विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे
खरोष्ट्र- एका चिनी लेखांत काशगरला जुनें नांव खरोष्ट्र होतें असा आधार मिळतो. खराष्ट्री लिपि काशगारियापासून उत्पन्न झाली असावी असें विधान लेव्ही करितो. त्यास पिशेल व फ्राके आक्षेप घेतात. अधिक माहिती मिळवून व विचार करून हेडव्हाय असें सांगतों कीं, काशगर, खोतान इत्यादि प्रदेशाच्या आसपासच्या ब-याच भागाला खरोष्ट्र हें नाव होतें व त्या देशाची लिपि तीच खरोष्ट्री होय.
अवतंसक सूत्राच्या चिनी भाषांतरांत या देशास 'पिएनयि' व 'चौले' अशीं नावें आढळतात 'चौले' याबद्दल सूर्यगर्भसूत्रांत 'यूतइएं' (खोताना) हें नांव येतें. यावरून खरोष्ट्र हें नांव पूर्वीं हल्लींच्या खोतान प्रांतास व आजूबाजूच्या डोंगरी मुलखास लावीत असावे. खरोष्ट्र याचा अपभ्रंश खोताना या शब्दामध्यें होणें स्वाभाविक आहे.
आतां सूर्यगर्भाच्या तिबेटी रूपांतरावरून पहातां असें दिसतें की, खोताना हा प्रांत खश देशामध्यें होता. खश हें नांव संस्कृत वाङ्मयांत व महाकाव्यांमधून व धर्मशास्त्रावरील ग्रंथांतून आढळतें. नेपाळ देशांतील गुरखे लोक आपणास 'खश' म्हणवून घेण्यांत भूषण मानतात. व त्यांची भाषा खश अथवा पर्वतीय या नांवाने प्रसिद्ध आहे. खास अथवा खश ही नांवें हल्लीं हिंदु लोक हिमालय पर्वतांतील प्रदेशांत रहाणा-या अर्धवट हिंदु लोकांस सरसकट लावतात असे लेव्ही आपल्या नेपाळवरील ग्रंथांत म्हणतो.)
ललितविस्तरावरून खश हा देश सिंधु नदीच्या खालच्या भागाच्या तीरावरील दर्दिस्तान व चीनची सरहद्द यांच्या दरम्यान असला पाहिजे. तेव्हां सूर्यगर्भ सूत्रांवरून शोशीर्ष खश प्रांतांत आहे व या प्रांतालाच काश्गर म्हणत असत. यावरून आपणांस असें दिसतें कीं खोतान व काश्गर हीं दोन्हीं प्रांतनामें खरोष्ट्र प्रांताबद्दल असावीं. आतां बुद्ध भद्राचें भाषांतर आपल्या मदतीस घेतलें असतां असें दिसून येईल कीं, खोताना व काश्गर हे दोन्ही प्रांत, 'पिएन यि' यानें दर्शविला जाणारा हिंदुस्थान व चीन यांच्या सरहद्दीवरील रानटी लोकांचा जो प्रदेश, ज्याला हल्लीं भूगोलांत टार्किस्तान असें म्हणतात, त्या प्रदेशांत येतात. हा प्रदेश हिंदुस्थान, चीन व इराण यांचें सर्वसाधारण अधिकारक्षेत्र होतें. हा सर्व प्रदेश म्हणजेच खरोष्ट्र देश होय.
बौद्ध प्रदेशाचे मुख्य तीन भाग म्हणजे हिंदुस्थान, खरोष्ट्र व चीन असे होते. यावेळीं तीन लिपी प्रचारांत होत्या. ब्राह्मी (फान), डावीकडून उजवीकडे लिहिली जाणारी; खराष्ट्री (किआ-लो अथवा किआ-लौ-चो-ति), उजवीकडून डावीकडे लिहिली जाणारी; व चिनी, वरून खालीं लिहिली जाणारी. अशा प्रत्येक लिपीला एक उत्पादक महात्मा होता. ब्राह्मीचा ब्रह्मा, खरोष्ट्रीचा खरोष्ट्र (किआ-लौ- अथवा किआ-ले-चो-त्चा) व चिनांचा 'त्संग-हिए' या तीन लिपींचा व उत्पादकांचा उल्लेख प्रथम 'सेंग येओयु' यांने इ. स. ५२० मध्यें लिहिलेल्या त्रिपिटक ग्रंथांच्या यादीमध्यें (त्चौ-सान-त्संग-कि-त्सि) आढळतो. सिद्धम् सांप्रदायामध्येंहि या तीन लिपींचा उल्लेख असून ते हा भेद कायम ठेवितात. याशिवाय दुस-या ग्रंथांतूनहि याबद्दलचा उल्लेख आढळतो. यावरून खरोष्ट्र लिपी ही खरोष्ट्र देशाप्रमाणेंच हिंदुस्थान व चीन यांच्या दरम्यान होती असें दिसतें.
