विभाग अकरावा : काव्य - खतें
क्वेटापिशीन जिल्हा- बलुचिस्तानांतील डोंगराळ जिल्हा. उ. अ. २९० ५२’ ते ३१० १८’ व पू. रे. ६६० १५’ ते ६७० ४८’ मध्यें वसलेला आहे. क्षेत्रफळ ५१२० चौरस मैल आहे. या जिल्ह्यांत भूकंप फार होतात. आक्टोबर १८९२ व मार्च १९०२ मध्यें फार मोठे भूकंप झाले. या दर्यांत अप्रीकॉट, डाळिंब, अक्रोड, बदाम वगैरे निरनिराळीं फळें होतात. या ठिकाणीं मेंढ्यांकरितां मोठालीं दाट जंगलें वाढवून ठेवतात. या जंगलांत चित्ते, लांडगे, कोल्हे व ससे नेहमीं सांपडतात. येथील हवा साधारण उष्ण असते व उन्हाळ्याच्या महिन्यांत चक्रवात होतात. क्वेटा याला पूर्वी शॉल व पिशीन याला फुशंज व पशंग म्हणत. याची १९२१ मधील लो. सं. १,३७,०८२ होती. सरासरी शेंकडा ८४ लोक मुसुलमान, शेंकंडा १० हिंदु आणि शेंकडा तीन इंग्लिश आहेत. बहुतेक सर्व पुश्तु भाषा बोलतात. कांहीं ब्राहुई व फारसी भाषा बोलतात. पिशिनमधील अफगाण लोक घोड्यांचा व्यापार करतात. क्वेटा व पिशीन या दोन तहशिलींत एकंदर ७०६ चौरस मैल जमीन लागवडीची असून तीपैकीं २२१ चौरस मैल जागा नेहमीं पिकाऊ असते. या ठिकाणां गहूं, भात, बारली, मका, बटाटे आणि इतर धान्य व भाजीपाला फार चांगला पिकतो. नांगराला उंट जुंपतात व हेच प्राणी माल नेण्या-आणण्याकरितां उपयोगांत आणतात. क्वेटाच्या पूर्वेस कोळसा पुष्कळ सांपडतो. फेल्टच्या कापडाचा व चटयांचा मोठा व्यापार आहे. क्वेटामधील कंदाहारी लोक तांब्यांचीं भांडीं उत्तम करतात. अफगाणिस्तानांतून तूप, ताजीं व सुकीं फळें येतात आणि सतरंज्या, धान्य व धातू हीं हिंदुस्थानांतून क्वेटामध्यें येतात व क्वेटामधून हिंदुस्थानांत लोंकर व फळें आणि अफगाणिस्तानांत धातू रंग वगैरे पाठवितात. व्यापाराकरितां रेल्वे व मोठाले रस्ते केलेले आहेत. त्या ठिकाणीं दुष्काळ क्वचितच पडतो. राज्यव्यवस्थेकरितां जिल्ह्याचे तीन भाग केलेले आहेत. चामन, पिशीन आणि क्वेटा. यांपैकीं पिशीन, चामन आण शोरारूड हीं ब्रिटिश बलुचिस्तानच्या ताब्यांत आहेत व क्वेटा तहशील हा निराळाच प्रांत आहे.