विभाग अकरावा : काव्य - खतें
कोल्हापूर संस्थान- हे मुंबई इलाख्यांतील दक्षिण महाराष्ट्र संस्थानांपैकी एक मराठी संस्थान आहे. याचें क्षेत्रफळ ३२१७ चौरस मैल आहे.
सीमा- कोल्हापूर संस्थानच्या उत्तरेस वारणा नदी आहे. पूर्वेस कृष्णानदी न दक्षिणेस बेळगांवचा जिल्हा आहे. पश्चिमेस सह्याद्रीपर्यंत व रत्नागिरी जिल्हा आहे.
स्वरूप- कोल्हापूर संस्थानच्या टापूंत महाराष्ट्र व कर्नाटक या दोन्ही प्रांतांतील थोडा थोडा देश आहे. दख्खनच्या सपाट प्रदेशापैकी कोल्हापूर संस्थान ही एक वाकडीतिकडी पट्टी आहे. ही पट्टी सह्याद्रीच्या शिखराच्या पूर्वेस उत्तरदक्षिण ६५ मैल व पूर्वपश्चिम ८ पासून ५० मैलांवर आहे उत्तरेस सुमारे ८ पासून १२ मैल रुंदीची पट्टी सह्याद्रीच्या बाजूनें १६ मैल लांबीची आहे. पुढें ती पूर्वेस पसरत जाऊन तिची रुंदी सुमारें ५० मैलपर्यंत वाढली आहे व असा प्रदेश दक्षिणेस सुमारें १६ मैलांपर्यंत आहे. पुढें पुन्हा चिंचोळी होऊन दक्षिण टोंकापासून १० मैलांपर्यंत रुंदी ३०-४० मैलपर्यंत आहे. आणि तेथून सह्याद्रीच्या पूर्व बाजूस रुंदी सारी १६ मैल अगदी दक्षिण टोंकांपर्यंत आहे. कोल्हापुरच्या सुष्टीसौंदर्यांत तेथील डोंगर हे मुख्य होत. त्यांत उत्तरदक्षिण सुमारें १०० मैल असलेला सह्याद्रीपर्यंत हा मुख्य होय. यापासून थेट ईशान्येस, थेट पूर्वेस सुमारें ५० मैल जाणारे त्याचे सहा फांटे आहेत. सह्याद्रीचा देखावा जंगली पण रमणीय आहे. पायथ्याजवळच्या उतरणीवर व दर्यांत दाट झाडी आहे. पर्वताच्या माथ्यामधून सुळक्यांसारखी उंच शिकरें आहेत. या शिकरांपैकी कित्येकांवर मोठे दुर्घट असे किल्ले बांधलेले आहेत. कोल्हापूर प्रांताच्या सरहद्दींत सह्याद्रीच्या शिखरावर किंवा त्याच्या नजीक असलेले ९ पहाडी किल्ले आहेत. ते म्हणजे प्रचीतगड, बहिरगड, महिपतगड, विशाळगड, शिवगड, भैरवगड, रांगणा ऊर्फ प्रसिद्धगड, वाडीमाचाळ व बावडा हे होत. कोल्हापूरच्या हद्दींत सह्याद्रीपासून खाली कोकणांत उतरण्याचे सुमारें ९० घांट आहेत. त्यांपैकी उत्तरेस आंबाघांट, मध्यभागी फोंडाघाट व दक्षिणेस अंबोलीघांट हे तीन मात्र गाडय़ा जाण्या येण्याजोगे चांगले बांधलेले आहेत. याशिवाय आणखी १४ घांट ओझी वाहणारी जनावरें येण्याजाण्याजोगे आहेत व बाकीचे थोडेसे दुर्घट असे रस्ते आहेत.
सह्याद्रीच्या पूर्वेस व ईशान्येस ज्या शेकडों टेंकडय़ा आहेत त्यांत सह्याद्रीचे सहा मोठे फांटे पूर्वेस व ईशान्येस ३० ते ५० मैलांपर्यंत कोल्हापूरच्या हद्दीत आले आहेत. या टेकडय़ांच्यामुळे या प्रांताची सहा मुख्य खोरी बनली आहेत. या टेकडय़ांच्या माथ्यांवर कित्येत ठिकाणी उंच शिखरे व सुळके आहेत व त्यांवर कोठे किल्ले व कोठें देवस्थानें आहेत. या टेंकडय़ांवर पन्हाळगड, पावनगड, विशाळगड यांसारखे किल्ले व जोतीबा, शिदोबा, धुळोबा, अलंप्रभु, रामलिंग इत्यादी देवळें आहेत.
