विभाग अकरावा : काव्य - खतें
खंडो बल्लाळ— खंडो बल्लाळ हा शिवाजीचा आवडता व विश्वासू चिटणीस बाळाजी आवजी याचा दुसरा मुलगा होय. (बाळाजी आवजी पहा). याचा जन्म इ.स. १६६६ च्या सुमारास झाला असावा. खंडोबास घोड्यावर बसणें, तरवार मारणें व अक्षराचें वळण उत्तम वळवणें इत्यादि तत्कालीन उपयुक्त असें शिक्षण मिळालें होतें. खंडोबल्लाळाचा बांधा मजबूत असून हा अंगानेंही धिप्पाड होता.
शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर जो शिवशाहींत सोयराबाईच्या कारस्थानानें घोंटाळा माजला त्यांत संभाजी राजे यांनां कोणी गैरवांका समजाविल्यामुळें बाळाजी आवजीवर त्यांची इतराजी झाली व त्याचा फायदा घेऊन कलुशानें बाळाजी आवजी व त्यांचे बंधू शामजी बाळा व वडील चिरंजीव आवजी यांस इ.स. १६८१ च्या आगष्ट महिन्यांत परळीखालीं उरमोडीच्या कंठीं मारिलें व खंडो बल्लाळ व निळोबल्लाळ यांस व्याघ्राकडून खावविण्यासाठीं म्हणून सातार्याजवळील `अजिमतारा’ गडावर नेऊन सदरेस उभे केलें. परंतु इतक्यांत कांहीं राजकारण आलें म्हणून कबजी बावाची मजालस उठली व या दोन लहान मुलांनां शिक्षा सांगण्याचें काम तहकूब राहिलें. या वेळी संभाजी महाराजाबरोबर येसूबाईहि सातारियाचे मुक्कामीं होती. तिला जेव्हां बाळाजीच्या वधाची वगैरे ही हकीकत समजली. तेव्हां तिनें संभाजीची चांगलीच कानउघाडणी केली, व संभाजीलाहि झाल्या गोष्टीबद्दल फार पश्चाताप झाला. तेव्हां खंडोबल्लाळ व निळोबल्लाळ यांस येसूबाईनें सोडवून त्यांनां व त्यांचे मातुश्रीला दिलदिलासा देऊन आपल्या जवळ ठेऊन घेतलें. व विसाजी शंकरं राजापूरकर, बाळाजी आवजीचे मामा व लक्ष्मण आत्माजी व इतर कारकून पूर्वापार होते त्यांपासून चिटणीसाचें कामकाज संभाजी घेऊं लागले. परंतु यापूर्वीच कलुशानें बाळाजीची चीजवस्त लुटून गांव इनाम जप्त करण्याचे हुकूम दिले होते. ते सोडवून घेण्याचें तसेंच राहिलें. येसूबाईनें या दोन मुलांना आपल्या जवळ ठेऊन घेतलें व त्यांच्या खर्चालाहि आपल्या खर्चांतून देऊं लागली. तिनें खंडो बल्लाळाला धीर देऊन त्याच्याकडून कामकाज घेऊन संभाजीच्या नजरेस खंडो बल्लाळ येईल असें करूं लागली. तथापि संभाजीच्या हाताखालीं काम करणें बरेंच धोक्याचें होतें. यापुढें संभाजीनें चौलास वेढा दिला व गोवेकरांवर स्वारी केली त्यावेळीं खंडो बल्लाळ जवळ होते, व त्यांस पुष्कळ श्रम व साहस करावें लागलें.
