विभाग अकरावा : काव्य - खतें      
     
कोळी:- कोळी संधिपाद प्राण्यांच्या वर्गांत मोडतात. या प्राण्यांच्या वर्गांतील अष्टपाद प्राण्यांच्या उपवर्गांत यांचा अंतर्भाव होतो. या उपवर्गांतील प्राण्यांना स्वतंत्र असे डोकें नसते. डोके व छाती यांचा एकजीव असून डोळे साधे असतात. कोळ्यांचे पोट व छाती यांमध्ये कमर असते. यांच्या शरीरांवर शृंगमय कवच असून पोट मऊ असते. कोळ्याला आठ पाय असून ते फार बारीक, लांब व केसाळ असतात. यांच्या पायांस पेरीं असून शेवटी नख्या असतात. कोळी हा प्राणी डोके खाली करून चालतो. त्याचें तोंड डोक्याखाली असते. त्याच्या तोंडास जबडय़ासारखे भाग असून शेवटी नांगीसारखे आकडे असतात. या आकडय़ांमध्ये विष असते. या विषारी आंकड्नीं तो कृमिकीटकांना दंश करतो व त्यांना मारून टाकतो. कोळ्यांचे हृदय नळीसारखे असून ते पाठीच्या भागाकडे असते. पोटाखाली दोन भोके असून त्यांतून आतील पडद्यांत हवा शिरते. कोळ्यांतील नर हा मादीपेक्षा लहान आकाराचा असतो. मादीचा आहार नरापेक्षा मोठा असतो व प्रसंग पडल्यास ती नरालाही खाऊन टाकण्यास मागे पुढे पहात नाही. त्यामुळे नर हा मादीजवळ घाबरत घाबरतच येतो. नराचा आकार लहान असल्यामुळे मादीने त्याच्यावर हल्ला केल्यास त्याला सुटून जाण्यास या लहान आकाराचा फार फायदा होतो. कोळ्यांची जात बहुप्रसव आहे. मादी ही वेळेस सहापासून शेंकडय़ांपर्यंत अंडी घालते. ही अंडी मादी आपल्या कोळीष्टकांत जपून ठेवते.

कोळी आपले जाळे मोठय़ा कुशलतेने विणतो. या जाळ्याचें दोन प्रकार आहेत. स्वत:ला राहण्याकरिता जे जाळे तो बनवितो ते नळीसारखे असून त्याला झडप असते. भक्ष्य पकडण्याचे जाळे चक्राकार असते. कोळ्याच्या पाठीवर सहा टेंगळे असतात व या टेंगळांना पुष्कळ छिद्रे असतात. या छिद्रांतून चिकट रस बाहेर येऊन तो वाळतो. पुढे त्याचा तंतू बनतो व त्या तंतूंना पीळ पडून धागा बनतो. हा धागा काढतांना एखाद्या पदार्थावर तो आपली टेंगळे दाबतो व रस चिकटवितो व आपण दूर जाऊ लागतो. त्यामुळे धागा निघतो. आपले जाळे बनविण्याच्या कामी कोळ्याला आपल्या पायांचा फार उपयोग होतो.

‘थेरीडिडी’ जातीच्या कोळ्याचे विष फार जहाल असते. त्यामुळे तो कृमींना ताबडतोब मारू शकतो. या जातीचा कोळी मनुष्याला चावला तर त्यामुळे मनुष्याच्या अंगाचा दाह होतो. क्वचित माणसे दगावतातही. खूप नाचल्याने हे विष उतरते असे म्हणतात. या जातीचा कोळी उष्ण प्रदेशात सापडतो. ऑस्ट्रेलिया, चिली, न्यूझीलंड, दक्षिण युरोप इत्यादी देशांतील लोक या जातीच्या कोळ्यांनां फार भितात.

कोळी उपद्रवी कीटकांना आपल्या जाळ्यांत पकडून ठार करतो. हा प्राणी मांसाहारीहि आहे. काही जातींचे कोळी आपल्या जाळ्यांत पक्ष्यांनाही पकडून ठार मारतात. पण कोळी हा जसा दुसर्‍याना मारतो तसे याला मारण्याकरितांही पुष्कळ प्राणी टपलेले असतात. कीटकभक्षकप्राणी साप, जिवाणू हे तर या कोळ्यांचा फन्ना उडवतातच, पण त्यापेक्षाही त्वक्पक्ष कीटक वर्गाच्या काही जातींच्या प्राण्यांकडून यांचा फार संहार होतो. गांधीलमाशी तर यांना त्राहि त्राहि करून सोडते. कोळी हे बहुप्रसव असल्याने त्यांचा संहार करणारे प्राणी आहेत म्हणूनच ठीक आहे.

कोळ्यांच्या जाती पुष्कळ आहेत. काही कोळी जमिनीवर राहतात, काही पाण्याच्या कडेस खडकांवर रहातात व पाण्यावर तरंगून तेथील कृमींचा नाश करतात. काही कोळी रेशमाची जाळी विणणारे असतात. काही साधी जाळी विणणारे असतात. काही जातीचे कोळी अजिबात जाळी करीत नाहीत. उष्ण प्रदेशांतील एक जातीचा कोळी जमिनीला भोक पाडून आंतून ते जाळ्याने लिंपतो व वर झडप लागतो.