कोल्हापूर प्रांतांत एकंदर लहानमोठ्य़ा मिळून आठ नद्या आहेत त्या बहुतेक पूर्ववाहिनी आहेत. यापैकी मुख्य नदी कृष्णा ही असून ती कोल्हापूर प्रांताच्या ईशान्य सरहद्दीवरून सुमारे २५ मैलपर्यंत वाहात गेली आहे. याशिवाय वारणा, पंचगंगा, दूधगंगा, वेदगंगा, हिरण्यकेशी, घटप्रभा व मलप्रभा याहि नद्या या प्रांतांतून वहात गेल्या आहेत. कासारी, कुंभी, तुळशी, भोगवती व सरस्वती (ही गुप्त आहे) अशा पांच नद्या एकत्र मिळून ही पंचगंगा नदी झाली आहे. या सर्व नद्यांना ज्यावेळी पावसाळ्यांत पूर येतो त्यावेळी या नद्यांमधून नावा चालू शकतात; पण उन्हाळ्यांत मात्र यातून नावा चालत नाहीत.
कोल्हापूर संस्थानांत पाण्याचा पुरवठा एकंदरीनें चांगला आहे. जमिनीच्या पृष्ठभागाखाली २०।२५ फूट पाण्याचे झरे बहुतेक सर्व भागी लागतात. एकंदर १२ । १५ हजार विहिरी कोल्हापूर संस्थानांत आहेत. तसेच यांत जवळजवळ १२५ तळी आहेत. त्यापैकी रंकाळें, पंद्माळें, अतिग्रे व रायबाग ही मोठी तळी अगर तलाव आहेत. सर्वांत मोठा तलाव रंकाळ्याचा होय. हा तलाव कोल्हापूर शहरांत आहे. याचा परीघ जवळ जवळ ३ मैलांचा असून त्याची खोली साधारण ३३ फूट आहे.
भूस्तर - कोल्हापूरच्या दक्षिणेस मात्र रेताड व गारेच्या दगडांच्या कांही शिरा आहेत. बाकी सर्व प्रांत दक्षिणेंतील ट्रापच्य़ा मोठय़ा प्रदेशाच्या क्षेत्रात येतो. या ट्रापच्या बासाष्ट, अभिनुलाइट्राप, कणदारट्राप व चिकण मातीचा ट्राप अशा चार जाती आहेत. कोल्हापूरच्या दक्षिण भागांत ट्रापची जाडी २००० ते २५०० फूटपर्यंत आढळते. सह्याद्रीच्या पश्चिम भागांतील कड्यांमध्ये या ट्रापचे थर दृष्टीस पडतात. फोंडा व अंबोली घाटांत हे थर बर्याच जाडीचे आहेत व त्यांवर लोहमिश्रित मातीचे थर आढळतात.
हवा- कोल्हापूर हे संस्थान समुद्रसपाटीपासून जवळजवळ १८०० फूट उंच असल्याने येथील हवा साधारणपणें समशीतोष्ण असते. सह्याद्रीच्या घाटमाथ्यांत झाडी पुष्कळ असल्यामुळें व त्याठिकाणी पाऊसहि पुष्कळच पडत असल्यानें त्या भागांतील या प्रांताची हवा थंड असते. पण इतर भागांत पाऊस बेताचाच असतो. पावसाळा जून ते ऑक्टोबरपर्यंत असतो व यावेळी पावसाचें प्रमाण सरासरी ४० इंच असते. बावडा येथे पावसाचें प्रमाण पुष्कळ म्हणजे २०७ इंच आहे तर शिरोळ येथें अवघे २१ इंचच आहे. कोल्हापुरास पावसाचें प्रमाण ३८ इंच असून अजर्यास ७७ इंच आहे. उन्हाळ्यांत देशावरील हवा बरीच उष्ण असते व अशा वेळी डोंगरावरील किल्ल्यांमधील हवा बरीच गार व सुखदायक असते. नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत हिवाळा असतो.
खनिज पर्वत- सह्याद्रीचे कोल्हापूरच्या हद्दींत जे फाटे गेलेले आहेत त्यांत इतर प्रकारच्या दगडांशी मिळळलेले असे लोखंडाचे दगड सापडतात. या दगडांपासून लोखंड काढण्यांत येते. याशिवाय या प्रांतांत इमारतीला लागणार्या दगडांची समृद्धी आहे. दख्खन हा टापू ट्राप दगडांनी युक्त असल्यानें कोल्हापूर प्रांतांतहि या दगडांचें वैपुल्य असावे यात नवल नाही. ट्राप म्हणजे काळ्या अगर करडय़ा रंगाचे दगड. अजरें व तोरगल परगण्यांत तांबूस पांढर्या रंगाचा ग्रानाइट दगडांचा उपयोग करतात. तसेंच या प्रांतांत बहुतेक सर्व ठिकाणी चांगला मुरूम सांपडतो. या मुरुमाचा खडीचे रस्ते करण्याच्या कामी चांगला उपयोग होतो. याशिवाय चुन्याचे दगड येथे खूप आढळतात. इमारतीच्या उपयोगाकरिता ज्या प्रकारची वाळू लागते तीहि या प्रांतांतील नद्यांच्या व ओढय़ांच्या पात्रांत पुष्कळ आढळून येते.
