विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे
खाराघोडा- मुंबई इलाख्यांतील अहमदाबाद जिल्ह्याच्या विरमगांव तालुक्यांतील एक खेडेंगांव. कच्छाच्या रणाच्या सरहद्दीवर हें वसलेलें आहे. इसवी सन १८७५ साली खाराघोडा येथें एक मिठागर उघडण्यांत आलें. पण मिठाची वाढती मागणीं होऊं लागल्यामुळें १८८१-८२ मध्यें खाराघोडांपासून ६ मैलावर ऊरू या गांवीं बरींच मिठागरें उघडण्यांत आली. १९०४-०५ मध्यें खाराघोडा व उरू येथें २५,४५,५२१ मण मीठ तयार झालें व २३,१३,९६५ मण विकलें गेलें. खाराघोडा येथें दोन असिस्टंट कलेक्टर असून त्यांच्याकडे या मिठागराची देखरेख करण्याचें काम आहे. या शहरामध्यें एक दवाखाना, एक लायब्ररी, एक धर्मशाळा व एक मार्केट अशा इमारती आहेत. शहराच्या उत्तरेस एक मैल अंतरावर असलेल्या तलावातून शहराला पाणीपुरवठा केला आहे.