विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे
खुश्रू अमीर- हा हिंदुस्थानांतील एक प्रसिद्ध कवि होता. ह्यानें दिल्लीच्या पुष्कळ बादशहांच्या अमदानींत काम केलें. ह्यानें ९९ काव्यें लिहिलीं आहेत. ह्याचा बाप अमीर महमद सैफ उद्दीन हा एक तुर्क असून तो बल्खहून हिंदुस्थानांत आला. व पतियाळा येथें राहिला. येथेंच खुश्रूचा इ. स. १२५३ त जन्म झाला. खुश्रू निजाम उद्दीन औलिआनंतर सहा महिन्यांनीं मरण पावला. हा निजाम त्याचा पारमार्थिक गुरु होता. खुश्रूची कबर जुन्या दिल्लींत घायासपूर येथें औलिआच्या कबरीजवळ आहे. खुश्रू इ. स. १३२५ च्या सप्टेंबरमध्यें मरण पावला. एच्. एम्. इलीअट म्हणतो 'दुर्दैवानें खुश्रू अशा काळांत उत्पन्न झाला की, त्याकाळीं हिंदुस्थानांत दुर्गुणाचें साम्राज्य होतें.' त्यांतल्या त्यांत त्याच्या आयुष्याच्या शेवटीं शेवटीं दिल्लीच्या तख्तावर घियास उद्दीन तघलख हा न्यायी राजा बसल्यानें त्याला जरा आनंद झाला. ह्या राजाची हकीकत त्यानें आपल्या तघलखनामा नांवाच्या इतिहासांत लिहिली आहे. हा राजा खुश्रूच्या मरणापूर्वीं थोडे दिवसच मरण पावला. त्यांचीं काव्यें विशेषतः त्याच्या देशबांधवांनां पसंत पडलीं होतीं, व ती त्यावेळच्या इतर पर्शियन कवींच्या काव्यांच्या तोडीचीं होतीं. त्याचीं मुख्य काव्यें:- युआफत-अल-सघिअर, शट-अल हयात, घुरत-अल-कमाल-, बकिआ नकिआ, हइप्त बेहिप्त, सिकंदरनामा व रिसल नस्र. ह्यांच्या शिवाय दुसरींहि पुष्कळ काव्यें आहेत. त्याचें नुह सिपेर्ह अथवा नऊ गोल नांवाचें एक अद्भुतकथात्मक काव्य आहे. याशिवाय त्याचीं पुढील काव्यें आहेत. क्किरान-अस-सैदान- नांवाचें काव्य सुलतना मुइझ उद्दीन कैकुबाद नांवाच्या दिल्लीच्या राजाच्या व त्याचा बाप नासिरुद्दीन भग्रखान, बंगालचा राजा, ह्याच्या स्तुतिपर आहे. मक्काला नांवाचा ग्रंथ पहिल्या चार खलिपांसंबंधाचा आहे. इष्कीआ नांवाचा ग्रंथ प्रेमविषयक आहे. त्याचा एक मट्ल-अल-अन्वर नांवाचा ग्रंथ असून तो सफी तत्वज्ञानविषयक आहे. त्याचा दिवाण नांवाचा ग्रंथ हिंदुस्थानांत सर्वमान्य असून तो दैवी प्रेमकथांनीं भरलेला आहे. त्यांतील कविता हिंदुस्थानांतील पुष्कळ सफीचे भक्त अजून गातात. खम्स नांवाचा खुश्रूचा एक ग्रंथ आहे.