विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे
खिरणी-रायण- खिरणी अथवा रायणीचीं झाडें वाकुळीसारखींच असून ती मुंबई इलाख्यांत बहुतेक सर्व ठिकाणीं होतात. विशेषः गुजराथेंत रस्त्यांच्या कडेला खिरणीचीं झाडें पुष्कळच दृष्टीस पडतात. यांना उष्ण व कोरडी हवा चांगली मानवते. झाडें बीं लावून करतात व तीं बहुतेक सर्व प्रकारच्या जमिनींत होतात. फळ एप्रिल व मे महिन्यांत तयार होतें. गुजराथी लोकांनां हें फळ फार आवडतें. खिरणीचीं झाडें रस्त्याच्या बाजूला लावण्याला फार चांगल्यापैकीं आहेत. कारण एकदां लावल्यावर त्यांची पुन्हां काळजी घ्यावी लागत नाहीं, झाडाची पालवी झडत नाहीं. लांकूड उत्तम व कणखर असतें. फळहि रुचकर असतें. यामुळें उन्हाळ्यांत व दुष्काळाच्या दिवसांत गरीब लोकांचा या फळांवर बराच गुजारा होतो. [वनौ. गुणा.]