विभाग अकरावा : काव्य - खतें
खंडेराव गुजर— शिवाजीमहाराजांचे सेनापती प्रतापराव गुजर यांचा खंडोजी उर्फ खंडेराव हा पुत्र होय. झुल्फिकारखानानें रायगड फितुरीनें घेतल्यानंतर येसूबाईसाहेब व शाहुमहाराज यांनां औरंगझेबाकडे पाठविण्यांत आलें, त्यावेळी गडावर असलेली कांहीं मानकरी मंडळीहि (केसरकर, गुजर वगैरे) पकडलीं जाऊन औरंगझेबाच्या छावणींत गेली. तींत हा खंडोजीहि होता. या सर्व मंडळींस बाटवून मुसुलमान करण्याची इच्छा औरंगझेबास नेहमी होई. परंतु तिच्या आड त्याची मुलगी येत असे. एके दिवशी मात्र त्यानें आज शाहूस बाटवावयाचेंच असा आग्रह धरला. तेव्हां तोहि त्याच्या कन्येनें मोडला. परंतु शाहूच्या ऐवजी दुसरा कोणी तरी मोठा सरदार बाटविण्याचाच जेव्हां त्यानें हट्ट घेतला, तेव्हां खंडोजी हा आपखुषीनें मुसुलमान होण्यास तयार झाला. त्यानें असें धर्मांतर केल्यामुळें शाहूवरील हा प्रसंग टळला. पुढें शाहूमहाराज गादीवर बसल्यानंतर त्यांनीं खंडोजीस या त्याच्या कृत्यासाठीं, परळ खोर्यांतील साठ गांवांचें देशमुखी वतन इनाम करून दिलें. हें वतन त्यापूर्वी सुभानजी लांवघऱें याला, त्यानें सातारचा किल्ला फितूर होऊन औरंगझेबास दिल्यामुळें त्यांच्याकडून इनाम मिळालें होतें. तें त्याच्याकडून जप्त करून शाहूमहाराजांनी खंडोजीस दिले. या खंडोजीचा मुसुलमानी वंश हल्लीं परळीनजीक कामथी येथें राहात असून त्यांतील लोकांनां या गोष्टीची सर्व माहिती आहे. यांचीं नांवें मुसुलमानी नसून हिंदूंचींच असतात. नवरात्रादि सर्व हिंदू सण हे पाळतात. खंडोजीस हिंदू धर्मांत परत घेण्यास त्यावेळीं मंडळी तयार झाली होती. परंतु त्याचें मुसुलमान बायकोवर फार प्रेम असल्यानें तिच्यासह मला पावन करून घ्या असा त्याचा आग्रह पडल्यावरून ती गोष्ट तशीच राहिली. [इति. संग्रह. पु. १. अं. ४; मराठी रियासत भा. २]