लोकसंख्या- कोल्हापूर संस्थानची लोकसंख्या १९२१ च्या खानेसुमारीत ८,३३,७२६ इतकी होती. त्यांत ४,२८,५४३ पुरुष व ४,०५,१८३ स्त्रिया होत्या. या संस्थानांत ९ शहरें व १०६० खेडीं आहेत. १९११ साली लोकसंख्येपैकी ३४३३४ लोक साक्षर होते. म्हणजे साक्षरतेचे प्रमाण जवळजवळ शेंकडा ४ (पुरुष ७.२, स्त्रिया ०.२) हे प्रमाण पडते. १९०३-४ सालांत कोल्हापूर संस्थानांत २५० शाळा होत्या. त्यांत एक हायस्कूल व एक टेक्निकल स्कूल होतें.
शेतकी- कोल्हापूर प्रांतांत काळी, तांबडी, मळी व खारी अथवा पांढरी अशा प्रकारच्या जमीनी आहेत. त्यापैकी काळी व तांबडी या जमिनी उत्तम प्रकारच्या आहेत. एकंदर लागवडीस आलेल्या जमिनीपैकी तिसला हिस्सा चांगली जमीन असून तीत बागाईत पिके होतात. बाकीची जमीन मध्यम प्रकारची आहे. कोंकण घाटमाथ्यावरील जमीन अगदी साधारण आहे. लागवडीस योग्य अशा २३५४ चौरस मैल एकरांपैकी २०१९ चौरस मैल लागवड झालेली जमीन आहे. १९०३-४ मध्ये १५५ चौरस मैलांतच लागवड झाली. बाकीची जमीन पडित होती. जिराईत जमिनींत खरीप व रब्बी अशी दोन पिकें येतात.
जंगल- कोल्हापूर प्रांतांतील जंगलांचे क्षेत्रफळ सुमारे ५०० चौरस मैल आहे. त्यांत राखीव जंगल ३४१ व संरक्षित जंगल १८२ मैल आहे. या जंगलांत शिसवी, साग, खैर, किंजल, ऐन, हिरडा, जांघळ, करमळ, शेवरी इत्यादी पुष्कळ प्रकारची झाडें आहेत. यांची लाकडें इमारतीच्या कामाला उपयोगी पडतात.
गुरेंढोरें:- पाळीव जनावरांत बैल, म्हशी, रेडे, घोडे, उंट, गाढवें, शेळ्या, बकरी, मांजरें व कुत्री ही मुख्य होत. बैलांचे हणम, सुरती, देशी असे तीन प्रकार आहेत. हणम बैल उभ्या शिंगांचे, दिसण्यांत सुरेख, आकारानें मध्मम, बळकट व काटक असतात. सुरती बैल हणम बैलापेक्षां उंच असून ते हणम बैलांइतके चपळ नसतात. मेंढरें बहुधा काळी किंवा काळी पांढरी असतात. धनगर लोक दूध, लोणी, लोंकर आणि मांस मिळविण्याकरितां मेंढरें पाळतात. पूर्वीइतकी हल्ली या प्रांतांत जरी सिंह्र जनावरें आढळून येत नाहींत तरी वाघ, चित्ते, तरस, अस्वलें, डुकरें हीं अद्यापि कोल्हापूरच्या पश्चिमेकडील जंगलांत आढळतात. कोल्हापूरच्या डोंगराळ प्रदेशांत विषारी व दुसरे असे नाना प्रकारचे सर्प आढळतात.
व्यापार व दळणवळण:- कोल्हापूर प्रांतांत तेल काढण्याच्या धंद्यांतील प्रमुख पदार्थ करडी, तीळ, भुईमूग, आंबाडी हे होत. हे येथें पुष्कळ पिकतात. याशिवाय भांडीं करणे, विणकाम, लोंकरकाम, सुगंधी पदार्थ तयार करणें, बांगडय़ा, सोन्याचांदीचे दागिने इत्यादि धंदे या प्रांतांत चालतात. कोल्हापूर येथी स्त्रियांचा अलंकार ‘कोल्हापुरीसाज’ हा प्रसिद्ध आहे. गूळ, तंबाखू, कापूस, धान्य हे जिन्नस बाहेरदेशीं जातात; व साखर, नारळ, रेशीम, मीठ, गंधक इत्यादि माल बाहेरून येतो. कोल्हापूर, शाहपुरी, वडगांव, इचलकरंजी, कागल, या मुख्य बाजारपेठा आहेत.
१८९१ पासून मिरज ते कोल्हापूर सदर्नमराठा रेल्वेचा फांटा सुरू झाला. हा फांडा कोल्हापूर संस्थानच्या मालकीचा आहे. याशिवाय या प्रांतांतून मुख्यत: सहा सडका जातात. त्यांत पुणें ते बेळगांवपर्यंत जाणारी सडक महत्त्वाची आहे. याशिवाय कोल्हापूरपासून रत्नागिरीपर्यंत, राजापुराकडे, इत्यादि चारपांच वाटा चांगल्या आहेत.