``एका गांवास कौल लिहून द्यावयास सांगितला तो तरी धावतां लिहितां नये म्हणून मागीं बसोन कागद लिहिला. तो तीन चार कोश स्वारी गेली. नि:संग धावोन स्वारी आटोपिली कागद वाचोन दाखवून पालखीत सिके होते. राजश्रीनीं सिका केला. कागद जाबकरी यांचे हातावर देतांच आपास कलमल येऊन रगत वमन जालें. राजश्रींनीं मागें फिरोन दृष्टीस पडिल्यावरी पालखी उभी करून जवळ बोलाऊन नेलें आणि मेहेरबान होऊन बारीचा कोतवालपैकीं घोडा बसायवास दिला. पुढें राजश्रींनी कुंभारजुवेंवर हल्ला केला व फिरंग्याची व संभाजीची लढाई झाली त्यांत राजश्रीचे पुढें चहू हातावर आपाचा घोडा, केव्हां राजश्रीचे घोड्याचे तोंड आपाच्या घोड्याचे दांडीस’’ अशा तर्हेनें खंडोजीची निष्ठा व कामगिरी पाहून संभाजीनें परत रायगडी आल्यावर इ.स. १६८३ च्या डिसेंबर महिन्याच्या अखेरीस चिटनिसीचीं वस्त्रें वगैरे मान देऊन चिटनीसी त्याचे हातें घेऊ लागले व त्यामुळें कलुशाच्या कारभाराला आळा बसला. याप्रमाणें कारभार चालत आहे तोंच इ.स. १६८८ च्या नोव्हेंबरांत संभाजी कलुशाच्या मदतीस गेला व संगमेश्वरीं शिर्क्यांचा मोड करून खेळण्यास जाऊन राहिला. कबिला बरोबर होता तो पुढें रवाना करून संभाजी संगमेश्वरास एक दिवस मुक्काम करून राहिला. येथें शेख निजाझ उर्फ तकरीबखान यानें त्यास अचानक पकडलें. हें वर्तमान कबिल्याबरोबर असणार्या खंडोजीस कळतांच त्यानें येसूबाईंच्या मेण्यांत आपली मावसबहीण संतुबाई इला ठेऊन आपण व संताजी घोरपडे येसूबाई व शिवाजी यांनां घेऊन जलदीनें मजलीवर मजली मारीत रायगडास येऊन पोहोंचले. इतक्यांत मोगलांनीं हा कबिला पकडला व `संतुबाईला’ येसुबाई म्हणून पकडून नेली. तिनें खंडोजीनें दिलेली हिरकणी खाऊन प्राण दिला असें म्हणतात. पुढें राजारामाबरोबर चंदीस गेलेल्या मंडळींत खंडो बल्लाळहि होता व त्या सर्व मंडळींस त्या प्रवासांत अनेक संकटें व हाल सोसावे लागले. एक प्रसंगीं त्याच्या मुलास (बहिरोजीस) त्याजबद्दल कैदेंत रहावें लागलें व पुढें बाटविल्यामुळें त्यानें आत्महत्या केलीं. एका प्रसंगी त्यास तटावरून उडी टाकावी लागल्यामुळें त्याचा पाय कायमचा अधु झाला.
झुल्पिकारखानानें चंदीस वेढा घातला असतां राजारामास तेथून काढून लावण्याच्या कामीं खंडो बल्लाळानें शिर्के मोहिते यांजबरोबर कारस्थान केलें व त्या कामीं त्यास दाभोली व कुचरी गांवची आपली सरदेशमुखीचीं वतनें सोडावीं लागलीं. नंतर ही चंदीहून निघालेली मंडळी कांहीं काल कर्नाटकांत गनीमी लढाया करीत राहून पन्हाळा व विशाळगडीं येऊन राहिली व तेथून पुढील कार्यक्रम चालू केला. इतक्यांत राजाराम महाराज निवर्तले. त्यावेळीं राजारामानें शाहूवरच लक्ष ठेवून आजपर्यंत ज्याप्रमाणें कारभार केला तसाच करावा असें सांगून आणाभाका घेतल्या. परंतु ताराबाईनें तें न ऐकतां शिवाजीस गादीवर बसविलें. त्यामुळें व इतर कारणामुळें खंडोजी व ताराबाईंचें पटलें नाहीं.