खर व उष्ट्र हे दोन शब्द पुष्कळ ठिकाणी एकाशेजारीं एक वापरलेले दृष्टीस पडतात. हे दोन्ही प्राणी पुष्कळ प्रदेशांत एका ठिकाणीं आढळतात. गर्दभाचा प्रदेश म्हटला म्हणजे झीरियापासून गोबीच्या मैदानापर्यंतचा आहे. व उंटाचा ओसाड मैदानें हा ठरलेलाच आहे. हिंदुस्थानांत उंटाचा प्रदेश सिंधुनदीच्या मुखापासून सतलज नदीपर्यंत येतो. गर्दभांचा प्रांत मात्र पश्चिम हिंदुस्थानांत दक्षिणेकडे बराच लांबपर्यंत पसरला आहे. खर व उष्ट्र हें इराणांतील मुख्य प्राणी होत. त्यांच्यापैकीं झरथुष्ट्र व त्याचा सासरा फ्रशौष्ट्र या नांवावरूनहि त्यांनी उंट व गर्दभ यांस दिलेलें महत्व दिसून येतें. अवेस्ता ग्रंथ मध्येंहि उष्ट्रास बरेंच महत्व दिलें आहे. ८,४२,९,३७. उष्ट्राचा उल्लेख ॠग्वेदामध्येंहि दानस्तुतीमध्यें विशेषतः आढळतो. ८,६,४८; वायव्य हिंदुस्थानाचा जेथें संबंध येतो. तेथें आपणास उंष्ट्र व खर. हीं दोन्ही नांवे एका ठिकाणीं आढळतात. महाभारतामध्येंहि मद्रक व बाल्हीक यांचें वर्णन करतांना व त्या देशाचा उल्लेख करतांना खरोष्ट्र हा शब्द वापरलेला दिसतो.
आतां हिंदु लोकांनी जर खरोष्ट्र हा शब्द नुसता प्राणिवाचक वापरला असता तर त्याचें व्याकरणशुद्ध रूप उष्ट्रखर हें त्यांनीं वापरलें असतें पण त्यांच्या कानावर खरोष्ट्र हें नांव वारंवार पडल्यामुळें त्यांनी खरोष्ट्र हा शब्द संवयीनें बरोबर समजून प्राणिवाचकहि तेंच रूप वापरलें. यावरून महाभारतकालीं व मनुस्मृतीच्या कालीं हिंदु लोकांस खरोष्ट्र देश ऐकून ठाऊक होता असें म्हणण्यास हरकत नाही. यासंबंधी निश्चित सत्य एवढेंच आहे कीं इ. सनाच्या पहिल्या शतकांत खरोष्ट्र हें नांव हिंदु लोक वायव्येकडील सरहद्दीवरील मुलुखास लवीत असत. हा प्रदेश म्हणजे ब्राह्मणी राज्याच्या पलीकडील रानटी लोकांचा पश्चिमेकडे पसरलेला देश होय. कांग्रा खोऱ्यांतील द्वैभाषिक शिलालेखांवरून व त्यांतील ब्राह्मी व खरोष्ट्री लिपीवरून सतलज नदीचा वरचा भाग म्हणजे या दोन्ही लोकांचें मिश्रण असलेला प्रदेश होय. याच्या पूर्वेकडील भाग ब्राह्मणांचा होता व पश्चिमेकडील रानटी लोकांचा होता. [लेव्ही - इं. अँ. १९०६]