शासनपद्धति:- कोल्हापूर संस्थानांत, विशाळगड, बावडा, इचलकरंजी, हिंमतबहाद्दर, कागल (मोठी पाती व धाकटी पाती), कापशी, सरलष्कर या सात जहागिरी असून, त्या त्या जहागिरदाराच्याकडून त्यांचा कारभार चालविला जातो. खुद्द कोल्हापूर संस्थानांत करवीर, पन्हाळा, अळते, शिरोळ, गडहिंग्लज, भुद्दरगड हे सहा पेटे व चनवड, रायबाग व कटकोळ असे तीन महाल आहेत. या सर्वांचा राज्यकारभार कोल्हापूरचे महाराज, कोल्हापूर व दक्षिण महाराष्ट्र जहागिरीवर देखरेख ठेवण्याकरितां नेमलेल्या पोलिटिकल एजंटच्या सख्यानें चालवितात. कोल्हापूरच्या महाराजांना दिवाणी फौजदारीचें पूर्ण अधिकार आहेत. त्यांना फाशी देण्याचाही हक्क आहे. पण ब्रिटिश नागरिकांच्या गुह्यांचा इनसाप पोलिटिकल एजंटच्या परवानगीशिवाय त्यांनां करता येत नाही. १९०३-४ साली संस्थानांत सेशन्स जज्जापासून तो थर्डक्लास मॉजिस्ट्रेटच्या दर्जापर्यंतची एकंदर ६४ फौजदारी कोर्टे होती. मांडलिक जहागिरांनां डिट्रिक्ट जज्जाचे अधिकार व सात वर्षेपर्यंत शिक्षा देण्याचा अधिकार आहे. या संस्थानांत कोल्हापूर, नरसोबाची वाडी, इचलकरंजी, वडगांव, हातकलंगडे, शिरोळ, गडहिंग्लज, काटकोळ व मलकापूर या ठिकाणी म्युनिसिपालिटय़ा आहेत. जमीनधार्याची पद्धत तीन प्रकारची आहे; इनामी, शेरी व रयतबारी. इनामांपैकी कांही बक्षीस म्हणून, कांही नोकरीबद्दल व कांही देवस्थान इनाम आहेत. सरकारी जमीनी सर्व महाराजांच्या ताब्यात असतात व त्या खंडानें देण्याचें काम रेव्हेन्यू अधिकार्याकडे असतें. रयतवारीचे मिराशी, उपरी व चालखंड असे तीन पोटभेद आहेत. संस्थानांतील जमिनीचा महसूल गोळा करण्याकरितां एक मुख्य अधिकारी नेमला असतो. तांदळाच्या पिकापाठीमागें दर एकरी ५ रु. एक आण्यापासून १० रुपये पर्यंत, बागायती जमीनीस एकरामागें ८-१० रु. व कोरडय़ा जमिनींमागे दर एकरी १ ते ४ रु. चार आणे सारा द्यावा लागतो. १९०३-४ मध्यें संस्थानचें एकंदर उत्पन्न ४४ लक्ष झालें. त्यापैकी १२ लाख जमिनीपासून उत्पन्न झाले. खर्च एकंदरित ४३ लक्ष रुपये झाला. त्यापैकी ३ लक्ष रुपये महाराजांच्या खासगी खर्चाकडे, ३ लक्ष पब्लिक वर्क्स खात्यावर व २ लक्ष लष्करकडे खर्च झाले. अफू, अबकारी खाते व मीठ यांच्यावर सरकारी ताबा आहे. १८३९ पासून कोल्हापूर संस्थानांत ब्रिटिश नाणींच प्रचलित आहेत. कोल्हापूरच्या महाराजांजवळ सुमारे ७०० ते ८०० लोकांचे लष्कर असते. याशिवाय पोलिसांची संख्या ८०० ते ९०० आहे. कोल्हापूर येथें एक तुरुंग असून तेथें जवळजवळ २५० कैद्यांची सोय होऊ शकते. याशिवाय संस्थानांत १७ लहान तुरुंग आहेत. कोल्हापूर येथें पाऊस नेहमी बरा पडत असल्यानें दक्षिण महाराष्ट्रातील इतर ठिकाणांपेक्षां कोल्हापूर संस्थानांत दुष्काळाच्या फेर्या फार कमी होतात. दर दहा बारा वर्षांपाठीमागें सर्वसाधारण एकदां दुष्काळ पडतो असें दिसून येतें. दुष्काळ पडला असताना दुष्काळग्रस्त लोकांसाठी सरकारांकडून व्यवस्था करण्यांत येते. स्वस्त धान्याचीं दुकानें उघडण्यांत येतात. १८९६-१८९७ च्या दुष्काळांत दुष्काळग्रस्त लोकांना मदत म्हणून संस्थाननें जवळजवळ ७ लक्ष रुपये खर्च केले. १८९९-१९०० या सालच्या दुष्काळांत ५१,००० रुपये खर्च केले.
