विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे
खत्री- एक कोष्टी जात. खत्र्यांत एक क्षतियखत्री व एक छत्री (कोष्टी) खत्री असे दोन पोटभेद असून पहिल्याची लो. सं. ५,९९,१५९ इतकी असून दुस-याची ११९५८४ इतकी आहे (१९११). या नांवाखालीं हिंदु, शीख, मुसुलमान, जैन इतक्या जाती येतात त्यांची मुख्य वस्ती बंगाल, बहार, ओरिसा, पंजाब, संयुक्त प्रांत, काश्मीर, मुंबईइलाखा इकडे आहे. हे लोक पंजाबात ४। लाख तर मुंबई इलाख्यांत १।।। लाख आहेत. महाराष्ट्रांत यांची संख्या बरीच असून यांचा इकडील मुख्य व्यवसाय जर व कलाबूत काढणें व पितांबर वगैरे रेशमी वस्त्रें तयार करणें हा होता. परंतु हल्लीं परदेशांतून जर कलाबतू येऊं लागल्यानें त्यांचा हा धंदा बसला आहे. रेशमी वस्त्रेंहि हल्लीं कमी निघूं लागलीं आहेत. त्यामुळें हे हल्लीं सावकारी करतात. यांच्यांत मौंजीबंधन करितात; विधवाविवाह यांच्यांत निषिध आहे. खाली मद्रासकडे यांच्या चालीरीति तिकडील पटवेगार जातीप्रमाणें असून, त्याच्यांत रोटीव्यवहार चालू आहे. हे खत्री आपल्यास रेणुकापुराणाच्या आधारानें क्षत्रिय म्हणवितात. परशुरामाच्या भयानें क्षत्रियांच्या गर्भवती स्त्रिया कालीमातेच्या आश्रयास गेल्या. त्यांनां संतति झाल्यावर कालीनें तिच्या हातीं चरखे दिले. तेव्हांपासून ही जात विणकामाचा धंदा करूं लागली अशी दंतकथा सांगतात. तिकडे हिला पटनूलकर व भुजराज क्षत्रिय (सहस्त्रार्जुनाचे वंशज) अशीहि दुसरीं नांवें आहेत. यांची कुलदेवता रेणुका असून यांच्या पोट जातींचीं नांवे सुलेगार, पोवार, मुडूगल, बोजागिरी वगैरे आहेत, आणि त्यांच्यांत गोत्रेंहि आहेत. यांच्यांत लग्नविधी सात दिवस चालून त्यावेळी ब्राह्मण अवश्य लागतो. लग्न समाप्तीनंतर हे गोंधळ घालतात. आणि या सात दिवसांत मांसाहार वर्ज करितात. यांच्या पंचायतींतील पुढा-यास ग्रामणी व दुय्यमास वंजा म्हणतात. हे शैवपंथी आहेत.
जयपूर एजन्सींतील खत्री हे शेती करितात. यांच्यांत सूर्य, भाग, कोच्चिमो व नाग अशा चार पोटजाती आहेत. यांची मुंज लग्नाच्याच वेळीं होते. यांना पात्रो असें दुसरे नांव असून, यांची भाषा उडिया आहे. गुजराथेंत यांची मुख्य वस्ती भडोच, सुरत, अहमदाबाद इकडे आहे. त्यांचें म्हणणें असें आहे कीं, आपण मूळचे सिंधमधले असून १६ व्या शतकाच्या सुमारास गुजराथेंत व्यापारानिमित्त उतरलों व आपण ब्रह्मक्षत्रिय आहों. त्यांचा नीटस चेहरा व गौरवर्ण यांवरून त्यांचें म्हणणें खरें असावें असें १९११ च्या खानेसुमारीच्या रिपोर्टांत म्हटलें आहे. यांचें मुख्य दैवत सिंधच्या पश्चिमसरहद्दीवरील हिंगळजदेवी होय. हे बहुतेक शाकाहारी आहेत. हे मद्यसेवन करितात. व दक्षिणेकडे कांहीं खत्री मासे खातात. यांचा धंदा लहंगे, ओढण्या वगैरे सुती कापड विणण्याचा आहे. परंतु परदेशी कापडाच्या आयातीमुंळें हल्ली हा हातमागाचा धंदा बसत चालला आहे. सुरत जिल्ह्यांत हे लोक जर व कलाबतू काढतात. या कामांत यांच्या बायकाहि त्यांनां मदत करतात. हे वैष्णवपंथी असून मंत्रतंत्रावर भरंवसा ठेवणारे आहेत. यांच्या ब-याचशा चालीरीती इकडील वाण्यांप्रमाणें आहेत. यांच्यांत शिक्षणाचा अभाव फार असून नवीन उद्योगधंदे काढण्याची धमकहि नाहीं. सुरत जिल्ह्यांत यांच्या दोन पंचायती आहेत. त्यांतील सभासदांना शेटिया किंवा कारभारी म्हणतात. दंड व जातिबहिष्कृति या यांच्या शिक्षा होत. ज्ञातीच्या पट्टीची व्यवस्था धाकट्या पंचायतीकडे असते. काठेवाडांत यांच्या कायमच्या मध्यवर्ती पंचायती, जामनगर, भावनगर, पोरबंदर व गोंडळ येथें आहेत. पंचायतींतील निकालाविरूद्ध पंचायतीचे मुख्य जे पटेल त्यांच्या मेळयांत (पटेलमेळा ही एक पंचायतींच्या वरची सभा असते) अपील दाखल करतां येतें. येथील निकाल मात्र कायम व शेवटचे समजले जातात. पंजाबांत हे हिंदु व शीख या दोन्हा धर्मांचे असून तिकडे त्यांनां वरिष्ठ दर्जाचे मानतात. यांचा मुख्य धंदा व्यापार आहे; परंतु हल्ली सरकारी अगर खाजगी नौकरींत हे शिरूं लागले आहेत. हिंदु खत्र्यांत सोधी, बेदी वगैरे पोटजाती आहेत.
