विभाग अकरावा : काव्य - खतें
कोळसा (दगडी):- यास इंग्रजीत कोल, मराठींत दगडी कोळसा, हिंदीत पत्थरका कोयला अशी नांवें आहेत. हा खनिज पदार्थ व्यापारी दृष्टय़ा अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण लाकडें जाळून तयार केलेला कोळसा लोणार्याकडून घेतो त्यांत व या दगडी कोळशांत रासायनिक दृष्टय़ा फारसा फरक नाही. पृथ्वीच्या पाठीवर मनुष्यप्राण्यांचा संचार होण्यापूर्वी हजारों वर्षे दलदलीच्या प्रदेशांत उगवणार्या वनस्पती व निबिड अरण्यें ही भूकंपादि आपातांनी जमिनींत गाडली जाऊन त्यांच्यावर नाना प्रकारची रासायनिक क्रिया होऊन त्यापासून दगडी कोळशाच्या खाणी बनतात. दगडी कोळसा येखील लोकांना फार प्राचीन काळापासून माहीत होता याबद्दल मुळीच शंका नाही. परंतु युरोपियन लोकांनी येथे येऊन खाणी खनून त्याचा व्यापार सुरू करीपर्यंत कोळशाचा व्यापार येथे चालत नसे. याचा किरकोळ स्थानिक धंद्यांत किंवा घरगुती कामांत फारसा उपयोग करीत नाहीत. इंग्लंडमध्ये तिसर्या हेन्रीने इ.स. १२३९ त पहिल्याने दगडी कोळशाची खाण खणण्यास परवाना दिला. दगडी कोळशाला तेव्हा समुद्रकोळसा म्हणत असत. इ.स. १३०६ साली दगडी कोळशाच्या उपयोगाला इंग्लंडांत प्रतिबंध केला होता. परंतु १३२५ त इंग्लंड व फ्रान्समध्ये परस्पर दगडी कोळसा व धान्य यांची देवघेव होत असे. न्यू क्रॅसलच्या कोळशाची प्रसिद्धी त्याच वेळेस झाली. यानंतर दोन शतकेपर्यंत इंग्लंड, फ्रान्स, हॉलंड व जर्मनी येथे न्यू कॅसलहून कोळशाचा पुरवठा होत असे. १७७६ च्या सुमारास न्यू कॅसलप्रमाणेच संडरलंड, हार्टले, डरहॉम व ब्लिथ ही ठिकाणे कोळशाकरिता प्रसिद्धीस आली. अशी स्थिती असताना हिंदुस्थानांतील युरोपियन लोकांना १८ व्या शतकांत येथेही कोळशाचा व्यापार शक्य असल्यास सुरू करावासा वाटणे साहजिक आहे.
इ. स. १७७४ त वॉरन हेस्टिंग्जनें ईस्ट इंडिया कंपनीच्या दोन नोकरांना कोळशाच्या खाणी खोदण्याकरिता परवाना दिला. त्यांच्यापैकी हीटलनें काढलेला कोळसा इंग्लंडमधील कोळशांपेक्षा कमी दर्जाचा ठरला. लॉर्ड कॉर्नवॉलिसने या धंद्याकडे बरेच दुर्लक्ष केल्यामुळे कोळशाच्या व्यापाराची पहिल्याने भरभराट झाली नाही. (विल्यम-वाइल्ड स्पोर्टस इन् दि ईस्ट, १८०८, १.७८).
