विभाग अकरावा : काव्य - खतें
खंडोबा— एक अर्वाचीन ज्ञातिविशिष्ट देवता. खंडोबा उर्फ मल्हारी मार्तंड किंवा मार्तंड भैरव हा बहुधा सर्व देशस्थांचा कुलस्वामी असतो. दक्षिणेंत जेजुरीस याचें प्रसिद्ध स्थान आहे. त्याचें माहात्म्य जयाद्रि माहात्म्यांत वर्णिलें आहे. देशस्थांप्रमाणें रामोशी, धनगर हे खंडोबाचे उपासक असतात. खंडोबा देव बनण्यापूर्वी लिंगायत वाणी होता असें रामोशी समजतात. त्याला दोन बायका एक वाणी व दुसरी धनगर जातीची असून ह्यांसमवेत तो घोड्यावर बसलेला असतो, हातांत तलवार असते. वनस्पतिवर्गांत भंडारात खंडोबाचें अस्तित्व आहे असें समजून भंडार पवित्र मानण्यांत येतो. रामोशी तर भंडाराची शपथ वहातात. प्राणीवर्गांत कुत्र्याच्या रूपांत खंडोबा वास करितो. घरांतून खंडोबाच्यां धातूच्या मूर्ती असतात. कोणी मूलबाळ होण्याकरितां खंडोबास नवस करितात व मूल झालें म्हणजे ते त्याच्या पायावर घालतात. मुलगा असल्यास वाघ्या बनतो व मुलगी असल्यास मुरळी होते. अशा वाघ्यामुरळ्या महाराष्ट्रांत पुष्कळ ठिकाणीं आढळतात. भक्तांच्या कपाळीं भंडार लावून हे पैसे मागतात व अनाचारांत आयुष्य कंठितात. [मुरळी, देवदासी पहा]. हेमचंद्र हरस्कंदौ या संस्कृत द्विवचनाचें हरखंडा असें प्राकृत रूप देतो. खंडा हें अनेकवचन आहे. प्राकृतांत प्राय: द्विवचन नाहीं. तात्पर्य स्कंद या संस्कृत शब्दाचें प्राकृत रूप खंड असें होतें. त्यांचें ममतादर्शक मराठी रूप खंडू व प्राशस्त्यदर्शक मराठी रूप खंडोबा. म्हणजे महाराष्ट्रात जेजूरी, पाली वगैरे ठिकाणचे जे खंडोबा आहेत ते मूळचे स्कंद होत. स्कंद म्हणजे कार्तिकस्वामी. कार्तिकस्वामीचें देऊळ पुण्याच्या पर्वतीस आहे. तें स्कंदाचें म्हणजे खंडोबाचेंच होय. इतकेंच की पर्वतीवरच्या त्या देवाचें नांव संस्कृत आहे व जेजुरीच्या देवाचें नांव प्राकृत आहे. स्कंद ही देवता वीरांची व योध्यांची फार पूर्वीपासून आहे. स्कंदाला सेनानी हें अपरनाम आहे. त्याची उपासना वीर करतात. महाराष्ट्रांतील सर्व जातीचे मराठे (ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, रामोशी वगैरे) खंडोबा हें आपलें कुलदैवत कां समजतात हें वरील उद्घाटनावरून समजणार आहे. खंडोबा हें शिवदैवत आहे असें कित्येक समजतात, तें अर्थात निराधार आहे. स्कंदपुराणांत स्कंदोपासकांची म्हणझे खंडोबाच्या उपासकांची माहिती सांपडते. (भारत इ. संशोधक मंडळ १८३२).