विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे
खोम्माण- चितोडच्या गुहिलोत राजघराण्यांत तीन खोम्माण राजे होऊन गेले. तिसरा खोम्माण हा महायकानंतर गादीवर बसला होता. प्राचीन शिलालेखंत खोम्माण याच्या पराक्रमाचीं विशेष वर्णनें आढळतात. आटपुरा लेखांत आणखी दोन खोम्माणांचा उल्लेख येतो. त्यांपैकीं एक कालभोजाचा व दुसरा सिंहराजाचा मुलगा असावा. यांतील कालभोजपुत्र खोमाण्णानें फार पराक्रम केला; त्यानें इ. स. ८२५ च्या सुमारास अरबांशीं घनघोर संग्राम करून त्यांनां हांकलून लाविलें. या कृत्यावर खोम्माणरासा नांवाचें एक काव्य प्रसिद्ध आहे. त्याच्या आधारानें टॉडनें या युध्दांत चितोडच्या बाजूनें कोणकोणत्या देशांचे राजे लढले त्यांची यादी दिली आहे व मुसुलमानांच्या निरनिराळया स्वार्यांचाहि अहवाल दिला आहे. असल्या प्रकारची सर्व रजपुतांची एकी पुढें पृथ्वीराजाच्या वेळीं झाली होती. [वैद्य मध्ययुगीन भारत भा २].