विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे 
     
गर्भधारण, आ यु र्वे दी य.- वयांत आलेल्या स्त्रीपुरुषांची आर्तवव शुक्र हीं शुद्ध असून स्त्रीचा योनी व गर्भाशय हीं शुद्ध असतां गर्भधारणा होते. याशिवाय हृदयाची (मनाची प्रसन्नता व वायूची समता, ह्यांचीहि गर्भधारणेस आवश्यकता आहे. स्त्री सोळा वर्षांच्या पुढें व पुरुष वीस वर्षांच्या पुढें प्रायः वयांत येतात. या वयांत झालेली संततीच पराक्रमी व दीर्घायुषी निपजते.

वयाच्या बाराव्या वर्षापासून पन्नास वर्षेंपर्यंत प्रायः दरमहा कफमिश्रित रक्त स्त्रियांच्या योनीमार्गांतून येतें. त्यास आर्तव म्हणतात. हें आर्तव वायु, पित्त व कफ या दोहानीं युक्त, तसेंच दुर्गंधी, गांठाळलेलें, पुवासारखें कमी असलेलें व विष्ठेच्या रंगाचें असतां गर्भधारणेस अयोग्य असतें.पुरुषाचें शुक्रहि दुर्गंधी इत्यादिक व वातादिक दोषांनीं युक्त असतां बीज होण्याला असमर्थ असतें. लाखेच्या रसाप्रमाणें किंवा सशाच्या रक्ताप्रमाणें असून ज्याचा डाग वस्त्रास पडत नाहीं तें आर्तव शुद्ध समजावें. तूप, मध,व तेल यांच्या रंगासारखें असून जें पुष्कळ आणि स्निग्ध असतें तें शुक्र शुद्ध समजावें. मैथुनकालीं योनिमार्गानें पुरुषाचें शुक्र वायूच्या सहाय्यानें गर्भाशयांत जाऊन तेथील आर्तवांतील बीजाशीं शुक्रांतील बीजभाग संमिश्र होऊन गर्भधारणा होते. शंखाला ज्याप्रमाणें वळया असतात. त्याप्रमाणें योनीलाहि तीन वळया (आवर्त आहेत. त्या एकामागें एक अशा आहेत. त्यांपैकीं शेवटच्या वळीला गर्भाशय जोडलेला आहे. तो रोहित नांवाच्या माशाच्या तोंडासारखा असून आकारानें तेवढाच आहे. त्याचें तोंड योनीकडे असतें. या गर्भाशयांतच गर्भ वाढतो. गर्भधारणा झाल्याबरोबर स्त्रीस दमल्यासारखें वाटतें, तहान लागते, योनीचें स्फुरण होतें. ग्लानी येते, छातींत धडधडतें व रोमांच उभे रहातात. हीं लक्षणें चाणाक्ष स्त्रियांसच समजतात. रजोदर्शन झाल्या दिवसापासून बारा दिवसच गर्भधारणा होतें असें पुष्कळ आचार्यांचें मत आहे.परंतु बारा दिवसांनंतरहि गर्भधारणा होते असें सुश्रुत कारांचें मत आहे. रजोदर्शनानंतर पहिले तीन दिवस गर्भधारणा होत नाहीं. कारण योनिमार्गानें आर्तव पुष्कळ जात असतें. त्यामुळें आंत शुक्र रहात नाहीं. कदाचित् गर्भ राहिलाच तर तो रोगी, अल्पायुषी असतो. म्हणून पहिले तीन दिवस स्त्रीनें ब्रह्मचारिणी असावें. व दुधाचें किंवा सातूचें अन्न थोडें खावें. त्या योगें कोठयाचें नीट शोधन होतें व गर्भधारणाला योग्य अशी गर्भाशयादिकांची शुद्धि होते. स्त्री पुरुषांची ज्या प्रकारची चित्तवृत्ती असते त्या प्रकारचें मूल होतें म्हणून आईबापांनीं नेहेमीं विशेषतः संभोग कालीं उदार अशा विषयांचें चिंतन करावें म्हणजे संतति चांगल्या आचारविचारांची निपजते. गर्भ स्त्री किंवा पुरुष होणें हें सुद्धा स्त्रीच्या विचारांवर अवलंबून आहे असें वैद्यशास्त्रज्ञांचें मत आहे; व त्यास अनुसरूनच आपल्या सोळा संस्कारांत ''पुंसवन'' नांवाचा संस्कार सांगितला आहे.पुष्य नक्षत्र असेल त्यादिवशीं सोनें, चांदी किंवा लोखंड यांचा पुरुषकृति पुतळा करून तो तापवून दुधांत विझवावा व तें दूध नुक्ताच गर्भ राहिलेल्या स्त्रीस पाजावें ह्मणजे मुलगा होतो.