इतिहास:- कोल्हापूरच्या इतिहासाचे प्राचीन हिंदू कारकीर्द (इ.स. १३४७ पर्यंत), मुसुलमानी कारकीर्द (१३३७-१७०० पर्यंत) व मराठी कारकीर्द (१७०० पासून आतापर्यंत) असे तीन करतां येतील.
प्राचीन इतिहास:- कोल्हापूर अगर करवीर हें संस्थान फार प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. १८७७ सालीं कोल्हापुरास खणीत असता बौद्ध लोकांच्या एका मोठय़ा देवळाचा अवशेष सापडला. त्याच्या मध्यभागी एक औरस चौरस दगडी पेटीं सांपडली. तिच्या चौकोनी झांकणाच्या आंतल्या बाजूस ख्रिस्ती शकाच्या पूर्वीच्या तिसर्या शतकांतील लिपीत, धम्मगुप्तानें ब्रह्म यास दिलेल्या देणगीविषयी लेख होता. याशिवाय कोल्हापुरास जी तांब्याचीं अगर शिशाचीं नाणी सांपडली आहेत त्यांवरूनहि असें दिसतें कीं. ख्रिस्ती शकाच्या पहिल्या शतकांत दख्खनच्या उत्तरभागाचे जे शातकर्णी अगर आंध्रभृत्य राजे झाले त्यांच्या वंशांतील कांही पुरुषांच्या व त्यांच्या प्रतिनिधींच्या अंमलाखाली कोल्हापूर प्रांत होता व या राजांपैकी एकाचें नांव बिलिवायकुर होतें. टेलिमीनें ज्या वलेओकुर राजांचा उल्लेख केला आहे तेच हे विलीवायकुर होत असे डॉ. भांडारकर यांचे म्हणणे आहे. आंध्रभृत्यांपासून ५०० च्या सुमारास कदंब राजांनी हा प्रांत जिंकून घेतला असें दिसतें. पुढें पन्नास वर्षांच्या नंतर हा प्रांत पश्चिमेकडील चालुक्यांच्या ताब्यांत गेला. चालुक्य राजांनी या प्रांतावर शंभर सव्वाशें वर्षे आपला अंमल गाजविल्यावर राष्ट्रकुटांनी या प्रांतावर राज्य केलें. पण पुन्हा चालुक्यांनी हा प्रांत राष्ट्रकुटांकडून बळकावून घेतला. पुढें शिलाहार राजांनी साधारण इ.स. ११८० पर्यंत या प्रांतावर राज्य केलें. हे शिलाहार राजे जैनपंथाचे असूनहि त्यांची कुलस्वामिनी कोल्हापूरची महालक्ष्मी ही होती. या शिलाहार वंशातील, जट्टिग. चंद्रादित्य, मारसिंह, भोज (पहिला) गंडरादित्य, विजयादित्य व भोज दुसरा या राजांनी कोल्हापुरावर राज्य केलें. त्यांमध्ये दुसरा भोज हाच प्रसिद्ध राजा होऊन गेला. याच्या वेळीं याच्या राज्याचा विस्तार सातार्याच्या उत्तरेस शंभुमहादेव पर्वत आहे, तेथून ते कोल्हापूरच्या दक्षिणेस हिरण्यकेशी नदीपर्यंत होता. यानें आपल्या अमदानींत १५ किल्ले बांधलें असे म्हणतात. त्यांपैकी बावडा, भुदरगड, खेळणा, पन्हाळगड, पावनगड, समानगड हे किल्ले कोल्हापुरच्या हद्दींत आहेत. दुसर्या भोजानंतर हा प्रांत देवगिरीच्या यादवांकडे आला. यादव वंशांतील दुसरा सिंघणदेव यानें भोजराजाकडून हा प्रांत जिंकून घेतला. हा ११६० मध्यें या प्रांतावर राज्य करीत होता असें तत्कालीन शिलालेखांवरून सिद्ध होतें. या देवगडच्या यादव वंशांतील राजांनी १५० वर्षांहून अधिक वर्षे राज्य केलें. पुढें या यादवांपासून मुसुलमान लोकांनी हा प्रांत जिंकून घेतला.
