विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे
गंगपूर- ओरिसाचे एक मान्डलिक संस्थान. क्षेत्रफळ २४९२ चौ. मैल. याच्या उत्तरेस जशपूर व रांची जिल्हा; पूर्वेस सिंधभूम; दक्षिणेस बोनई. सम्बलपूर व बाभ्रासंस्थानें; पश्चिमेस मध्यप्रांतांतील रायगडचें संस्थान. हा प्रदेश डोंगरसपाटींचा असून कांही ठिकाणीं उंच डोंगर आहेत. गंगपूर व बाभ्रा संस्थान यांच्यामध्यें महावीर नामक डोंगर आहे.
येथील नद्या इब, सांख व दक्षिणकोयेल या आहेत. पैकीं सांख व दक्षिणकोयेल ह्यांचा गंगपूर येथें संगम होतो. ह्या नदीस पुढें ब्राह्मणी हें नांव मिळालें आहे. ही जागा फारच रम्य आहे. असें सांगतात कीं, परशर ॠषीनें मत्स्यगंधा नामक कैवर्तक कन्येशी संभोग केला तें हेंच रम्य स्थान आहे. उन्हाळ्यांत बहुतकरून ह्या नद्यांचें पाणी आटतें. येथील श्वापदें वाघ, चित्ते, लांडगे गेंडे वगैरे होत. हे संस्थान एकदां संबलपूरचें मांडलिक होतें. त्यावेळीं संबलपूरचा नागपूरच्या मराठे राजांच्या राज्यांत समावेश होत असे. देवगांवच्या तहाप्रमाणें १८०३ मध्यें ते ब्रिटिशसरकारांस देण्यांत आलें पण १८०६ मध्यें तें मराठा राजास परत मिळालें. १८२६ मध्यें हें ब्रिटिशांस पुन्हां परत मिळालें. १८५७ मध्यें येथील संस्थानिकास प्रथम सनद देण्यांत आली व ह्यानंतर १८९९ मध्यें पुन्हां नवीन सनद करून देण्यांत आली. १९०५ मध्यें हें संस्थान छोटानागपूरमधून ओरिसामध्यें घेण्यांत आलें. याचें एकंदर उत्पन्न २,४०,००० रु. असून ब्रिटिशसरकारास खंडणीदाखल रु. १२५० द्यावे लागतात. येथील संस्थानिकावर ओरिसाच्या कमिशनची देखरेख आहे. कारण तो ट्रिब्युटरी महालांचा सुपरिटेंन्डंट आहे. येथील लोकसंख्या (१९११) ३,०३,८२९ आहे. येथील राष्ट्रजाती गोन्ड, ओरा ग्रोन, खरिया, भूया, मुन्डा या आहेत. इब नदीचा दक्षिणेकडील प्रदेश अत्यंत सुपीक आहे. उत्तरेकडील जमीन जरा कमी सुपीक आहे.