हिंदुस्थानात मिळणार्या कोळशापेक्षा कंपनीच्या बोटींतून भरताड म्हणून विलायती दगडी कोळसाच आणून तो येथील तोफखान्यांच्या कारखान्यांकरिता पाठविणे सोईचे होते असे आढळून आले. परंतु १८०८ च्या सुमारास कंपनीच्या लंडन येथील डायरेक्टरांनी हिंदुस्थानांतील प्रतिवर्षी वाढत जाणार्या कोळशाच्या मागणीमुळे जास्त येणार्या खर्चाविरुद्ध कुरकुर केली व दगडी कोळशाच्याएवजी लाकडी कोळसा वापरता येईल किंवा नाही याची चौकशी करण्याबद्दल सूचना आणली. तसे करणे शक्य नसल्यास कंपनीने तोफा करण्याचे कारखाने हिंदुस्थानांतून काढून इंग्लंडमध्ये आणावे अशीही सूचना केली होती. याच सुमारासा अर्ल ऑफ मिंटो हा गव्हर्नर जनरल होता. त्याने येथील कोळशाची परीक्षा करण्याकरिता कर्नल हार्डविक् याला सांगितले. हार्डविक्ने हिंदुस्थानांतील कोळशाची शिफारस केली नाही व काही काळपर्यंत कोळशाचा प्रश्न मागे पडला. परंतु १८१४ त लॉर्ड हेस्टिग्जनें कोळशाचा प्रश्न पुन्हा हाती घेऊन काळजीपूर्वक त्याचा निर्णय करण्याचे ठरविले, या वेळेस एका तज्ञ मनुष्याकडून कोळसा तपासविण्याचे त्याने ठरवून त्याला लागणारी सर्व सामुग्रीही देण्याचे त्याने जाहीर केले. त्या हुकुमान्वये जोन्स नांवाच्या तज्ञाने येथील कोळसा पुष्कळ सरस असल्याचे प्रसिद्ध केले. (एशियाटिक रिसर्चेस १८३३. पृ. १६३ ते ७०) हा अहवाल प्रसिद्ध झाल्यापासून येथील कोळशाच्या खोदकामाला पुन्हां चलन मिळालें असें म्हणण्यास हरकत नाहीं.
१८२० साली सरकारांतून ४००० पौंड जोन्स यास खाणी खणण्याकरिता आगाऊ मिळाले. परंतु या कामांत त्याला यावे तसे यश आले नाही. युरोपियन लोकांच्या देखरेखीखाली व भांडवलाने १८२० साली बंगाल प्रांतांत राणीगंज येथे पहिली खाण सुरू केली. १८३९ त या खाणींतून ३६००० टन कोळसा निघाला. इ.स. १८५४ त ईस्ट इंडिया रेल्वे सुरू होईपर्यंत कोळशाचा व्यापार फार मंद असे, परंतु रेल्वे कंपनी निघाल्यापासून व कलकत्त्यामधील जूटचें कारखाने व इतर पक्का माल तयार करण्याचे धंदे निघाल्यापासून कोळशाच्या व्यापाराला भरभराट आली व इकडील लोकही आपलें भांडवल या धंद्यांत घालू लागले. इ.स. १८५७-५८ साली हिंदुस्थानांत २,९३,४४३ टन कोळसा निघाला व ९२,९८३ टन कोळसा परदेशांतून आला. या सालापासून कोळशाच्या व्यापाराला कायमचे स्वरूप प्राप्त झाले. दरवर्षी किती कोळसा निघाला हे पुढील कोष्टकांत दिले आहे. (वजनाचें आकडे टनाचे आहेत.)
वर्ष | वजन |
१८६८ | ४५९४०८ |
१८७८ | ९२५४९४ |
१८९८ | ४६०८१९६ |
१९०४ | ८३४८५६१ |
१९०६ | ९७८३२५० |
१९१८ | २०४७२२५०० |
यांपैकी शेकडा ८८ हिस्से कोळसा बंगालमध्ये निघतो. राणीगंजच्या खाणींची फार प्रगती झाली आहे. कारण कलकत्त्यापासून त्या फक्त १२० ते १४० मैल अंतरावर आहेत. कलकत्त्यापासून सुमारे १८० मैल लांबीवर असलेल्या झेरिया येथील खाणी मात्र अलीकडे राणीगंजच्या खाणींना मागे टाकू लागल्या आहेत. गिरिधी येथील खाणींचीही तशीच स्थिती आहे. हिंदुस्थानांत लागणारा सर्व कोळसा अलीकडे येथेच उत्पन्न होतो असे म्हणण्यास हरकत नाही. कारण कोळशाची आयात दर वर्षी कमी होऊ लागली आहे. परदेशांतून येणार्या कोळशांपैकी बराचसा कोळसा मुंबई येथेच खपतो. हिंदुस्थानला इंग्लंड, ऑस्ट्रेलिया व जपान येथून दगडी कोळशाचा पुरवठा होतो. हिंदी महासागरांतील बंदरांना कोळसा पुरविण्याचा व्यापार नवीन सुरू झाला आहे. युरोप व जपानमधील संप व इतर कांही आकस्मिक कारणांनी कोळशाचा भाव वाढल्यामुळे या व्यापाराला तर जास्तच महत्त्व आले आहे.