मुसुलमानी कारकीर्द- इ.स. १३४७ पासून या प्रांताचा पूर्व भाग दक्षिणेतील बहामनी राज्यांच्या अंमलाखाली आला. या वंशांतील दहावा राजा दुसरा अल्लाउद्दीन १४३५ सालीं या प्रांतावर राज्य करीत होता. त्यानें प्रथमत: या प्रांताचा पश्चिम भाग जिंकण्याचें मनांत आणिलें पण त्याचा यत्न सिद्धीस गेला नाही. पुढें सुमारें पस्तीस वर्षानी दुसरा महमदशाहा बहामनी यानें महंमद गवान नांवाच्या आपल्या एका मुख्य सरदाराला खेळणा किल्ला घेण्यास पाठविलें. यानें अनेक युक्त्याप्रयुक्त्या लढवून हा किल्ला काबीज केला; व या काबीज केलेल्या मुलुखावर कीश्वरखान नावांच्या एका इसमास सुभेदार म्हणून नेमले. पुढें कांही वर्षांनी बहादुर गिलानी या एका सरदारानें कोल्हापूर व त्याच्या आसपासचा प्रांत बळकावला. त्यामुळें महमदशहा वहामनी याला त्यांचे पारिपत्य करण्याचें काम अंगावर घ्यावे लागलें. महमंदशहाच्या बरोबर झालेल्या लढाईत गिलानी हा मारला गेला व या प्रांताचें स्वामित्व ऐनउल्मुल्ख गिलानीस देण्यात आले. पुढें १४९८ सालीं बहामनी राज्य मोडकळीस आलें त्या वेळी तत्कालीन शूर सरदारांनी मिळेल तेवढा प्रदेश आपल्या ताब्यांत आणला व अशा रीतीने ते स्वतंत्र सरदार बनले. कोल्हापूर व आसपासचा मुलुख मात्र विजापूरच्या सुलतानाच्या ताब्यांत गेला. या सुलतानाच्या वंशांतील दोघां इब्राहिमांनीं पन्हाळगडच्या तटबंदीकडे लक्ष्य देऊन त्या गडाला मजबुती आणली.
मराठी अम्मल- मराठी साम्राज्याचे संस्थापक श्री शिवछत्रपती महाराज यांनी आपल्या राज्याची स्थापना करताना या प्रांतांतील किल्ल्यांचा उपयोग करून घेण्याचें ठरविलें. यांनी अनेक कारस्थानें करून पन्हाळगड, पावनगड, विशाळगड, रांगणा इत्यादी किल्ले हस्तगत करून घेतले. अशा रीतीनें हा प्रांत शिवाजी महाराजांच्या व त्यांच्या घराण्याच्या ताब्यात आला. छत्रपती राजारामाच्या मरणानंतर त्याची बायको ताराबाई हिने आपला पुत्र शिवाजी या बालराजास गादीवर बसविले व पंत अमात्य, सेनापती व परशुराम त्र्यंबक यांच्या सहाय्यानें ती राज्यकारभार करू लागली. पण पुढें १७०७ साली औरंगझेबाच्या मरणानंतर शाहु हा मोंगलांच्या कैदेतून सुटून आल्यावर त्यानें सर्व राज्यावर आपला हक्क सांगितला. त्यामुळे या दोन वारसदारांमध्ये कलागती उपस्थित होऊन शेवटी १७३० मध्यें या दोन घराण्यांमध्ये सलोख्याचा तह झाला. या तहान्वयें शाहूनें ताराबाईंचा कोल्हापूरच्या मुलुखावरील हक्क मान्य केला. १७६० मध्यें राजारामाचा धाकटा मुलगा संभाजी मरण पावला. त्यामुळें राजारामाचा वंश खुंटला. तेव्हां त्याची वडील बायको जिजाबाई हिनें आपल्या नवर्याच्या इच्छेप्रमाणे शिवाजीच्या घराण्याचा एक दूरचा वंशज खानवटचा शहाजी भोंसला याच्या मुलास दत्तक घेण्याचें ठरविलें. याला प्रथम पेशव्यांनी आडकाठी आणली पण पुढें त्यांनी रुकार दिला. या दत्तक मुलाचें नांव शिवाजी असें ठेवण्यांत आलें व त्याच्या अल्पवयांत त्याच्या नावाने जिजाबाईनें राज्यकारभार चालविला. या जिजाबाईंच्या कारकीर्दीत या राज्यावर अनेक संकटें आलीं. कोल्हापूर प्रांतांतील प्रजेचा बंडखोरपणा बेसुमार वाढल्यामुळें व तो ईस्ट इंडिया कंपनीला बाधक होऊ लागल्यांनें, कंपनीनें कोल्हापुरकरांच्या पश्चिम किनार्यावरील मालवण बंदरावर आपले आरमार पाठविले व मालवणचा किल्ला ताब्यात घेतला. पुढे कोल्हापूरकर व कंपनी सरकार यांच्यामध्ये