विभाग अकरावा : काव्य - खतें
खटौली- संयुक्तप्रांत मुझफरनगर जिल्ह्याच्या जानसथ तहशिलींतील एक शहर. नॉर्थ वेस्टर्न रेल्वेच्या मीरत ते रूरकी रस्त्यावर हें स्टेशन आहे. लोकसंख्या (१९११) ४७५१. पण १० वर्षांखालीं ती ८६९५ होती. शहर प्राचीन असून त्यांत चार मोठीं जैन देवालयें व शहाजहानानें बांधलेली एक सराई आहे. १८७४ त बिहारांत दुष्काळ पडल्यावेळीं या स्टेशनहून जिल्ह्यांतील शिलकी धान्य बाहेर पाठविण्यांत येई. त्यामुळें हें प्रसिद्धीस आलें. शहरांतील रस्ते फरसबंदी आहेत. बाहेर धान्य व साखर पाठविण्याचा मोठा व्यापार चालतो. बहुतेक मोठे व्यापारी जैन आहेत.