याशिवाय आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे येथील कोळसा जगातील सर्व कोळशापेक्षा स्वस्त मिळतो हा होय. १९१८ साली खाणीच्या तोंडाशीच कोळसा विकत घेतल्यास एका टनाला ४ रु. ६ आणे पडत. इंडियन मायनिंग असोसिएशन व वंगाल चेंबर ऑफ कॉमर्सच्या दर वर्षाच्या अहवालावरून आपणाला कोळशाच्या व्यापाराची स्थिती कळून येते.
हॉलंडने या विषयावर आपल्या रिव्ह्यूमध्ये चांगली माहिती दिली आहे. त्यांपैकी काही पुढे दिली आहे- हिंदुस्थानांतील बहुतेक कोळसा गोंडवण येथील खाणीतून निघतो. या खाणी किनार्याजवळ व मुख्य रेल्वे फाटय़ांच्या जवळ असल्यामुळे येथील कोळसा फायदेशीर पडतो.
गोंडवण-कोळसा:- राणीगंज येथील खाणीची पहिल्याने भरभराट होऊन सर्वात जास्त कोळसा तिच्यांतून निघत असे. परंतु १९०६ पासून झेरियाच्या खाणींनी अघाडी मारली आहे. ईस्ट इंडिया रेल्वे व बंगाल नागपूर रेल्वे कंपन्या या खाणींतील कोळसा वापरतात.
राणीगंज येथील कोळसा मुख्यत्वेंकरून डामुडा सेरिजच्या वरच्या थरांतून काढलेला असतो. बराकर सेरिजचा कोळसा राणिगंज येथील कोळशाइतका चांगला झालेला नाही. परंतु झेरिया येथे वरील थरापासून हलका कोळसा निघतो व बराकर सेरिजपैकी कोळसा चांगला असतो.
गिरिधी येथील खाणी- गिरिधीजवळील गोंडवणाच्या दगडी कोळशाच्या खडकांपैकी कोळसा ईस्ट इंडिया रेल्वे कंपनी व बंगाल कोल कंपनी वाटून घेतात. येथील खाणीचा मुख्य भाग म्हणजे ‘डामुडा सेरिज’च्या पायथ्याशी असलेला १५ फूट जाडीचा थर हा होय. तेथील उरलेला कोळशाचा पुरवठा ७.७ कोटी टनांपेक्षा जास्त होणार नाही असा अंदाज आहे.
मध्य प्रांतांतील पेंच खोर्यांतील खाणी:- १९१८ साली येथील खाणींतून २६७३०० टम कोळसा निघाला. मुंबई व दक्षिण प्रांतांतील कारखान्यांना या खाणीचे महत्त्व फार आहे.
मध्य प्रांतांतील नरसिंगपूर जिल्ह्याच्या मोहपाणी येथील खाणी:- नर्मदाकोल व आयर्न या खाणींतील कोळसा १८६२ सालापासून काढीत आहे. या खाणेंची काही विशेष प्रगती झालेली दिसत नाही. परंतु तिच्या पश्चिमेस सुमारे दोन मैलांवर नवीन कोळसा सापडला असून तो काढण्याचे काम सुरू झाले होते.