तहनामा होऊन त्यामुळे कोल्हापूर प्रांतांत इंग्रजी व्यापार्यांनां व्यापार करण्यास सवलत मिळाली. कोल्हापूरकरांवर आपला दाब ठेवण्यासाठी सुमारे ८०० स्वार ठेवता येण्याजोगा सरंजाम देऊन पेशव्यांनी कोल्हापूरच्या पूर्व सरहद्दीवर पटवर्धन जहागीरदाराची स्थापना केली. पुढें जिजाबाई मरण पावल्यानंतर, शिवाजी राजा हा अद्यापि अल्पवयी असल्यामुळें त्याच्या वतीने दिवाण यशवंतराव शिंदे हे राज्यकारभार पाहूं लागलें. पेशवे, पटवर्धन, इत्यादिकांना कोल्हापूरकर हे नेहमी त्रास देत. ते पेशव्यांविरुद्ध निजाम, हैदर, टिपू, दादासाहेब पेशवे वगैरेंना नेहमी सामील होते. पुढें इ.स. १७८२ मध्यें यशवंतराव हे मरण पावले. त्यानंतर रत्नाकरपंत आप्पा यांची दिवाणगिरीच्या कामावर योजना झाली. यांनी आपल्या अमदानींत सर्व बंडाळी मोडून कोल्हापुरांत कांही वर्षे शांतता प्रस्थापित केली. पण, ती पुढे फार वर्षे टिकली नाहीं. कोल्हापूरच्या प्रजेचा पश्चिम किनार्यावरील लुटारूपणा अद्यापि मोडला नाही. नाना फडणवीस वारल्यामुळे सर्वच मराठी राज्यांत अंदाधुंदी माजली होती. छोटे जहागीरदार स्वतंत्र होण्याच्या प्रयत्नास लागले. त्यामुळे कोल्हापूरकरांनी इंग्लिशाबरोबर तह करून त्यांनां मालवण बंदर व त्याखालील मुलुख दिला. इंग्रजांनीही कोल्हापूरकरांना त्यांच्यावर कोणी चाल करून आल्यास मदत करण्याचें कबूल केले. हा तह इ.स. १८१२ च्या ऑक्टोबर महिन्यांत झाला. शिवाजी इ.स. १८१२ साली मरण पावला होता. त्यांच्या पाठीमागें त्याचा ज्येष्ठ पुत्र संभाजी ऊर्फ आबासाहेब हे गादीवर बसले. यांचा स्वभाव फार शांत होता. यांच्या कारकीर्दीत पेशवे व इंग्रज यांच्यामध्ये युद्ध उपस्थित झाले. त्यावेळी संभाजी महाराजांनी इंग्रजांचा पत्र धरिला. त्यामुळे इंग्रजांनी चिकोडी व मनोली हे तालुके त्यांना दिले. इ.स. १८२१ सालीं आबासाहेबांचा निर्दय रीतीने वध झाला. त्यांच्यामागून त्यांचे कनिष्ठ शहाजी ऊर्फ बुवासाहेब हे गादीवर आले; हे बदफैली, साहसी व क्रूर असल्याने प्रजेवर फार जुलूम होऊ लागला. आपल्या दुर्वर्तनामध्ये व चैनीमध्यें आडकाठी येऊ नये म्हणून त्यांनी वाटेल तसे पैसे उकळण्यास सुरुवात केली. कागलकर, इचलकरंजीकर यांसारख्या जहागिरदारांच्या जहागिरी उध्वस्त करून त्यांना त्रास देण्यास त्यांनी सुरुवात केली. इंग्रजांच्या प्रदेशाला त्यांनी त्रास देण्यास आरंभ केला तेव्हां त्यांचा बंदोबस्त करण्यासाठीं ब्रिटिशांनी कोल्हापुरावर फौज पाठविली. पण कोल्हापुरकरांनी त्या फौजेला तोंड न देतां ब्रिटिशांशी तह करण्याचे कबूल केले. तहान्वयें आपल्या ताब्यातील जहागिरदारांना व ब्रिटिशांच्या मुलुखाला कोणत्याहि प्रकारें त्रास न देण्याचें बुवा महाराजांनी कबूल केले. पण इंग्रजांची फौज दूर होतांच महाराजांनी पुन्हा पूर्वक्रम सुरू केला. त्यामुळे इंग्रजांना पुन्हा फौज पाठविणे भाग पडले. इ.स. १८२७ च्या ऑक्टोबर महिन्यांत पुन्हा महाराजांनी इंग्रजांशी तह केला व आपली फौज कमी करण्याचे मोठ्या नाखुशीने कबूल केले. पण याही तहान्वयें हातून वागणूक न झाल्यामुळे पुन्हा इ.स. १८२९ साली नवा तहनामा ठरला व या नवीन तहनाम्यानें कोल्हापूरच्या राज्यावर मुख्य कारभारी नेमणे, त्यास कायम करणें, बडतर्फ करणें यासंबंधीचे सर्व अधिकार ब्रिटिश सरकारनें आपल्याकडे घेतले. बुवासाहेब हे इ.स. १८३७ साली मरण पावले.
