विभाग अकरावा : काव्य - खतें
खंडायत— ओरिसा प्रांतांतील एक लढवय्यी जात. हिंदुस्थानांत १९११ सालीं एकूण ८०७१०६ खंडायत होते. त्यांपैकीं निवळ विहार ओरिसांतच ७६९३५३ भरले. ओरिसाच्या राजाच्या सैन्यांत या जातींतील बरेच लोक हलक्या दर्जावर असत. `श्रेष्ठ’ वर्ग राजपूतांच्या खालोखाल गणतात. या जातीच्या मध्यप्रांतांतील कांहीं लोकांमध्यें काश्यप, नाग वगैरे गोत्रें आढळतात. पण त्यांवर विवाह अवलंबून नसतो. सामान्यत: एकाच पूर्वजाच्या संततीची आठवण आहे तोपर्यंत विवाह करीत नाहींत. बालविवाहाची चाल यांच्यांत रूढ आहे. वर मिळाला नाहीं व मुलीस न्हाण आलें तर बाणाबरोबर तिचें लग्न करतात. बहुपत्नीत्व रूढ आहे पण अशा मनुष्यास `मैपखिया’ म्हणजे पत्नीभक्षक म्हणतात. लग्नाचा मुख्य विधि वधूवरांचे हात कुशानें एकत्र बांधणें व वधूला कडेवर घेऊन वरानें भोल्याभोंवतीं सात प्रदक्षिणा घालणें हा आहे. धर्मविधीकरितां ब्राह्मणांस बोलावण्याची चाल आहे. [रसेल व हिरालाल. सेन्सास रिपोर्ट.]