रजोदर्शन झाल्यापासून चार, सहा अशा समरात्रीं किंवा अकराव्या रात्रीं गर्भ धारण झालें असतां मुलगा होतो असें कांहींचें मत आहे. गर्भधारणाच्या वेळीं शुक्र जास्त असेल तर मुलगा व आर्तव जास्त असेल तर मुलगी आणि दोन्ही सारखीं असतां नुपुंसक होतो असेंहि कांही लोकांचें मत आहे. गर्भधारणा झाल्यानंतर म्हणजे शुक्रार्तवांचा संयोग झाल्या नंतर सात दिवसांनीं त्याचा पातळ शुक्रार्तवांचा संयोग झाल्या नंतर सात दिवसांनीं त्याचा पातळ फुगीर ठिपका (कलल होतो. नंतर एका महिन्यानें त्या ठिपक्याचा घट्ट गोळा, किंवा चापट पिशवीसारखा असलेला, अथवा अर्बुदाच्या आकाराचा पदार्थ बनतो. त्यापासून अनुक्रमें वाटोळा गोळा असल्यास पुरुष, चापट असल्यास स्त्री व अर्बुदाकार असल्यास तृतीयप्रकृति अशीं अपत्यें होतात. तिसऱ्या महिन्यांत दोन हात, दोन पाय व डोकें असे मधल्या अंगास पांच अवयव उत्पन्न होतात व सर्व अंगे व प्रत्यंगें यांचे सूक्ष्म आकार होतात. चवथ्या महिन्यांत सर्व अंगें व प्रत्यंगें यांचे विभाग स्पष्ट होतात. व गर्भाचें हृदय उत्पन्न होऊन तें हालूं लागतें व आतांपर्यंत जें चैतय अव्यक्त होतें तें व्यक्त होतें.या चवथ्या महिन्यांतच गर्भाला इंद्रियार्थांच्या इच्छा होतात. सुख व दुःख जाणणारा जीवात्मा हृदयांतच असल्यामुळें ज्यावेळीं हृदय व्यक्त होतें त्यावेळी जीवात्माहि इंद्रियांचे विषयांची इच्छा करतो म्हणून गर्भिणीस पूर्वी आवडत नसलेले पदार्थहि गर्भाच्या इच्छेमुळें आवडूं लागतात. इतकेंच नव्हें तर त्याविषयींची इच्छा अनावर होते. यासच डोहाळे असें म्हणतात. डोहाळे लागले असतां जे पदार्थ गर्भिणी मागेल ते अनिष्ट असले तरी थोडे देण्यास हरकत नाहीं. यावेळीं जर तिची योग्य इच्छा पूर्ण केली नाहीं तर गर्भाला अपाय होतो. केव्हां केव्हां डोहाळे न पुरविल्यामुळें गर्भिणीलाहि अपाय होतो असें सुश्रुतकारांचें मत आहे. पांचव्या व सहाव्या महिन्यांत अंगादिकांची वाढ होत असून मन व बुद्धी यांची पूर्ण वाढ होते.

सातव्या महिन्यांत सर्व शरीर अंगप्रत्यंगांसह पूर्ण होतें. आठव्या महिन्यांत ओज स्थिर नसतें. केव्हां आईच्या हृदयांत तर केव्हां गर्भाच्या हृदयांत असतें. यामुळें प्रसूतीकाळी आई किंवा मूल यांपैकीं जेथें ओज गेलें असेल तें जगतें व दुसऱ्याचें जीवित संशयावह असतें. ह्मणून आठव्या महिन्यांत प्रसूति होणें धोक्याचें आहे. नववा महिना लागल्यापासून योग्य प्रसूतिकाळ होतो.

प्रसूतिकाळ जरी नवव्या महिन्यापासून सुरू होतो तरी बहुतेक स्त्रियांस पूर्ण नऊ महिन्यांनींच प्रसूति होते. रजो दर्शन होण्याचें बंद झाल्या दिवसांपासून दोनशे सत्तर दिवसांनीं प्रसूति होते असा सर्वसाधारण नियम आहे. परंतु यासहि पुष्कळ अपवाद आहेत व जास्तींत जास्त एक वर्ष पर्यंतहि गर्भ राहून सुखप्रसूति होते व सातव्या अगर आठव्या महिन्यांतहि प्रसूति होऊन मुलें व बाळंतिणी यांस कांही एक इजा होत नाहीं. एक वर्षानंतर जर गर्भाशयांत गर्भ राहील तर मात्र तो स्त्रीस विकार उत्पन्न करतो व स्वतःहि विकृत होतो. आईच्या रक्त वहाणाऱ्या नाडीला गर्भाच्या बेंबीपासून निघालेली नाडी चिकटलेली असते. या नाडींतून आईचें रक्त गर्भांत येऊन गर्भाचें पोषण व वाढ हीं होतात. गर्भाची अंगें व प्रत्यंगें ज्यावेळीं नसतात त्यावेळीं म्हणजे निरवयव अवस्थेंत गर्भाशयांतील रक्तवाहिन्यांतून पाझरणाऱ्या रसानेंच गर्भाचें पोषण होतें.