``राजश्री चंदीस असतां, राजश्रींचा व आप्पांचा रुणानुबंध चांगलाच पडला. नित्य प्रहरा दिवसांत भोजन करून जांवें, तें राजश्रींनीं निद्रा केलियावरी मध्यरात्रीस घरास जावें कारभार व वाडियांत जाणें येणें खेळणें, राजवाडियांतील कजिया खोकला जाहला तरी समजाविशी आप्पाशिवाय होत नव्हती. कोण येके गोष्टींचा पडदा नव्हता. आठांचौं दिवसीं अंगावरील पोशाख आप्पास द्यावे.’’ तेच ताराबाईचें अंमलांत बोलावल्यास जावें, विचारल्यास उत्तर द्यावें, असें होत होतें. इतक्यांत शाहु महाराज सुटून आले. खंडोजीचा ओढा पहिल्यापासून येसूबाई व तिच्या मुलाकडे असणें साहजीक होतें. संताजी घोरपडे यांच्याशी खंडोबाजा अति स्नेह होता. तेव्हां खंडोबा व संताजी घोरपडे यांनीं शाहूला राज्यांत आणण्यांत जितकी कष्ट मेहनत करवली तितकी केली. ताराबाईचा लकडा पाठीशीं होता. परंतु त्याला या कार्यकुशल माणसांनी दाद न देतां लटकीच लढाई केलीशी दाखवून शाहूला राज्यांत आणलें. ताराबाई व राजसबाई यांच्यांतील वैमनस्याचाहि फायदा यांनां चांगलाच घेतां आला. शाहूची स्थापना राज्यावर केल्यानंतर रामचंद्रपंत व संक्राजीपंत सचीव हे ताराबाईकडे गेले व प्रल्हाद निराजीचा अंत आधींच झाला होता त्यामुळें खंडोबा याच्याच तंत्रानें सर्व कारभार होऊं लागला. ताराबाईच्या अमदानीपासून खंडोबा हा संताजीबरोबर लढाईवर जात असे व जी कांहीं प्राप्ति होत असे, त्यांतील पांचोत्रा खंडोबास मिळे. शाहूच्या अमदानींत तर कोणचीहि गोष्ट खंडोबास नापसंत असेल तर ती करू देत नसत. एकदां परशुरामपंतास त्याचे छातीवर तक्ते ठेवून त्यावर मल्ल बसवून त्यांनां मारण्याचा हुकूम शाहूनें दिला, ही बातमी खंडोबास कळतांच खंडोबानें त्या मल्लास ओढून काढून पंतास सोडविलें. बाळाजी विश्वनाथाचा व खंडोबाचा विशेष लोभ होता. आणि खंडोबाच्या उत्तर वयांत बाळाजीनें सर्व तोल सांभाळला. खंडो बल्लाळ शके १६४८ अश्वीन शु. ५ स वारला.
चिटणिसी वतन खंडोबाकडे आलें होतें; परंतु ते चालविण्यास जीं गांवें दिली होतीं, तीं त्याच्याकडे शेवटपर्यंत चालली नाहींत. संभाजीच्या वेळी तर इनामती उजू होणें शक्य नव्हतें; आणि संभाजीनंतर राजाराम चंदीस जाऊन पडल्यामुळें पैसा कोठूनहि मिळेनासा झाला. त्यामुळें खंडोबा नेहमी कर्जबाजारी राहून त्याच्या घरीं नेहमीं सावकारी धरणीं बसलेलीं असत. खंडोबाचा भाऊ निळोबा हाच घरचा कारभार पाहत असे. परंतु तो भयंकर उधळ्या असे. त्याला कधी खर्चाबद्दल बोलल्यास तो आम्हाला ब्राह्मणी वेश नको म्हणून वर्दळीवर येई. म्हणून खंडोबानें त्याच्याजवळ खर्चाबद्दल बोलणें सोडून दिलें होतें. खंडोबाची प्राप्ति म्हणजे पूर्वी येसूबाईकडून मिळालेला व नंतर राजारामाकडून मिळालेला ऐवज हीच होती. खंडोबा घराच्या व्यवस्थेकडे कधीच पहात नसे. त्याच्या पहिल्या बायकोचें नांव म्हाळसाबाई असून तिला बहिरवजी नांवाचा पुत्र व पुतळाबाई नांवाची कन्या होती. ही बायको चंदीस गेल्यानंतर एक वर्षाच्या आंत वारली म्हणून दुसरें लग्न केलें. तिचेंहि नांव म्हाळसाबाई असेंच होतें. ती किंचित कुरूप होती. म्हणून राजाराम महाराजांनी तिसरें लग्न करून दिलें. तिचें नांव तुळजाबाई असें होतें. दुसर्या म्हाळसाबाईला जिवाजी, बापूजी, गोविंदराव व सदाशिव हे चार पुत्र व बायजाबाई ही कन्या होती. तुळजाबाईस एक पुत्र व सात कन्या अशीं आठ अपत्यें झाली. मुलाचें नांव भैरवजी व मुलींचीं संतु, आमा, अनु, सुंदरा, तुकाबाई, राणी व येसू अशीं होतीं.
चंदीहून निघतांना खंडोबा खासाच निघाला होता. गणोजी शिर्क्याने त्याचा कबिला पोहोंचता करावयाचा. परंतु निळो बल्लाळानें जर खंडोबाचा सर्वच कबिला येथून गेला तर आमची वाट काय म्हणून हट्ट धरला. तेव्हां म्हाळसाबाई व तिचीं मुलें काय ती गणोजीनें पोहोंचविलीं. नंतर किल्लेदाराची सरसबाई हिला मूल नव्हतें म्हणून पुतळाबाईची तीन वर्षांची एक कन्या ठेवून घेऊन तिची सुटका केली. खंडोबानंतर जिवाजी खंडेरावास चिटणिसी दिली. [लेखक- वा. सी. बेन्द्रे].