चांदा (मध्य प्रांत) जिल्ह्यांतील खाणी:- ह्या नागपूरच्या दक्षिणेस सुमारे ६२ मैल असून तेथील कोळसा १८७१ पासून काढीत आहेत. या खाणींतून निघणार्या कोळशापैकी सुमारे अर्धा कोळसा जि.आय.पी. रेल्वे कंपनी विकत घेते व बाकीचा मध्यप्रांतांतील कापसाचे कारखाने व कापडाच्या गिरण्या यांना लागतो. वरोडय़ाचा कोळसा लवकर पेट घेणारा असल्यामुळे आगीने खाणींपैकी बराच भाग जळून फार नुकसान झाले. बंगालपेक्षा वरोडा येथील खाणीच्या कामांत पुष्कळ नैसर्गिक अडचणी आल्या होत्या. कोळसा काढण्याटय़ा नवीन पद्धतीमुळे वरोडा येथे पाणी व आग यांपासून आता फारसे नुकसान होत नाही व अपघाताने प्राणहानीही कमी होते. लवकरच वरोडय़ाच्या खाणींतील कोळसा संपण्याची चिन्हे दिसत आहेत. पण बेलापूरजवळील खाणींतून कोळसा निघूं लागल्यापासून आतां ही भीती बाळगण्याचे कारण राहिले नाही.
निजामच्या राज्यांतील सिंगारेणी येथील खाणी:- वरोडय़ाच्या आग्नेयीस असणार्या गोंडवणचे दगडी कोळशाचे खडक गोदावरी खोर्यातील राजमहेंद्रीपर्यंत आहेत. वरच्या गोंडवणच्या खडकांतून बंगालमधील दामुदासेरीजपैकी कोळसा कोठे कोठे सापडतो. निझामच्या राज्यांतील येलांडुजवळील खाण प्रसिद्ध आहे. गोंडवणच्या खाणीपेक्षां सिंगारेणी येथे अपघाताने फार लोक मरतात. वाफ तयार करण्याकरिता सिंगारेणी येथील कोळसा हलक्या प्रतीचा असून तो जाळल्यानंतर काही अदाह्य भाग शिल्लक रहात नाही असे तज्ज्ञांचे मत आहे. या सर्व कारणांमुळे सिंगारेणी येथील खाणींची फार मंद प्रगति झाली आहे.
युमारिया (रेवा स्टेट, मध्य हिंदुस्थान) येथील कोळशाच्या खाणी:- बंगालनागपूर रेल्वेचा विलासपूर कटनी फांटा या खाणीवरून जातो. या खाणींतून सुमारे २ कोटी ४० लक्ष टन कोळसा निघेल असा अंदाज आहे. आजपर्यंत कोळसा काढलेले चार थर ३ ते १२ फूट जाड होते. खाणींतील कोळसा काढण्यास सुरुवात १८८२ त मि.टी.डब्ल्यू.एच्. ह्यूजेस यांच्या सूचनेवरून करण्यात आली व १९०० सालच्या जानेवारीच्या पहिल्या तारखेपर्यंत खाणींची देखरेख सरकार करीत असे. परंतु तेव्हापासून रेवा संस्थानाला सर्व सत्ता दिली गेली. येथील बहुतेक कोळसा जी.आय.पी. रेल्वे व बंगालनागपूर रेल्वेला विकतात.
२ खडूमिश्रित व भूस्तरांतील तृतीयावस्थाक कोळसा:- अर्वाचीन कोळसा बहुतेक सर्व खडूमिश्रित व तृतीयावस्थाक आहे. खडूमिश्रित कोळसा आसामच्या खांशिया व गारो टेंकडय़ांतून सापडतो. आसामांतील या कोळशांत प्रास्तर राळेचे पुंज आढळतात. इतर कोळशांपेक्षा यांत हे वैशिष्टय़ आहे. तृतीयावस्थाक कोळसा सिंध, राजपुताना, बलुचिस्तान, आसाम, ब्रह्मदेश, हिमालयाच्या पायथ्याजवळच्या टेंकडय़ा व अंदमान आणि निकोबार बेटांतून सापडतो.
अर्वाचीन कोळसा एकंदरीत गोंडवणच्या कोळशाहून फार भिन्न आहे. त्यात गोंडवणच्या कोळशापेक्षा आर्द्रता जास्त असून उडून जाणारे बाष्पभावी उत्कर्षही जास्त असतात. या कोळशांच्या थरांच्या जाडीचे प्रमाण व त्यांच्यामधील सापडणार्या द्रव्याचे प्रमाण ठरीव नसते. त्यांच्यापासून राख कमी होते व जळतांना तो फार उष्णता देतो.