गर्भाचें कोणते अंग प्रथम उत्पन्न होतें याबद्दल ॠषींचीं निरनिराळी मतें आहेत, प्रथम मध्यशरीर व त्यास लागून डोकें व नंतर हातपय होतात असें गौतमाचें मत आहे. कृतवीर्याच्या मतें प्रथम हृदय उत्पन्न होतें, कारण तें चेतनास्थान आहे, म्हणजे शरीरांत हालचाल प्रथम तेथें उत्पन्न होते व बुद्धी आणि मन हीं हृदयाचा आश्रय करूनच असतात. अशीं निरनिराळ्या प्रकारचीं मतें आहेत. तथापि धन्वंतरीचें मत याहून निराळें आहे. त्याच्या मतें सर्व अंगें व प्रत्यंगें एकदम उत्पन्न होतात. कोणतेंहि एक अंग आधी किंवा मग असा क्रम उत्पत्तिकाळीं नसतो. मात्र ती सर्व प्रत्यंगें त्यावेळीं सूक्ष्म असल्यामुळें आपणांस दिसत नाहींत, पूर्णावस्थेंत तीं दिसतात. ज्याप्रमाणें आंब्यांतील केसर (रेषा), बांठ त्यांवरील आवरण इत्यादि भाग आंबा कोंवळा असतो त्यावेळीं दिसत नाहींतं, कालांतरानें ती व्यक्त होतात त्याप्रमाणें अंगप्रत्यंगांविषयीं समजावें.

ग र्भि णी प रि च र्या.- गर्भ राहिल्यापासून गर्भिणी स्त्रीनें नेहमी आनंदित असावें. मनाला उद्वेग येईल असें कांही ऐकूं नये व पाहूं नये. कपडे वगैरेंची शुद्धता ठेवावी;अलंकार घालावे; देवता, गुरु इत्यादि पूज्य गोष्टींच्या संन्निध असून त्यांची शुश्रूषा करावी.

शिळें, कुजलेलें व कोरडे अन्न खाऊं नये, ओझें उचलूंनये, तैलाभ्यंग वारंवार करूं नये. व फार श्रम करूं नये.वर सांगितेल्या गोष्टी केल्या असतां गर्भपात होण्याचा संभव असतो. पातळ, गोड व स्निग्ध असें भोजन करावें,मृदु आसनावर बसावें व मऊ बिछान्यावर निजावें. सामान्यतः नऊ महिनेपर्यंत याप्रमाणें गभिर्णीनें वागावें.

पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या महिन्यांत गोड, थंड व पातळ असें भोजन करावें. तिसऱ्या महिन्यांत दूध भात जेवावा. चवथ्या महिन्यांत दूध, लोणी (जांगल) मांस असे आवडते पदार्थ खावे. पांचव्या महिन्यांत, तूप, दूध जास्त खावें. सहाव्या महिन्यांत सराठयांच्या काढयांत तयार केलेलें तूप व पेज, सातव्या महिन्यांतहि पिठवण इत्यादि औषधींमध्यें तयार केलेलें तूप प्यावें. याप्रमाणें सात महिने आहार ठेवल्यास गर्भ वाढतो. आठव्या महिन्यांत प्रथम आस्थापन बस्ती द्यावा. त्यानें मळाची शुद्धि होऊन वायू अनुलोम होतो. नंतर दूध व मधुर औषधांच्या काढयांत तयार केलेल्या तेलाचा अनुवासन बस्ती द्यावा. त्यानें प्रसूति सुखानें होते. आठव्या महिन्यांत तूप घातलेली कण्हेरी गर्भिणीस खाण्याकरितां द्यावी. अशा रीतीनें गर्भिणीस अंतर्बाह्य स्निग्धता आली म्हणजे कांही एक विकार न होतां प्रसूति होते व प्रसूतीनंतर थकवा येत नाहीं.

नववा महिना लागताच प्रसूतीची तयारी करून ठेवावी.बाळंतिणीची खोली प्रशस्त ठिकाणीं व अगदीं लंहान नसलेली अशी असावी. तींत उजेड वगैरे योग्य तितका येईल अशी व्यवस्था असावी. भिंती व जमीन चांगली सारवून ढेंकूण, चिलटें, वगैरेंचा त्रास न व्हावा म्हणून धूप घालावा. बाज, सुईण, शेगडी, शस्त्र, दोरा, औषधें वगैरे सर्व तयारी आगाऊ करून ठेवावी.