाग अकरावा : काव्य - खतें
कोलाचल- मद्रास इलाख्यांतील त्रावणकोर संस्थानांमधील इरेनियल तालुक्यांतील एक बंदर. यांची लोकसंख्या १९०१ सालीं १००० होती. पावसाळ्यांत अगर सप्टेंबर ते एप्रिल या महिन्यांत १५ ते २० जहाजें व ४०।५० बोटी या बंदराला लागतात. येथून कॉफी, खारें मांस, सागवान, गूळ इत्यादि जिन्नस बाहेर जातात. व तांदूळ, बंगाली चणे, लोखंड इत्यादि जिन्नसांची आयात होते. येथें पूर्वी निळीचा कारखाना होता. हें प्राचीन काळीं चांगलें बंदर असून एका वेळीं डच लोकांच्या ताब्यांत होतें असें बार्थोलोम्यूनें म्हटलें आहे. १७४० मध्यें त्रावणकोरच्या सैन्याचा सेनापति राम अय्यन दलब यानें डच लोकांचा पराभव केला व हें बंदर ताब्यांत घेतलें.