विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे
खसखस- हें अफूच्या झाडाचें बी आहे. हें उत्तम खाण्याच्या पदार्थांमध्यें गणलें जातें. याचा अनरशांना लावण्यासाठीं, मिठाई करण्यासाठीं व इतर रीतीनें स्वयंपाकांत उपयोग करितात. यांत मादकपणा मुळींच नसून उलट एक प्रकारची चव असते. खसखशीचें तेल काढतात. ज्या बोंडातून अफू काढलेली नसते, त्यांतील खसखशींतून जास्त तेल निघतें. खाण्याचे पदार्थ करण्यासाठीं, तेल जाळण्यासाठीं, ओंगण व साबण तयार करण्यासाठी हें तेल उपयोगी पडतें. याची पेंड गोड व पौष्टिक असते. व गरीब लोकांनां व गुरांनां उपयोगी पडते. हें तेल उन्हांत ठेविल्यानें अगदीं स्च्छ पांढरें होतें. म्हणून रंगांत टाकण्यास हें विशेष उपयोगीं पडतें. पण हें महाग असल्यामुळें खप विशेष होत नाहीं. यांत केलेला सफेद्याचा रंग लवकर विटत नाहीं. गंधकाम्लांत मिळविलें असतां उष्णमान ८० पासून ९० पयंत चढतें. हिंदुस्थानांत इराणांतूनहि खसखस येते पण अलीकडे कमी येऊं लागली आहे. खसखसीची निर्गतहि बरीच होते. १९०६-७ सालीं ८०२६१५ हेड्रे. किं. रु. ६५७७२३१ ची खसखस परदेशीं गेली. खसखसीच्या किंमतींत बरेच फेरबदल होतात असें दिसतें. फ्रान्स, बेलजिअम आणि जर्मनी या देशांत बराच माल जातो. निर्गत बहुतेक मुंबईहून व कांही कलकत्याहून होते. ('अफू' पहा).