आसामच्या ईशान्येकडील माकुम खाणी:- आसामांतील व्यापारी व रेल्वे कंपनीने या खाणींतून कोळसा काढण्यास १८८१ त सुरुवात केली. ब्रह्मपुत्रा नदीवरील डिब्रूगडला या खाणी रेल्वेने जोडिल्या आहेत. ब्रह्मपुत्रा नदी जहाजें जाण्यास योग्य असल्यामुळे कोळसा पलीकडे पाठविणे फार सोपे जातें. तिरप व नामडांग ओढय़ांच्यामधील भागांत फार मौल्यवान थर सापडतात. पाच मैल दूरवर आसमंतात यांची जाडी १५ ते ७५ फूट आहे. जाळण्याकरिता हा कोळसा चांगल्या असल्याबद्दल त्याची ख्याती आहे व यापासून उत्तम कोक बनतो.
ब्रह्मदेशातील श्वेबो जिल्ह्यांतील खाणी:- ब्रह्मदेशाच्या बहुतेक भागांत कोळसा सापडतो. अलीकडे नामार्वजवळ १० फूट जाड थराचा कोळसा असल्याचे निश्चित समजले आहे.
बलुचिस्तानच्या खाणी:- पश्चिम हिंदुस्थानांतील बहुतेक सर्व कोळसा मुख्यत्वेकरून बलुचिस्तानांत सापडतो. परंतु येथील खडक अस्थिर असल्यामुळे खाणी खणणे खर्चाचे व धोक्याचे झाले आहे. सोर, बोलन व खोस्ट येथील खाणी चांगल्या आहेत. खोस्टच्या खाणींतून १९१८ साली २९०० टन कोळसा निघाला.
झेलम जिल्ह्यांतील (पंजाब) डॉन्डोट येथील खाणी:- येथील मौल्यवान थर १८ ते ३९ इंट जाड असतात व ‘नुम्युलिटिक’ चुनखडीखाली ते पसरलेले असतात. नॉर्थ वेस्टर्न रेल्वे कंपनी १८८८ पासून या कोळशाचा उपयोग करीत आहे.
भागनवाला येथील खाणी:- मिठाच्या डोंगरांच्या ओळींच्या पूर्वेस कोळशाचे थर आहेत. त्यांची जाडी ठिकठिकाणी कमी जास्त आहे. येथील कोळसासुद्धा नॉर्थ वेस्टर्न रेल्वे कंपनीच काढिते.
मिआनवाली जिल्ह्यांतील खाणी:- कालाबागच्या उत्तरेस सुमारे दोन मैलांवर या खाणी आहेत. येथील कोळशाला ‘जूरासिक’ कोळसा म्हणतात. पश्चिमेस सुमारे २४ मैलांवर असलेल्या मैदानांतून चांगला कोळसा येतो. तो तृतीयावस्थाक आहे.
काश्मीर येथील खाणी:- जम्मूच्या खाणींतील कोळसा १९०३ पासून काढण्यास सुरुवात झाली. लाड्डा कोळसा बंगालच्या कोळशाइतकाच चांगला निघू शकेल परंतु किमतीस त्याजबरोबर स्पर्धा करणे लाड्डा कोळशाला कठिण आहे.
राजपुतान्यांतील लबिकानेर येथील खाणी:- येथील कोळसा गर्द तपकिरी रंगाचा असून ज्या लाकडापासून तो झालेला आहे त्याची रचना यात स्पष्ट दिसते. तसेच प्रास्तर राळहि यांत सापडते. ज्या ठिकाणी २० इंच जाड थर असेल अशी कल्पना होती. तेथे खाण खणण्यास १८९८ साली सुरुवात केली. जळाऊ लाकडे एंजीनमधून वापरणे फायदशीर होत नाही. परंतु अलीकडे कोळशाच्या चुर्याचे गोळे बनवून वापरणे किफायतशीर असल्याचे सिद्ध झाले आहे. असे केल्याने त्यांतील आर्द्रता कमी होते व हवेचा परिणाम त्याच्यावर फारसा होत नाही. रेल्वे कंपन्यांना याचा सहज पुरवठा करतां येण्यासारखा असल्यामुळे त्याचा हलकेपणा कोणी फारसा लक्षांत घेत नाही. १९१८ साली या खाणींतून ११३०० टन कोळसा निघाला.
