विभाग अकरावा : काव्य - खतें
खट्वांग- एक इक्ष्वाकुकुलोत्पन्न राजा. यास दिलीप असें नामांतर असून क्वचित् ऐलविल म्हटलें आहे. हा मोठा यज्ञ करणारा होता. एकदां देवांनीं यास युद्धांत आपलें सहाय्य करावें म्हणून स्वर्गी नेलें होतें. त्याप्रमाणें त्यानें सहाय्य केल्यामुळें देवांस जय प्राप्त झाला असतां ते यास वर माग असें म्हणूं लागले. यानें आधी माझें आयुष्य किती आहे ते सांगा म्हणजे वर मागेन म्हणतांच त्यांनीं मुहूर्तमात्र आहे असें सांगितलें. मग हा कांहींच न मागतां शीघ्रगामी विमानांत बसून त्वरेनें अयोध्येस आला आणि आपल्या दीर्घबाहु नांवाच्या पुत्रास राज्यावर स्थापून विष्णुलोकाला गेला [भारत द्रोण. अ. ६१; शांति. २९ वन ९]. शंकराच्या एका गदेसारख्या आयुधाला खट्वांग असें नांव आहे.