विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे

खारान- बलुचिस्तानांतील कलात संस्थानाचा एक अर्धवट स्वतंत्र जातीचा मुलुख. याचें क्षेत्रफळ १४,२१० मैल आहे. हा मुलुख उंचसखल असून ईशान्येस समुद्रसपाटीपासून २५०० फूट व पश्चिमेस १६०० फूट उंच आहे. याच्या उत्तरेस रासकोटचा डोंगर, दक्षिणेस सिपाहांन डोंगराची रांग व पूर्वेस गर्रचा डोंगर असून पश्चिमेस पर्शियाची व याची सरहद्द एकच आहे. या प्रदेशांतून बदो व माल्केल या नद्या वहात गेल्या आहेत. या नद्यांच्या कांठच्या जमीनी लागवडीला योग्य आहेत. तसेंच डोंगराच्या पायथ्याशीं असलेली बरीचशी जमिनीहि लागवडीस योग्य आहे. असें असलें तरी एकंदरीत हा मुलुख पडीकच आहे असें मानण्यांत येतें व त्यांत बरेंच तथ्यहि आहे. कारण वरील लागवडीला योग्य असलेल्या थोडयाशा टापूशिवाय बाकीचा सर्व प्रदेश वालुकामयच आहे. बदो व माल्केल या दोन नद्यांखेरीज गर्रक अथवा सराफ व कोरकान या दोन लहान नद्या या प्रदेशांतून वहात गेल्या आहेत. येथील हवा कोरडी पण आरोग्यदायक आहे. उन्हाळ्यांत दिवसा फार उकाडा होतो पण रात्री थंडी पडते. या प्रदेशांत फारच थोडा पाऊस पडत असून तो जानेवारी ते मार्चच्या मध्यंतरी पडतो.

१७ व्या शतकाच्या अखेरीपर्यंतचा या प्रदेशाचा इतिहास अज्ञात आहे. यावेळीं खारानचा नौशेरवाणी संस्थानिक इब्राहिमखान कंदाहारच्या खिलजी घराण्याचा मांडलिक होता. १७३४ त खारनच्या पुरदिल खानावर नादिरशहानें खरी केली. या काळांत खानारचा किर्मानमध्यें समावेश होत असे. पहिल्या नार्सारखानानें हा मुलुख किलातच्या अमलाखालीं आणिला. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यकाळांत खारानच्या अझादखानाला अफगाणिस्तानच्या हातांत जावें लागलें. नंतर खानार ब्रिटिशांच्या संरक्षणाखालीं आलें. संस्थाकिाला दरसाल ६००० रु. देण्यांत येतात. त्याशिवाय डोईपट्टी, जनावरपट्टी, दंड, बेवारसी संपत्ती वगैरेंचें उत्पन्न त्याला मिळतें. सैन्य व पाहुणे यांवर मोठा खर्च होतो. खारानांत वस्ती सुमारें २२००० आहे. बहुतेक लोक भटके आहेत. कायम गांवें सुमारें २० असून शहर-इ-कारेझ किंवा खारान कलात हें मुख्य ठिकाण आहे. मुख्य भाषा बलुची आहे. पुराच्या पाण्यावर कोरडवाहू शेती होते. खजुराचीं झाडें पुष्कळ होतात. शेळयामेंढया, लोकर व तूप हा निर्गतीचा माल आहे.