हिंदुस्थानांतील निरनिराळ्या कोळशाच्या क्षेत्रांतून १९१८ सालीं किती कोळसा निघाला त्याचा टनवार तपशील:-
स्थाने | टन |
गोंडवणकोल फील्ड्स् बंगाल, बिहार व ओरिसा- |
|
डाल्टनगंज | ८१८०० |
गिरिधी | ८४६६०० |
झेरिया | १०९५२००० |
जेन्टी | १४०४०० |
रामगड बोकारो | ५४२००० |
राणीगंज | ६३६८५०० |
संबळपूर | ५१००० |
मध्य हिंदुस्थान- उमरिया (रेवा) |
२००००० |
मध्य प्रांत- | |
मोहपाणी | ७८८०० |
पंचव्हॅलि | २६७३०० |
बल्लारपूर (चांदा) | १३५४०० |
हैद्राबाद- | |
सिंगरेरी | ६५९१०० |
एकूण | २०३२२९०० |
टर्शिअरी (तृतीयावस्थाक) कोलफील्डस् | |
बलुचिस्तान- | |
खोस्ट | २९००० |
सोररेंज माक्, इत्यादी | १४१०० |
आसाम- | |
माकुम इत्यादी | २९४५५०० |
वायव्य सरहद्दप्रांत- | |
हझारा | २०० |
पंजाब (सॉल्टरेंज)- | |
झेलम जिल्हा | ३९७०० |
मियानवाली | ५२०० |
शाहापूर | ५६०० |
राजपुताना- | |
बिकानेर | ११३०० |
एकूण | ३९९६०० |
एकूण सर्व | २०७२२५०० |
हिंदुस्थानांतील व जगांतील insert 2 pages
जास्त उष्णता देण्याची शक्ती असल्यामुळे त्याचे महत्त्व जास्त आहे. जळून भाकरीसारखा होणारा कोळसा कोक करण्यास फार चांगला असतो. बर्याच वर्षांपासून राणीगंज झेरिया व गिरिधी येथील खाणीत कोक तयार करितात. कोक तयार करणे म्हणजे दगडी कोळशाच्या फुकट जाणार्या भागाचा उपयोग करणे होय व अशा रीतीने त्याचा पुरवठा वाढल्यावर धातूंच्या कारखान्यांची सहज भरभराट होणे शक्य आहे. कोकचे दोन प्रकार आहेत (१) कठिण व (२) मऊ. कोक तयार करण्याच्या कोळशांत शेंकडा ७५ हिस्से नायट्रोजन असतो असे गृहीत धरल्यास उघडय़ा भट्टींत कोक तयार करावयाच्या सध्याच्या पद्धतीने दर वर्षी हजारो टन नायट्रोजन व्यर्थ जातो असे म्हटले पाहिजे. या नायट्रोजनपासून अमोनिया सल्फेट तयार केले असते तर त्याची किंमत जवळ जवळ २०।। लक्ष रुपये झाली असती. जाव्हाबेटांत उसांची वाढ करण्याकरितां १९०२ साली २३,४०० टन अमोनिया सल्फेट लागले. या आकडय़ावरून या पदार्थांचे महत्त्व लक्षात येईल. जर्मनी व अमेरिकेतील प्रयोगांवरून वरील अमोनियाचें महत्त्व सिद्ध झाले आहे व त्याप्रमाणे गिरिधी, राणीगंज व झेरिया या खाणींतून अमोनिया तयार करून त्या आड उत्पन्नांचा फायदा करून घेण्याची सोय केली आहे. अमोनियम सल्फेटचा हिंदुस्थानांतच खप व्हावा म्हणून येथील शेतकी खात्याने येथील उसांच्या व इतर पिकांत त्याचा उपयोग होतो हे प्रयोग करून सिद्ध केले आहे.