काश्मीरांतहि हे लोक असून तेथें ते हिंदु, शीख, जैन या धर्मांचे असून वर्णानें वैश्य आहेत. यांचा धंदा व्यापार व सावकारी असून हल्ली संस्थानच्या मुलकी खात्यांतून नौकरीच्या निमित्तानें यांचा भरणा बराच होत चालला आहे. मध्यप्रांतात यांची वसती ५ हजारांपर्यंत असून ती तुरळक तुरळक सर्व प्रांतांत पसरलेली आहे. हेहि आपल्यास क्षत्रिय म्हणवितात. क्रूक्सच्या मतें यांच्या गौर वर्णावरून व घा-या डोळयांवरून हे क्षत्रियोत्पन्न असावेत. यांच्या स्त्रिया सुरेख असतात. परशुरामाच्या सपाटयांत एक गर्भवती क्षत्रिय स्त्री एका सारस्वत ब्राह्मणाच्या आश्रयास राहिली होती व त्यानें परशुरामाची खात्री करण्याकरितां ही मुलगी माझी आहे असें सांगून तिच्याबरोबर तो एका ताटांत जेवला अशी एक कथा हे सांगतात व तिच्या मुलापासून खत्री जन्मले असें म्हणतात. अद्यापि सारस्वतब्राह्मण हे यांच्या हातची कच्ची रसोई खातात; त्यावरून ही ब्राह्मण अगर क्षत्रिय यांची संतति असावी असें म्हणतात. सर क्यांबेल म्हणतो कीं, हे पंजाब, अफगाणिस्तान व तुर्कस्तान इकडे व्यापार करतात. शिखांचे गुरु नानक व गुरु गोविंद हे खत्री होते असें म्हणतात. रणजितसिंगाचे बरेचसे अधिकारी, दिवाण सावनमल, मूलराज हेहि खत्री होते. शिखांचे गुरू जरी खत्री होते तरी ही जात साधारण हिंदूच राहिली. फारच थोडयांनीं शीखधर्म स्वीकारला. यांच्यांतील शेर अगर शेरा नावाची जात गोळकांची आहे असें ते मानितात. तथापि त्यांचें रंगरूप यांच्याच सारखें आहे. यांच्यात विधवाविवाह व घटस्फोट निषिद्ध आहे. अनेक बायका करण्याची जरी यांच्यांत चाल नाहीं तरी दासी म्ळणून अनेक स्त्रिया हे पदी बाळगूं शकतात व यांच्यापासून होण-या संततीलाच गोळक म्हणतात. नेमाडांत हे लोक विणकाम व रंगा-याचें काम करतात आणि बर्हाणपुरास कलाबूत व जरीचें काम करतात.
यांच्यातील लग्नांत पुढील विधि लक्षांत ठेवण्यासारखा आहे. वर हा वधूमंडपांत आला म्हणजे एका बंद केलेल्या पालखीला सात प्रदक्षिणा घालतो व प्रत्येक प्रदक्षिणेला वधूचा भाऊ कण्हेरीच्या फांदीनें त्याला फटका मारतो. या पालखीत आधींच मुसुलमानी पद्धतीचा (पायजमा वगैरे) पोषाख घालून वधू बसलेली असते या संबंध दिवसांत वधून आपले डोळे घट्ट मिटून ठेवते व जेव्हा बोहोल्यावर तिला आणतात तेव्हाच वराला पाहण्यासाठीं म्हणून ती डोळे उघडते. सोमवारी, गुरुवारीं व शुक्रवारीं वधूला शेजारीं-पाजारीं लपवितात व तिला वरानें शोधून काढावें लागतें. तिला धुंडाळून लग्नमंडपात आणल्यानंतर ती दोघें परस्परांचे केस विंचरतात. सुतकांत छाती पिटण्याची गुजराथी पद्धत (एक वर्षपर्यंत) यांच्यांतहि थोडयाफार फरकानें असून विधवेनें वर्षभर फक्त वरण व राळयाची भाकरी खावी लागते. [ठाणें ग्याझे; सेन्सस ऑफ इंडिया. १९१ व्हॉ. ७,१४,२०; थर्स्टन-कास्ट्स् अॅड ट्राइब्ज् ऑफ सदर्न इंडिया; रोझ-ग्लॉसरी. व्हॉ. २; क्रूक्स-कास्ट्स अँड ट्राइब्ज इन यू. पी. आणि रसेल व हिरालाल-कास्ट्स् अँड ट्राइब्ज् इन सी. पी.]