विभाग अकरावा : काव्य - खतें
कौटिल्य- याचें नांव विष्णुगुप्त. आर्य चाणक्य, कौटिल्य अशीहि याचीं आणखी दुसरीं नांवें आढळतात. यानें नंदराजांचा, त्यांनीं यांचा अपमान केल्यामुळें आमूलाग्र उत्खात करून धनानंदाचा दासी (मुरा)पुत्र चंद्रगुप्त मौर्य याला मगधाच्या राज्यावर बसविलें. हा अत्यंत निस्पृह पण तापट ब्राह्मण होता. यानें लिहिलेला अर्थशास्त्रावरील ग्रंथ नुकताच सांपडला आहे. हा ग्रंथ पुष्कळ दिवसांपासून माहीत होता, परंतु त्याची उपलब्धि मात्र आतांच झाली आहे. त्यावर भट्टस्वामीची टीकाहि आहे. पं. शामशास्त्री यांनीं हें पुस्तक प्रसिद्ध केलें आहे. विशाखदत्ताच्या मुद्राराक्षस नाटकाचा हा नायक आहे. [अर्थशास्त्र पहा]. याचा काल ख्रि. पू. ३२० ते ३०० असा आहे.