विभाग अकरावा : काव्य - खतें
कोवेलंग- मद्रास इलाख्यांत चिंगलपुट जिल्ह्यांतील चिंगलपुट नांवाच्या तालुक्यांतील एक खेडें. मद्रास शहरापासून दक्षिणेस वीस मैलांवर पूर्व किनार्यावर वसलेले आहे. प्रथमत: हे डच लोकांचें ठाणें होतें. पुढें ओस्टँडच्या ईस्ट इंडिया कंपनीनें येथें एक वसाहत स्थापिली व किल्ला बांधिला. पण सध्या कांही त्याचा मागमूस नाही. सन १७४४ ते १७४९ पावेतों कर्नाटकचा नबाब असलेल्या अन्वरुद्दीन खानच्या वेळी बांधलेला पण सध्या मोडकळीस आलेला सादत्त बंदर नावाचा किल्ला येथे आहे. सन १७५० साली फ्रेंच लोकांनी हे गांव मोठय़ा युक्तीनें काबीज केले. १७५२ साली क्लाइव्हने ही जागा व किल्ला घेतला. पण त्यानें किल्ल्याचा तट सफा उडवून दिला. येथें मिठागरें पुष्कळ आहेत. येथून जवळच विडय़ाच्या पानांचें मळे आहेत.