उत्तम प्रकारच्या भाजलेल्या दगडी कोळशावर सर्व ठिकाणी सारखी झाक मारते. त्यास जडपणा व टणकपणा असतो. हा फोडला असता लांबट रेषा निघतात. याचे विशिष्ट गुरुत्व बरेच असावे लागते. कारण भट्टीत यावर लोखंडाचें वजन पडावयाचे असते. विशिष्टगुरुत्व कमी असेल तर लोखंडाच्या वजनाखाली चुरून भट्टीतील वायूंची हालचाल होण्यास अडथळा होईल. हा साठवून ठेवण्यास कोरडी जागा लागते. याच्या दोन जाती आहेत:- पहिली जात : दिवे लावण्याकरता धूर तयार करणार्या कारखान्यांतील भट्टय़ांतून शिल्लक राहिलेला. दुसरी जात : लोखंड व बीड तयार करण्याच्या भट्टय़ांमध्ये वापरण्यात येणारा. याला भट्टीचा भाजलेला दगडी कोळसा असेहि म्हणतात. चांगल्या जातीच्या भाजलेल्या दगडी कोळशांत असलेल्या घटकांचे प्रमाण शेकडा कार्बन ९३ ते ९४, राख ३ ते ५, ओलावा १, गंधक .७ ते १ असे असते. वरील प्रमाणात गंधकाचे प्रमाण जरी फारच थोडे आहे तरी तितक्याने देखील लोखंडास व बिडास अपाय होतो. गंधक लोखंडांत मिसळल्याने त्यास ठिसूळपणा येतो व रस करून ओतले असता त्यात सोस रहातात.
दगडी कोळसा भाजण्याच्या भट्टय़ा:- यांत मुख्य दोन जाती आहेत. यात दगडी कोळसा तापवून भाजतात. (१) या जातीच्या भट्टय़ांना ‘मधपोळे भट्टय़ा’ असे म्हणतात. यात उपपदार्थ हाती लागत नाहीत. फक्त भाजलेला कोळसा तयार होतो. या तयार करण्यास खर्च फार थोडा पडतो. या फार ठिकाणी प्रचारांत आहेत. (२) दगडी कोळसा तापविला असता त्यातून निघणार्या वाफा जमवून त्या एका भांडय़ात एकत्र करून त्या वाफांवर रासायनिक क्रिया करून त्यांतून निरनिराळे पदार्थ काढून घेतात. हे काम ज्या भट्टय़ांत होते त्यांना उपपदार्थजनक भट्टय़ा असे म्हणतात. या भट्टय़ांमध्ये उपपदार्थ फुकट जाऊं न देतां धरून ठेवण्याच्या कामांत फार सुधारणा झाल्या आहेत. या जातीच्या भट्टय़ांची मूळ किंमत जास्त पडते व शिवाय उपपदार्थ काढण्यासाठी आणखी यंत्रेही घ्यावी लागतात. त्यांची किंमतही अधिक पडते.
भाजलेल्या दगडी कोळशांचे आड उत्पन्न:- डांबर आणि नवसागर:- नवसागर कोरडा हाती लागत नसून जलमिश्रित नवसागर हाती लागतो. हे मिश्रण तापविले म्हणजे नवसागराची वाफ होते व ती सल्फ्युरिक अॅसिडमध्ये मिसळली म्हणजे सल्फेट ऑफ अमोनिया नावाचे खत तयार होते. डांबरापासून नॅपथा, बेंझोल क्रिओसोट तेल, रंगाची तेलें, रंग पिच इत्यादी जिन्नस तयार होतात.
जळण व कोळशाच्या विटा:- बिकानेर, काश्मीर व इतर ठिकाणच्या हलक्या जातींच्या कोळशाच्या जळाऊ विटा किंवा गोळे करतात. असे केल्याने त्यामधील आर्द्रता कमी होते. युरोप व अमेरिकेतील कोळशाच्या विटा व गोळे निराळ्याच तर्हेने व इतर पदार्थांपासून तयार केलेले असतात. हिंदुस्थानांतील हलका कोळसा व चूर यांचा उपयोग करण्यासाठी कोळशाच्या विटा व गोळे तयार करण्याकडे अलीकडे लोकांचे बरेच लक्ष लागले आहे.