बुवासाहेबांच्या मागून त्यांचे अल्ववयी चिरंजीव शिवाजी ऊर्फ बाबासाहेब यास गादीवर बसवून रीजन्सीमार्फत कोल्हापूरचा राज्यकारभार चालविण्यात येऊ लागला. पण या अमदानीतही दंगेधोपे होऊ लागल्यामुळे ब्रिटिश सरकारने दाजी कृष्ण पंडित यास कारभारी नेमले. तरी पण यांच्या कारकीर्दीत कांही गडकर्यानी बंडे केल्यामुळे व पंडित यांस तुरुंगात टाकल्यामुळे ब्रिटिश सरकारनें फौज पाठवून ती बंडे मोडली व मेजर ग्रॅहॅम यास कोल्हापूरच्या राज्यकारभाराची व्यवस्था पाहण्याकरितां कोल्हापूर येथे पोलिटिकल सुपरिंटेंडंट म्हणून नेमिले. त्यामुळे कोल्हापूरचा राज्यकारभार पुन्हा सुरळीतपणे चालू लागला. इ.स. १८६६ सालीं बाबासाहेब हे मरण पावले. तत्पूर्वी त्यांनी आपल्या मांडीवर दत्तक घेतला होता. यांचे नांव राजाराम असे ठेवण्यात आले. यांना चांगले शिक्षण मिळण्याची सरकारने खबरदारी घेतली होती. पुढें हे युरोपमध्यें प्रवास करण्यास गेले असतां परत येतांना त्यांना वायूचा विकार जडून फ्लॉरेन्स शहरी त्यांचा अंत झाला.
राजाराम महाराजांना औरस संतति नसल्यानें त्यांच्या वडील बायकोस दत्तक घेण्याची परवानगी मिळाली. दत्तक पुत्राचें नांव शिवाजी महाराज असे ठेवण्यांत आले. इ.स. १८८२ सालीं हे भ्रमिष्ट झाल्याची चिन्हें दिसूं लागली. त्यामुळे राज्यकारभारासाठी एक रीजन्सी ठेवण्यांत आली. हे १८८३ सालीं मरण पावले. यांनाहि औरस संतती नसल्यानें त्यांच्या बायकोनें दत्तक घेतला व त्याचे नाव शाहू असें ठेवलें. हे अल्पवयी होते तोपर्यंत कोल्हापूरची कारभार रीजन्सीमार्फत चालविला जात असे. यांचा विवाह बडोद्याचे गणवतराव गायकवाड यांच्या नातीशी झाला होता. यांचे शिक्षण राजकोट येथील राजकुमार कॉलेजमध्ये फ्रेझर यांच्या देखरेखीखाली झाले. इ.स. १८९४ सालापासून यांना मुखत्यारी मिळाली. यांनी आपल्या कारकीर्दीत राज्यकारभार बरा चालविला. निकृष्ट वर्गांतील लोकांबद्दल यांना फार सहानुभूती असे व ब्राह्मण वर्गाबद्दल तिटकारा असे. यांना २१ तोफांचा मान होता. हे १९२२ च्या मे महिन्यांत मरण पावले. त्यांच्या पाठीमागे त्यांचे ज्येष्ठ पुत्र राजाराम छत्रपती हे राज्यावर आहेत. यांना के.सी.आय.ई. ही पदवी नुकतीच मिळाली आहे.
शहर- कोल्हापूर संस्थानची राजधानी. उं. अ. १६. ४१’ व पू. रे. ७४० १७’. १९११ साली या शहराची लोकवस्ती ८९४८१ होती व हल्ली या शहरांत चांगल्या इमारती झालेल्या आहेत. यापैकी कॉलेज, हायस्कूल, टेक्निकल स्कूल, दवाखाना या इमारती प्रेक्षणीय असून राजाराम कॉलेज व पाच हायस्कूलें येथे असून विश्वबंधु, ज्ञानसागर ही वर्तमानपत्रें निघतात.
कोल्हापूर शहर दक्षिण काशी या नावानें पुरातन काळापासून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी पुष्कळ देवालयें आहेत. त्यापैकी अंबाबाईचें देऊळ तर फारच भव्य व उत्कृष्ट आहे. त्यात चार शिलालेख आहेत. पूर्वी हे धर्माचे क्षेत्र होते असे म्हणतात. या शहराजवळच जे करवीर नावाचें खेडे आहे ते पूर्वी संस्थानचें मुख्य ठिकाण होतें. पण पुढे कोल्हापूर हे राजधानीचे शहर बनले.
याचे कोल्लापुरम् म्हणूनहि दुसरे नांव असून ते चोलांच्या इतिहासांत येते. दुसरा राजेंद्र चोल याने चालुक्यांवर स्वारी करून त्यांचा पराभव केल्यानंतर या गांवी एक विजयस्तंभ उभारल्याचे (सुमारे १०६० त) एके ठिकाणी नमूद केलेले आहे (अय्यर- एन्शंट इंडिया). कोल्हापूर शहराच्या यापुढील इतिहास संस्थानच्या इतिहासात अंतर्भूत झाला आहे.